Dr. Govind Naik : हिरवा अंगठा असलेला डाॅक्टर

Dr. Govind Naik : गोविंदभाऊ हा एक धातू नाही. तो मिश्र धातू आहे. एकाच व्यक्तीत वैद्यकीयज्ञान व अनुभव, कवितेचा नाद, बागकामाचा छंद आणि संगीताची जाण हे गुण एकवटणे हा दुर्मिळ योग आहे
Dr. Govind Naik
Dr. Govind Naik Dainik Gomantak

दत्ता दामोदर नायक

धन्वन्तरी हे नामाधिनान शोभावे असे अचूक वैद्यकीय निदानसाठी ख्यातनाम असलेले डाॅक्टर गोविंद नायक हे आज आपल्या सफल जीवनाची ९५ वर्षे पूर्ण करत आहेत.

मडगावातील ‘नायक’ या व्यापारी कुटुंबात जन्मलेले हे माझे काका गोविंदभाऊ केवळ गोड अपघातामुळे डाॅक्टर बनू शकले. लहानपणापासून गोविंदभाऊना झाडांची, फुलाफळांची, बागकामाची आवड होती. त्यामुळे इंटर सायन्स पास झाल्यावर बाॅटनी किंवा कृषी विषय घेऊन बी.एस.सी. करावी असे त्यांनी ठरवले होते.

अशा वेळी आमच्या कुटुंबातले ज्येष्ठ श्रीनिवास नायक यांनी त्यांचे लक्ष टाईम्स ऑफ इंडियातल्या एका जाहिरातीकडे वेधले. मणिपालच्या पै कुटुंबियांनी सुरू केलेल्या वैद्यकीय काॅलेजमध्ये ३००० रुपये फी भरल्यास प्रवेश मिळणार होता. ३००० रुपये ही त्यावेळी मोठी रक्कम होती पण नायक कुटुंबाला सहज परवडण्यासारखी होती.

गोविंदभाऊचे शिक्षण मणिपाल, मंगळुरू व पुढे इंग्लंडमधल्या एडिंबरो येथे झाले. एम. आर. सी. पी. ही मानाची पदवी संपादन करून ते १९६४ मध्ये गोव्याला आले. सुरवातीची तब्बल १६ वर्षे ते मडगावच्या ऑस्पिसिओ हाॅस्पिटलमध्ये केवळ २५० रुपयांचे मासिक मानधन घेऊन मानद वैद्यकीय सेवा देऊ लागले. संध्याकाळी सा़डेतीन ते साडेसहा ह्या काळात ते खाजगी प्रॅक्टीस करायचे.

अल्पावधीत ते लोकप्रिय डाॅक्टर म्हणून मान्यता पावले. त्यावेळी ई. सी. जी. काढणाऱ्या यंत्राशिवाय सिटी स्कॅन, एम.आर.आय., सोनोग्राफी काढणारी यंत्रे नव्हती.

अनुभवी हातानी गोविंदभाऊ रुग्णाच्या रोगाचे अचूक निदान करायचे. एका रुग्णाला ते किमान तासभर तपासत असत. त्यांची कौटुंबिक वैद्यकीय पार्श्वभूमी जाणून घेत असत. ह्रदयरोगतज्ञ असले तरी ते रुग्णाच्या संपूर्ण शरीराची तपासणी करत.

वैयक्तीक जीवनात गोविंदभाऊ मृदुभाषी असले तरी व्यावसायिक जीवनात त्यांच्या शिस्तीचा दरारा होता. रुग्णांना त्यांचा धाक वाटायचा. वैद्यकीय जीवनात गोविंदभाऊनी soft skills वापरली नाहीत. त्यांचा भर त्यांनी घेतलेले शिक्षण, त्यांचा अनुभव, व्यासंग ह्या hard skills वर होता. बॅटरीवर व विजेवर चालणारे ई. सी. जी. मशिन घेऊन गोविंदभाऊ दक्षिणेच्या कारवारपासून गोव्यातील बारदेसमधल्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी रात्री - अपरात्री जायचे. त्यांनी आपल्या सेवेचा अवाजवी मोबदला घेतला नाही. त्यांची फी केवळ ५० रुपये होती.

