Marathi Bhasha Gaurav Din : मराठी भाषा : आज आणि उद्या

Marathi Bhasha Gaurav Din : या संदर्भात मराठी भाषेबद्दल काही एक सिंहावलोकन करणे, वर्तमानाची परिस्थिती समजून घेणे आणि भविष्याचा वेध घेणे संयुक्तिक ठरणार आहे.
Marathi Bhasha Gaurav Din
Marathi Bhasha Gaurav DinDainik Gomantak

प्रा. विनय ल. बापट

मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महान कवी आणि लेखक कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करतो.

या निमित्ताने कविवर्य कुसुमाग्रजांचे स्मरण करावे हा उद्देश आहेच, पण त्याचबरोबर मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती यांच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न सुरू करावेत किंवा जे प्रयत्न सुरू आहेत त्या सर्व प्रयत्नांना पाठबळ मिळावे हा त्यामागील उद्देश आहे. या संदर्भात मराठी भाषेबद्दल काही एक सिंहावलोकन करणे, वर्तमानाची परिस्थिती समजून घेणे आणि भविष्याचा वेध घेणे संयुक्तिक ठरणार आहे.

मराठी भाषेला उज्ज्वल अशी परंपरा लाभली आहे. जे काही नवीन संशोधन झाले आहे त्यावरून आपणाला ही परंपरा दोन हजार वर्षांपर्यंत मागे नेता येणे शक्य झाले आहे.

मराठी भाषा ही कायम सामान्य माणसांची जनसामान्यांच्या व्यवहाराची भाषा राहिली आहे त्यामुळे लोकसाहित्याचे खूप मोठे संचित या भाषेला लाभले आहे. आपण महाराष्ट्र व गोव्यातील मराठी भाषेतील लोकसाहित्याचा अभ्यास करतो तेव्हा लोकसाहित्याची संमृद्धी पाहून आपण आश्चर्यचकित होतो.

रामायण, महाभारतासारख्या महाकाव्यांच्या विविध आवृत्त्या अगदी वेगळ्या प्रकारे लोकसाहित्यातून व्यक्त होताना दिसतात. लोकसाहित्य हे सामाजिक अभ्यासाचेदेखील खूप मोठे साधन आहे. लोकसाहित्य हे मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते.

परंतु आजच्या बदलत्या काळात आपली लोकसंस्कृती लोप पावत चालली आहे. अनेक सण, परंपरा, प्रथा बंद होत आहेत किंवा त्यांचे स्वरूप तरी बदलत आहे. त्यामुळे ही लोकसाहित्याची परंपरा खंडित होत आहे. लोकसाहित्याचे योग्य प्रकारे संकलन झाल्यास आपण हा साठा भावी काळासाठी टिकवून ठेवू शकू.

मराठी दिनासारखे कार्यक्रम केल्याने, असे कार्यक्रम करणारे जे कोणी आहेत त्यांना हे प्रयत्न करण्याचे आणखी बळ निश्चितच मिळेल किंवा अशा कार्यक्रमांतून तरुण विद्यार्थी या संवर्धनाच्या कार्याकडे आकृष्ट होऊ शकतो.

तसेच आपले जे प्राचीन काव्यग्रंथ आहेत त्यांचे आज नव्याने पुनरावलोकन करण्याची आवश्यकता आहे. कारण त्यामधून त्या साहित्याची आजच्या काळाच्या संदर्भात असलेली उपयुक्तता सिद्ध होऊ शकेल. मराठी गौरव दिना सारख्या कार्यक्रमांतून अशा उपक्रमांना पाठबळ देणे शक्य आहे.

आजच्या वर्तमानाचा विचार करता इंग्रजी भाषेचे होणारे आक्रमक हा मराठीसमोरच नव्हे तर सर्वच देशी भाषांसमोर असलेला धोका आहे. आजच्या आपल्या व्यवहाराच्या भाषेत जेथे सहज, साधे पर्याय उपलब्ध आहेत त्याठिकाणीही आपण इंग्रजी शब्दांचा वापर करताना दिसतो.

आपले देशी भाषेतील शब्द आपल्या दररोजच्या बोलण्यातून उणावले की आपली मातृभाषा शाब्दिक अंगाने शबल होईल. म्हणूनच आपल्या भाषेच्या स्वत्व रक्षणाचे मोठे कार्य आपणाला आजच्या वर्तमानात करायचे आहे.

खरे तर आज भाषा कशी बोलावी हे शिकवण्याची आवश्यकता आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या भाषेबद्दल आपल्याच मनात असलेल्या न्यूनगंडामुळे आपण आपल्या मातृभाषेऐवजी इंग्रजी भाषेतून आपल्या पाल्यांना शिकवणे भूषणावह समजतो.

