Goa Politics : तमाशा

Goa Politics : गोव्यातील काही मंत्र्यांचे वर्तन ज्या पद्धतीने खपवून घेतले जाते, ते तर अत्यंत निंदनीय आहे.
Goa
GoaDainik Gomantak

राजू नायक

संपूर्ण देशात मोदींची लाट आहे. मडगावातील सभेसाठी लोकांनी केलेली गर्दी अभूतपूर्व होती. याच करिष्म्याच्या जोरावर करीन ती पूर्व, अशा पद्धतीचे वातावरण भाजप नेत्यांमध्ये आहे.

आम्ही सहज जिंकून येऊ शकतो, विरोधक आमचे काही बिघडवू शकत नाहीत, या गुर्मीतूनच सरकारे जनतेच्या भावनांशी खेळ मांडत असतात. गोव्यातील काही मंत्र्यांचे वर्तन ज्या पद्धतीने खपवून घेतले जाते, ते तर अत्यंत निंदनीय आहे.

गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेले आणि त्यांनी हिंदूंची ‘मते’ जिंकली आहेत. मोदींना स्वतःचा करिष्मा आहे, त्यामुळे मडगावातील दुकानदारही दुकाने बंद करून सभेला आले होते, ही एक विरळा घटना आहे.

दिगंबर कामत आणि दामू नाईक यांनी बोलाविले म्हणून ते आले नव्हते. मोतीडोंगरावरचे लोक गर्दी करून आले असते, मडगावच्या बसस्थानकावरील मेळाव्याला बऱ्याच लोकांना धरून पैसे देऊनही आणले असेल, परंतु बरेच लोक स्वयंस्फूर्तीने आले त्यात तथ्य आहे.

मोदींनी लोकांच्या मनावर गारूड घातले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात लोकसभेत बोलले, त्यांचे शब्दन्‌ शब्द लोकांच्या काळजापर्यंत पोहोचले. लोकसभेची नवीन कारकीर्द ते सहज जमवून आणतील. भाजपने आता लोकसभेत ३७० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे त्यांचे काही सहकारी चकित झाले असतील.

भाजपचे सध्या ३०३ सदस्य आहेत. उर्वरित ७० सदस्य ते कुठून जिंकून आणतील? एक गोष्ट सगळे मान्य करतात, ‘इंडिया‘ची संकल्पना तयार होण्यापूर्वीच कोसळली व ममता बनर्जीसारख्या नेत्या काँग्रेसला ४० जागाही मिळणार नाहीत, असे भाकित करतात. त्यांनी बिहारच्या नितीश कुमारची गठडी वळविली.

उत्तर प्रदेशमध्ये भारतीय राष्ट्रीय लोकदलाला बांधून घेतले, या युतीसाठी भाजपला स्वतःच्या काही जागाही सोडाव्या लागतील. त्यावरून भाजपच्या मोर्चेबांधणीचा अंदाज करता येतो. दोन टक्केसुद्धा मते गुंडाळता येतात का, याचा अमित शहा विचार करीत असतात. यावरून त्यांच्या सूक्ष्म योजना कौशल्याची कल्पना यावी.

प्रशांत किशोर यांची मुलाखत तीन वेगवेगळ्या जणांनी घेतली. रजत शर्मा, राजदीप व राहुल कन्वर यांच्याशी बोलताना प्रशांतनी आपल्या अभ्यासपूर्ण विश्‍लेषण प्रसृत केले आहे. त्यातून येत्या लोकसभा निवडणुकीचे एक सर्वंकष चित्र उभे राहते. ते म्हणतात, भाजपला आव्हान देणारा कोणी नाही.

राहुल गांधी ऐन निवडणुकीच्या वातावरणात न्याय यात्रेला निघाले आहेत, ज्यावेळी त्यांनी दिल्लीत बसून व्यूहरचनेत भाग घ्यायला हवा होता. मग काँग्रेसचे संख्याबळ कसे वाढेल? दहा वर्षे सत्तेत राहिल्यानंतर मोदींबद्दल जनमानसांत किंचित तरी नाराजी निर्माण व्हायला हवी होती. प्रस्थापित विरोधी वातावरण तयार होणे ही एक स्वाभाविक राजकीय प्रतिक्रिया असते. परंतु त्यांना आव्हान देणारा कोणी नाही. मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसला संपूर्ण नामोहरम करून टाकले.