५० वर्षे व्यावसायिक सेवा केल्यानंतर गोविंदभाऊ निवृत्त झाले. गोविंदभाऊना जन्मतः हिरवा अंगठा लाभला. त्यांनी फावल्या वेळेत बागकामाचा आपला छंद जोपासला. त्यांच्या घरा सभोवतालच्या बागेत 200 जातीचे गुलाब होते. गुलाबाची विपुल फुले उमलत असल्याने ते गुलाबांची विक्री करत. गुलाबांच्या विक्रीतून त्यांना महिनाकाठी १५०० रुपये मिळत.

गोविंदभाऊची आई गोदावरी नायक (आते) कवयित्री होती. माजघरातील भिंतीवर कोळशाने ती उत्स्फूर्तपणे सुचलेले अभंग लिही.

मोहरली झाडे

फळां आला बहर ।

चाखू आम्ही सार

ज्ञानामृत ।

हा तिचा अभंग कोणाही विख्यात संताच्या अभंगमालेत शोभून दिसेल.

माझे माझे म्हणूनी

गुंतले संसारी

व्यर्थ ह्या सागरी

मायाजळी

धागेदोरे बहुत

मनासि झाले जाचक

कल्पनेचे दीप सर्व

पालवा हो सकळीक

असे अभंग आत्याने लिहिले.

आत्याच्या मरणानंतर तिची कन्या मोगा हिने पुढाकार घेऊन ''चाखू आम्ही सार, ज्ञानामृत'' ह्या नावाच्या अभंगाचे पुस्तक प्रकाशित केले. माझे आजोबा काशिनाथ दामोदर नायक ह्यांनी आत्याच्या अभंगाजलीस प्रस्तावना लिहिली.

''चाखू आम्ही सार, ज्ञानामृत'' म्हणणाऱ्या आत्याची सासाय गेली ६० वर्षे नायक कुटुंबावर आहे. त्यामुळे लक्ष्मीबरोबरच देवी सरस्वतीही ह्या घराण्यावर प्रसन्न आहे.

आत्याची गुणसुत्रे रक्तात असल्यामुळे गोविंदभाऊही अभंग, कविता व गेय गीते लिहू लागले. विशेषतः ते कोकणीबरोबर हिंदीतही कविता करत.

काँटोसे भरा है अंग मेरा

लालीसे भरा है रंग

अशी त्यांची गुलाबावरची कविता प्रसिद्ध आहे.

कोयल है काली

कव्वा भी काला

कव्वेमें नही है

कोयलका गला

किंवा

मुझ में मेरा कुछ भी नही है

जो भी है वह है सब तेरा

यासारखी गेय गीते गोविंदभाऊनी लिहिली.

गोविंदभाऊनी आपल्या काही हिंदी कविता तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना पाठवल्या. महिन्याभराने पंतप्रधान राजीव गांधीचे त्यांना पत्र आले

''तुमच्या कविता मला आवडल्या. विशेषतः तुम्ही हिंदीतून कविता करता याचे मला अप्रूप वाटले.''

वल्लय रे वल्लय

होडें तुजें वल्लय

लागीं पावलीं आमी

दिसता म्हाका रासय

किंवा

नाका रे आडावंक

म्हजी वाट

धरता कित्याक

ओगीच फाट

किंवा

आसा आसा

सगळ्या आसा

फुलांक आसा

फळांक आसा

कोकिळेच्या गळ्यांत आसा

देव सगळ्या आसा

अशा सोप्या, सुबोध, ओघवत्या कोकणी कविता गोविंदभाऊनी लिहिल्या.

गोविंदभाऊची भाची उषा आमोणकर हिने पुढाकार घेऊन ''गोंयचो नाद'' व ''गोविंद गीत'' ही गोविंदभाऊच्या कोकणी व हिंदी गितांची पुस्तके प्रकाशित केली.

गोविंदभाऊची बहीण मोगा ही शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत होती. त्यामुळे गोविंदभाऊनाही शास्त्रीय संगीताची आवड लागली. चिंतामुक्त जीवन, संतुलीत आहार, बागकामाचा छंद, कवितेचा नाद व संगीतातली गोडी ही आपल्या दीर्घायुष्याची रहस्ये आहेत असे गोविंदभाऊना वाटते. त्यांच्या बरोबर ६४ वर्षांचे सहजीवन जगलेल्या सुजाताकाकीसमवेत ते आपले वृद्ध जीवन समाधानात घालवत आहेत. Aging gracefully हा त्यांच्या जीवनाचा मंत्र आहे.