आपणाला ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. मातृभाषेतून शिक्षण न घेतल्याने आज अनेक विद्यार्थ्यांचा मानसिक विकास खुंटला आहे ही वस्तुस्थिती आहे. आपल्या गोव्याचे उदाहरण घेतल्यास तीस- पस्तीस वर्षांपूर्वी आपल्या गोव्यात माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण मराठीतून देणाऱ्या कितीतरी शाळा कार्यरत होत्या परंतु आता गोव्यात पाचवी ते दहावीपर्यंत मराठीतून शिक्षण देणारी एकही शाळा उरलेली नाही ही वस्तुस्थिती आहे.

यामागचे सर्वांत महत्त्वाचे कारण आपली मानसिकता व आपल्याच भाषेबद्दल असणारा आपला न्यूनगंड कारणीभूत आहे. आपल्याकडे आता सर्वत्र इंग्रजीतून शिक्षण दिले जाते या भाषेतून शिक्षण घेतल्याने मुले हुशार होतात हे खरे असते तर गोव्यातील विद्यार्थ्यांचा बुद्ध्यंक हा बाकी देशातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त पाहिजे होता. स्पर्धा परीक्षांमध्ये गोमंतकीय इंग्रजी माध्यमातून शिकलेले विद्यार्थी शिखरावर राहिले पाहिजे होते.

परंतु गोव्यातील बोटावर मोजण्याएवढे विद्यार्थीदेखील स्पर्धा परीक्षा पास होत नाहीत. याचे मुख्य कारण आपण आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून सहज शिकण्याच्या प्रक्रियेपासून तोडले आहे. याचा सर्वांत मोठा फटका हा बहुजन समाजातील मुलांना बसला आहे. त्यांना माध्यमिक स्तरापर्यंतचे दर्जेदार शिक्षण मातृभाषेतून मिळाले असते तर आज या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर आपले नाव निर्माण केले असते.

गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हे द्रष्टे होते म्हणून त्यांनी गावोगाव मराठी शाळा उघडल्या. परंतु नंतरच्या राजकारण्यांनी इंग्रजीच्या गुढ्या उभारून सर्व पिढ्यांचे खूप मोठे नुकसान केले. अजूनही गोव्यात दर्जेदार मराठी माध्यमिक शिक्षण देण्याची सोय सरकारने सुरू केल्यास व पालकांनी हिंमत दाखवून या शाळेत आपल्या पाल्यांना घातल्यास हे विद्यार्थी आपणाला इतिहास घडविताना दिसतील.

Marathi Bhasha Gaurav Din
Marathi Language : मराठी भाषा संस्कृती शिकवणारी ! प्राचार्य अनिल सामंत

भविष्याचा विचार करता, आजची परिस्थिती अशीच राहिल्यास देशी भाषा टिकणे खूप कठीण होऊन जाईल. आज वाचन संस्कृतीचा होणारा र्‍हास चिंताजनक आहे. आज सर्व मराठी वा देशी भाषांतील वर्तमानपत्रे, मासिके, दिवाळी अंक या सर्वांचा खप मंदावत चालला आहे. कारण देशी भाषांतून लिखित व्यवहारच कमी होऊ लागला आहे.

प्रयत्नपूर्वक आपल्या पाल्यांना मातृभाषेतून वाचनाची गोडी आपण न लावल्यास भविष्यात वाचन संस्कृतीचा र्‍हास निश्चित होणार आहे. आज आधुनिक तंत्रज्ञान बदलत आहे आणि या तंत्रज्ञानाप्रमाणे आपण भाषेतही बदल केले पाहिजेत. आपण तंत्रज्ञान वापरण्यास उपयुक्त अशी भाषा तयार करू तर आज भाषेचा वापर अधिकाधिक वाढेल.

तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक शुद्ध स्वरूपाची भाषा लिहिण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून सामान्य माणूस ती भाषा लेखनात सहजतेने वापरू शकेल. आज अनेकजण मराठी भाषा लेखनात वापरत नाहीत त्याचे कारण ‘आपणाला व्याकरणशुद्ध मराठी लिहिता येत नाही’, हे त्यांच्या मनातील भय कारणीभूत असते.

व्याकरणशुद्ध लिहिण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्यास हे भय कमी होईल आणि लोक मराठीतून सहजतेने लिहू लागतील. एक दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करून हे साध्य होईल, असे नाही.

पण यामधून आपल्या भाषेबद्दलचा अभिमान जागृत होईल आणि या भाषेच्या अभिवृद्धीसाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा विचार किमान काही जणांच्या मनात जागृत होईल. असे झाल्यास पुन्हा एकदा आपण आपल्या मुळांकडे वळू शकू आणि पुन्हा एखादा ताठ मानेने जगण्याचे नवीन बळ प्राप्त करू शकू.

सर्वांना मव्याकरणशुद्ध लिहिण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्यास हे भय कमी होईल आणि लोक मराठीतून सहजतेने लिहू लागतील.

एक दिवस मराठी भाषा गौरव दिवस साजरा करून हे साध्य होईल, असे नाही पण यामधून आपल्या भाषेबद्दलचा अभिमान जागृत होईल आणि या भाषेच्या अभिवृद्धीसाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा विचार किमान काही जणांच्या मनात जागृत होईल.

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com