मोदींच्या या करिष्म्याच्या जोरावर आपण गोव्यात सहज दोन जागा खिशात टाकू, असा जबरदस्त आत्मविश्‍वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आला आहे. आधीच त्यांच्या सरकारमध्ये २८ सदस्य आहेत, त्यात पाचजणांचा पाठिंबा. सरकारमागे एकूण ३३ जण भक्कमपणे उभे आहेत.

त्यामुळे विधानसभेत अनेक प्रश्‍नांवर विरोधकांनी भडिमार केला असो की गोविंद गावडे प्रकरणात अनेक स्थगन प्रस्ताव येवोत, सरकारने विरोधकांना भीक घातलेली नाही. त्यांनी कला व संस्कृती असो वा क्रीडा स्पर्धा, या गंभीर प्रकरणांमध्येही मंत्र्यांना पाठिशी घातले, कारण विरोधकांनी सरकारवर कितीही शिंतोडे उडविले आणि मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तरीही आमच्या लोकसभेच्या गणितावर काही परिणाम होणार नाही, याचा अंदाज त्यांनी बांधला आहे. मोदींचा महिमा अगाध आहे.

मी भाजपच्या एका ज्येष्ठ संघटनात्मक नेत्याशी बोलत होतो. त्याला डिवचण्यासाठी म्हटले, तुमच्या एका मंत्र्यांवर गलिच्छ आरोप होत आहेत. तुम्हाला शरम वाटत नाही का? तुमच्यासारख्या प्रामाणिक लोकांची झोप उडत नाही का? त्यांनीही मार्मिक उत्तर दिले.

ते म्हणाले, आता तत्त्वनिष्ठा कुठे राहिलीय? राजकारणात मूल्यांचा संपूर्णतः ऱ्हास झाला आहे आणि आमच्या सर्वोच्च नेतृत्वानेही ते मान्य केले आहे. `वीस वर्षांपूर्वी गोविंद गावडे पद्धतीचे एखादे प्रकरण घडले असते तर निश्‍चितच नेतृत्व अस्वस्थ बनले असते. त्याने मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असतानाची एक गोष्ट आठवण करून दिली.

शिरोडा मतदारसंघाची जागा जिंकण्यासाठी गोविंद गावडेंनी भाजपला मदत केली होती. त्यामुळे गोविंद गावडेंचा अहंकार वाढला होता. एका मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी दुसरे मंत्री सुदिन ढवळीकरांना उद्देशून अर्वाच्य शब्द वापरले. त्यांच्या जातीचा उद्धार केला. पर्रीकर ते ऐकून हतबल बनले, तुम्ही हा प्रकार बंद करता की बैठक तहकूब करून मी उठून बाहेर जाऊ, असे ते विचारते झाले.

सध्याच्या मंत्रिमंडळात अनेक सदस्य अर्वाच्य भाषेत अधिकाऱ्यांशी बोलतात. अधिकाऱ्यांना दमदाटी करणे हे आता नित्याचे झाले आहे. एक निवृत्त सनदी अधिकारी बोलला, एका महिला अधिकाऱ्याकडे एका मंत्र्याने शिवराळ भाषा वापरली, तेव्हा तिला पर्रीकरांकडे तक्रार करण्यास मी सांगितले होते.

पर्रीकरांनी त्या अधिकाऱ्यास समज दिली, परंतु तो पर्रीकरांचा शेवटचा काळ होता. त्यातून काही निपजले नाही. ज्या पद्धतीचे लोक भाजपमध्ये शिरले आहेत, त्यांच्या कोणाबद्दलही खात्री देता येत नाही, अशा नेत्यांची संख्या मूळ भाजपहून कितीतरी अधिक आहे.

माहिती मिळते त्यानुसार गोविंद गावडेंची ही कथित ध्वनिफीत दहा दिवस आधी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचली होती. आज ती संपूर्ण देशात व्हायरल झाली आहे. पक्षसंघटनेच्या जुन्या नेत्यांच्या मते मुख्यमंत्र्यांकडे ती पोहोचताच, त्यांनी ती तत्काळ दिल्लीला पाठवायला हवी होती. कारण सारे दिल्लीहून ठरविले जाते. त्यांनी खात्रीने गावडेंना मंत्रिमंडळातून उतरविले असते. त्यामुळे तरी सध्याचा सारा तमाशा टाळता आला असता.