समाजशास्त्रात आयुष्यमान ( Life expectancy ) ही संकल्पना आता कालबाह्म मानली जाते. निरोगी आयुष्य ( healthy life expectancy) ही नवी संकल्पना रुढ होत आहे

आपले एकूण आयुष्यमान उणे दुसऱ्यावर अवलंबून आपण घालवलेले जीवन म्हणजे निरोगी आयुष्यमान असे मानले जाते. गोविंदभाऊना केवळ दीर्घायुष्य लाभले नाही तर

दीर्घारोग्यही लाभले.

काही वर्षापूर्वी प्रवासात असताना त्यांना छातीत कळा यायला लागल्या. आपल्याला ह्रदयविकाराचा झटका आला आहे हे त्यांच्या लक्षात आले. संपूर्ण रात्र आपली नाडी तपासत व मृत्युंजय जप करत त्यांनी घालवली. मृत्यू येणार असला तर तो मृत्युंजय जपाने टळणार नाही हे गोविंदभाऊना ठाऊक होते. पण जप केल्याने मनात नकारात्मक भावना उदभवत नाहीत हा त्यांचा अनुभव होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मडगावला पोचल्यावर ते डाॅक्टर फ्रान्सिस्को कुलासोच्या हाॅस्पिटलात दाखल झाले.

गोविंदभाऊचा अध्यात्माकडे कल असला तरी ''लोभस हा मज इहलोक हवा'' हे ऐहिक जीवनाविषयीचे त्यांचे आकर्षण कणभरही कमी झालेले नाही. वैद्य आणि रुग्ण यांचे नाते कालांतराने अस्तंगत होईल. वैद्याची जागा यंत्रे व कृत्रिम बुद्धिमत्ता घेईल. पण गोविंदभाऊसारख्या अनुभवी वैद्याचा हात, त्यांना केलेले निदान, त्यांचा आश्वासक उपदेश याला यंत्रे किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता पर्याय होऊ शकणार नाही. सोनू नायक ह्या कापड विक्रीच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या गोविंदभाऊनी सखाराम गुडे, वसंत कामत, गोविंद काणे, अजित कामत ह्या लोकाभिमुख वैद्यांची परंपरा पुढे नेली.

एके काळी डाॅक्टरांना देवासमान मानणारे रुग्ण आता डाॅक्टरांकडे व्यावसायिक नजरेने पाहू लागले आहेत. वस्तूंचे मोल देताना आपण मागे पुढे पाहत नाही पण सेवेची किंमत देताना आपण घासाघीस करतो. हजारो रुपयांचा आयफोन आपण बिनदिक्कत विकत घेतो पण मोलकरणीचा पगार वाढवताना आपण घासाघीस करतो. डाॅक्टरांचे बिलही भरमसाट आहे असे रुग्णांना वाटते. अशा काळात आपल्या वैद्यकीय सेवेचा माफक मोबदला घेणाऱ्या गोविंदभाऊसारख्या डाॅक्टरांचे दर हजारी प्रमाण वाढले पाहिजे.

शिक्षण आणि आरोग्य ह्या क्षेत्रात राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान (प्रत्येकी) ६ टक्के गुंतवणूक केली पाहिजे. शिक्षक व डाॅक्टर यांना त्यांच्या सेवेचा मुबलक मोबदला मिळाला पाहिजे व देशाच्या शैक्षणिक व वैद्यकीय सेवेचा दर्जा वाढला पाहिजे तरच वाढत्या लोकसंख्येच्या ह्या देशाला Demographic Dividend मिळेल.

गोविंदभाऊ हा एक धातू नाही. तो मिश्र धातू आहे. एकाच व्यक्तीत वैद्यकीयज्ञान व अनुभव, कवितेचा नाद, बागकामाचा छंद आणि संगीताची जाण हे गुण एकवटणे हा दुर्मिळ योग आहे.

गोविंदभाऊ अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नाहीत. एका पिसाने मोर बनता येत नाही हे त्यांना ठाऊक आहे. गोविंदभाऊ हा मातीतील जीवनसत्व चोखलेला झाडपिका डाॅक्टर आहे!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com