भाजपचा मोर्चा आता तमिळनाडूकडे..!

BJP now set to focus on Tamilnadu elections Amit Shah visits Chennai
BJP now set to focus on Tamilnadu elections Amit Shah visits Chennai

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमधील निवडणुकीच्या तयारीला गती देणाऱ्या भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने आता दक्षिण भारताकडे लक्ष वळविले आहे. तमिळनाडूचा कठीण गड सर करण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्याच्या प्रक्रियेत भाजपचे माजी अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज चेन्नईत दाखल झाले व त्यांच्या उपस्थितीत भाजपने शक्तीप्रदर्शनही केले.

अमित शहा यांनी भाजपच्या तमिळनाडू पदाधिकाऱ्यांबरोबर बूथ पातळीवरील कामाचा आढावा घेतला व कार्यकर्त्यांना ‘आगे बढो’चा मंत्र दिला. द्रमुक नेते अळगिरी व राजकारणात आलेले सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी चर्चा व भाजपच्या बहुचर्चित वेल यात्रेच्या तयारीचाही आढावा घेणे हेही शहांच्या कार्यक्रम पत्रिकेचा ठळक हिस्सा आहे. तमिळनाडूतही पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

शहा यांनी पश्‍चिम बंगालबरोबरच भाजपसाठी अतिशय आव्हानात्मक अशा तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण आदी राज्यांकडे लक्ष वळविले आहे. शहा ज्या राज्यात जातात तेथील राजकीय हालचाली प्रचंड गतिमान होतात याचे प्रत्यंतर बंगालमध्ये नुकतेच आले. शहा यांचे तमिळनाडूमध्ये येणे हे पर्यटन खचितच नसल्याने राज्याच्या सत्तेवर वर्चस्व राखलेल्या द्रविडी पक्षांचे कान टवकारले आहेत. 

द्रमुकचे माजी खासदार के. पी. रामलिंगम यांच्यासह काही स्थानिक नेत्यांनी शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. रामलिंगम यांच्या पाठोपाठ शहा यांची नजर थेट द्रमुकच्या वरिष्ठ फळीवर म्हणजे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांच्या घराण्यावर आहे. करूणानिधी यांचे ज्येष्ठ पुत्र एम. अळगिरी यांच्याशी त्यांनी खास चर्चेचा कार्यक्रम ठेवला आहे. करूणानिधी यांच्यापश्‍चात द्रमुकवर पकड बसवलेले एम. के. स्टॅलीन यांच्या नेतृत्वाखाली आपण पक्षात उपेक्षित असल्याच्या भावनेतून अळगिरी अस्वस्थ असून ते लवकरच ‘द्रमुक के (कलैग्नार)’ या नव्या पक्षाची स्थापना करणार आहेत. त्यांच्या या केडीएमके पक्षाशी युती करणे हाही शहा-अळगिरी चर्चेचा मुख्य अजेंडा आहे. 
जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकवर जाळे टाकणाऱ्या भाजपचे या पक्षनेतृत्वाशी असलेले संबंधही फार चांगले आहेत असे नसून केवळ नाईलाजाने हा पक्ष केंद्रात भाजपबरोबर असल्याचे चित्र आहे. भाजपच्या वेल यात्रेवरून अण्णाद्रमुकच्या नेत्यांतील मतभेद जाहीरपणे समोर आले होते. ओ. पनीरसेल्वम यांच्या बंडखोरीमागे भाजपचे केंद्रीय नेतृत्व असल्याचे दिसू आले आहे. 

शहांचा असाही रोड शो!
अमित शहा यांनी चेन्नईत दाखल होताच प्रोटोकॉल तोडून कारमधून खाली उतरून चक्क पायी चालण्यास सुरुवात केली.  विमानतळाजवळच्या गजबजलेल्या जीएसटी रस्त्यावरून नागरिकांना अभिवादन करून काही अंतर पायी जाणाऱ्या शहांच्या या धक्कातंत्राने सुरक्षा यंत्रणेची एकच धावपळ उडाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com