आरोप-प्रत्यारोपामुळे संपूर्ण सरकारचीच शोभा झाली आहे. यापूर्वी तसे निलेश काब्राल यांच्याबाबतीत घडले आहे. रमेश तवडकर यांनी अभियंता पदांसाठी उमेदवारांकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप परस्पर दिल्लीकडे केला.

तेव्हा तत्काळ काब्राल यांना दिल्लीत बोलावण्यात आले. २४ तासांत त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. पक्षश्रेष्ठी लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल म्हणून थांबले नाहीत. पक्षसंघटनेतील जुनी मंडळी अजून सरकारच्या प्रतिमेचा आग्रह धरतात.

एक बुद्धिमान नेता म्हणाला, देशभर भाजपच्या आमदार नेत्यांनी तमाशा मांडला आहे. परवा एकाने महाराष्ट्रात पोलिस चौकीत गोळीबार केला. सध्या संपूर्ण डबल इंजिनमध्ये बहुसंख्य काँग्रेसजन घुसले आहेत. मोदी-शहा काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करायचे, परंतु त्याचा अर्थ ‘काँग्रेसयुक्त भाजपा’ असा कोणी केला नसेल.

आज राज्यांमध्येही नसेल, तर केंद्रात सर्व पातळ्यांवर काँग्रेसजनांची चलती आहे. त्यातील अनेकांनी देवदेवतांच्या शपथा वाहिल्या होत्या. त्यांच्या या कर्तृत्वामुळे देवसुद्धा घुस्मटले असतील. एकवचनी रामालाही त्यांनी लाजविले असेल.

अनेक कारणांसाठी ते भाजपात शिरले आहेत, कोणाला पद आणि सत्ता हवी आहे. कोणाला आपली सत्ता वाचवायची आहे, तर कोणाला कुटुंबराजचा पुढचा कित्ता गिरवायचा आहे, त्यांचे सारे थेर पक्ष सहन करतोय, कारण सत्तेवर राहण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

मी भाजपच्या धुरंधरांशी चर्चा करीत होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि विरोधी नेत्यांना पक्षात सामावून घेतले जातेय, पक्षाची प्रतिमा काळवंडणार नाही का? पक्षाचे चारित्र्य संपूर्ण हद्दपार झाले काय?

ते म्हणाले, भाजपच्या थिंक टँकने हेतुपुरस्सर ही परिस्थिती निर्माण केलीय. त्यासाठी त्यांनी अनेक वर्षे राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला. आज भाजपात ६० टक्क्यांवर इतर पक्षांतून आलेल्यांचा भरणा आहे. हा जाणूनबुजून घेतलेला निर्णय आहे व त्याला संशोधनाची जोड आहे.

म्हणजे कसे? एक काळ होता, भाजपात एकही डाग, कलंक नसलेले नेते होते. शुद्ध चारित्र्याचे नेते. त्यांची भाषणे ऐकायला लोक गर्दी करायचे, परंतु मत टाकायचे काँग्रेसला. त्यामुळे पक्ष उभा-आडवा वाढवायचा तर असे जिंकून येणारे नेते आयात करणे भाग आहे, या निष्कर्षावर पक्ष आला. त्यांनी राज्याराज्यात अशा नेत्यांशी संधान बांधले.

कोणताही आडपडदा न ठेवता नेत्यांना पक्षप्रवेश दिला. त्यामुळे भाजपला सत्तेवर येता आले. अनेक राज्यांमध्ये भाजपा आणखी बळकट बनू शकला. पक्षाने निर्लज्जपणे फोडाफोडी केली, अनेकांना नवे पक्ष काढून दिले.

मूळ पक्षांची निवडणूक चिन्हे काढून घेतली. अनेक ठिकाणी न्यायालयांनी ताशेरे ओढूनही त्यांना फरक पडला नाही. या प्रकारामुळे अनेक ज्येष्ठ नेते अडवाणी, मुरलीमनोहर जोशी वगैरे अस्वस्थ आहेत. तेच आज पक्षात अंग चोरून वावरताहेत. परंतु असे असले तरी बाहेरून आलेल्यांना डोक्यावर बसवून घ्यायचे काय?

