राष्ट्रकूट राजधानी बंकापूर

कृष्णदेवरायाच्या विजापूरच्या सुलतानशी झालेल्या लढाईत बंकापूरने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. कृष्णदेवाच्या सैन्यासाठी घोड्याची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता होती व बंकापूर गोव्याहून विजयनगरच्या वाटेवर होते.
goa
goaDainik Gomantak

सर्वेश बोरकर

बंकापूर हे हावेरी जिल्ह्यातील कर्नाटकातले एक लहान शहर. हावेरी- हंगलपासून हे शहर २५ किमी अंतरावर व पुणे-बंगलोर महामार्गा पासून फक्त २.५ किमी अंतरावर आत आहे.

बंकापूरचा सर्वात जुना संदर्भ इ. स ८९८ च्या कोल्हापूर जैन हस्तलिखितात सापडतो, जिथे बंकापूरच्या शहराचे नाव राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष पहिला च्या सरंजामदार चेल्लकेतन प्रमुख बांकेयारस यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते.

नवलगुंड तालुक्यातील बोगनूर येथील शिलालेखात आढळल्या प्रमाणे बंकापूर हे राष्ट्रकूट राजा इंद्र-वल्लभ यांची राजधानी होती. राष्ट्रकूटांनी इ.स. ९७३ मध्ये इंद्र चतुर्थाला पश्चिम गंगा कुटुंबातील त्याचे मामा मारासिम्हा दुसरा यांनी इ.स.९७३ च्या सुमारास राष्ट्रकूट सिंहासनावर राज्याभिषेक केला. स्वतःला राष्ट्रकूट राज्याचा स्वामी म्हणवून घेणारा,राष्ट्रकूट राजा इंद्र चौथा इ. स ९८२ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत बंकापूर येथे वास्तव्यास होता. अशा प्रकारे हे शहर इंद्र-वल्लभांची राजधानी म्हणून ओळखले जाऊ लागले.

पश्चिम गंगा राजे जैन धर्माचे संरक्षक म्हणून ओळखले जातात. श्रवण बेला गोला शिलालेख पश्चिम गंगा राजा मरसिम्हा दुसरा (९६३-९७५) याने बंकापूर येथे अजितसेन-भट्टारकाच्या उपस्थितीत समाधी धारण केली असल्याचा उल्लेख आहे. बंकापूर येथील नागरेश्वर मंदिराचा शिलालेख कलामुख पुजारी, विमलशक्तीला दिलेल्या जमीन अनुदानाबद्दल बोलतो.

राष्ट्रकुटांनंतर, बंकापूर हंगल अंतर्गत वसलेले असल्याने हंगल कदंब प्रमुखांच्या ताब्यात आले. त्यांनी पाश्चात्य चालुक्यांच्या अधिपत्याखाली सरंजामदार म्हणून राज्य केले. पाश्चात्य चालुक्यांच्या पतनानंतर, त्यावर होयसळांचे राज्य होते. होयसलांच्या नंतर, विजयनगर राज्यात जाण्यापूर्वी हे शहर मुस्लिम राजवटीत आले.

तिसरा बहमनी सुलतान मुजाहिद शाह (इ.स १३७५-१३७८) याने विजयनगरचा राजा बुक्का (इ. स १३५६-१३७७) याच्याकडून बंकापूर किल्ल्याची मागणी केली, परंतु नंतरच्या राजाने हार मानली नाही. इ. स. १४०६ मध्ये, आठवा बहामनी सुलतान फिरोज शाह (इ. स १३९७-१४२२) याने विजयनगरचा राजा देवराया पहिला (इ. स. १४०६-१४२२) याचे सुमारे ६०,००० हिंदू कैदी घेऊन बंकापूर ताब्यात घेतले. विजयनगरचा राजा देवरायाने शांततेसाठी आपली मुलगी आणि बंकापूरचा किल्ला सुलतानाला देऊन टाकला.

कृष्णदेवरायाच्या विजापूरच्या सुलतानशी झालेल्या लढाईत बंकापूरने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. कृष्णदेवाच्या हाताखाली सैन्यासाठी घोड्याची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता होती व बंकापूर गोव्याहून विजयनगरच्या वाटेवर होते.

घोडे मिळावेत म्हणून बंकापूरच्या सरदाराचे पोर्तुगीजांशी चांगले संबंध असणे हा राजकीय समझोता कृष्णदेवरायासाठी खूप फायदेशीर ठरला. इ.स १५१२ मध्ये, बंकापूरच्या सरदाराने पोर्तुगीजांना म्हणजे अाफोन्सो डी अल्बुकर्कना वर्षाला तीनशे घोडे आयात करण्याची परवानगीही मागितली व पोर्तुगीजांकडून विनंती मान्य करण्यात आली.

इ. स १५७३ मध्ये विजापूरच्या अली आदिलशहाने धारवाड आणि बंकापूरच्या विरोधात आंदोलन केले. बंकापूरने त्याचा प्रमुख वेलप्पा रे यांच्या नेतृत्वाखाली एक वर्ष आणि तीन महिने धैर्याने किल्ल्याचे रक्षण केले. पण त्याच्या मालकांची मदत न मिळाल्याने त्याला शेवटी आदिलशहाला शरण जावे लागले. आदिल शाहने किल्ल्याच्या आतील एक भव्य मंदिर उद्ध्वस्त केले आणि मंदिराच्या पायावर बांधलेल्या मशिदीचा पहिला दगड स्वतःच घातल्याचा फिरिश्ताह उल्लेख करतो.

इ. स १६७३ मध्ये सावनूर नवाबांच्या वंशातील अब्दुल करीम खान यांची विजापूरच्या आश्रयाखाली बंकापूर प्रांताचा गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

इ. स १७४७ मध्ये सावनूरच्या नवाबाने मराठ्यांशी एक तह केला ज्यात त्याने बंकापूर, हंगल, हुबळी ही सर्व जमीन स्वतःकडे ठेवली. इ. स १७५५ मध्ये, सावनूरला फ्रेंच सेनापती बुसीने वेढा घातला. सावनूर वाचवण्यासाठी नवाबाने बंकापूर किल्ला होळकरांकडे गहाण ठेवला.असे हे इतिहासिक दृष्टितून महत्त्वपूर्ण असलेले छोटेसे बंकापूर शहर दुर्दैवाने हरवलेली राष्ट्रकूट राजधानी म्हणून लोकांच्या स्मरणातून नाहिशी झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com