त्याचाच एक भाग म्हणून गोव्यात काँग्रेसमधून जे आठ सदस्य आले, त्यांना पक्षाने तिष्ठत ठेवले आहे. आलेक्स सिक्वेरांना मंत्रिपद मिळाले आहे. परंतु दिगंबर कामत यांचा अनुभव कितीही मोठा असो व जिंकून येण्याची क्षमता जबरदस्त असो, त्यांना मंत्रिपद मिळणार नाही. त्यांना विश्‍वासात न घेता त्यांना दिल्लीला पाठवायचे ठरले आहे.

बाहेरच्यांना पक्षात घेतले जाते तेव्हा मोदी यांची प्रतिक्रिया काय असते? ते त्यांना भाव देत नाहीत. ते निर्विकार राहतात. परवा व्यासपीठावर जाताना मोदींनी हात जोडले होते, रांगेतील नेत्यांपैकी अनेकांनी त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु एक-दोन क्षणांशिवाय ते कोणापाशी थांबले नाहीत. नजर कोरडी होती व निर्विकार चेहरा.

एकजण मला प्रमोद सावंत यांच्या शपथविधी सोहळ्याची हकीकत सांगत होता. मोदींच्या उपस्थितीत हा सोहळा झाला होता, तेव्हा शपथ घेऊन जाणारा प्रत्येकजण मोदींना येऊन नमस्कार करीत होता. बाबूश मोन्सेरात यांना माहीत आहे, नेतृत्वाला ते फारसे पसंत नाहीत.

त्यांनी दुरूनच मान झुकवून कुर्निसात केले. परंतु गोविंद गावडे यांनी मोदीना नमस्कार केला आणि मुख्यमंत्र्यांच्या पाठीत थाप मारली जी राजशिष्टाचारात बसत नव्हती. त्यामुळे अनेकांना ही बाब खटकली. मुख्यमंत्र्यांनी अनेकांना आपल्या डोक्यावर बसू दिले आहे, असे पक्षसंघटनेतील नेते म्हणतात.

कला अकादमी आणि क्रीडा स्पर्धेच्या प्रकरणात त्यांनी गावडेंची संपूर्णतः पाठराखण केली. ध्वनिफीतचा प्रकारही अत्यंत गंभीर आहे. त्याचे वेगवेगळे तर्कवितर्क भाजपातच काढले जात आहेत. कला अकादमी हा मोठाच गफला आहे.

त्याबाबत जनमानसातील प्रतिक्रिया अत्यंत कडवी आहे. कला व संस्कृती खात्यात गैरव्यवहार होतो, क्रीडा स्पर्धा हीसुद्धा चौकशी करण्याजोगी बाब आहे. तवडकर यांनी केलेल्या आरोपांमुळे सरकारी प्रतिमेवर निश्‍चित परिणाम झालाय.

त्यामुळे गावडेंच्या मित्रांनी पुन्हा तवडकरांवर शिंतोडे उडविले. सरकारने दोन्ही ठिकाणी झालेल्या कथित भ्रष्टाचाराची पाठराखण केली, असेच या आरोपांतून शाबित होते. आधीच गावडे यांच्याबद्दल पक्षात चांगली भावना नाही, त्यांचा फटकळपणा व उद्धट स्वभाव यामुळे ही नाराजी असंतोषात बदलली आहे.

जनतेत अत्यंत क्रोधाची भावना आहे, या परिस्थितीत त्यांना क्लिनचीट देणे बरोबर नाही अशी सार्वत्रिक भावना आहे. मोदींच्या करिष्म्यावर सारे निभावून नेले जाते, पुन्हा सहजतेने जिंकून येण्याच्या गुर्मीतूनच ही भावना निपजली आहे. परंतु जनता निमूटपणे हा तमाशा बघते आहे, यातही तथ्य आहे.

Goa
Goa Latest News: वेलिंगकरांनी धार्मिक द्वेष भावना पसरवू नये; चर्चिल आलेमाव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com