Needs To Change: परिवर्तनाची निकड...

निसर्गाला ओरबाडून माणसाचे अस्तित्व टिकणार नाही. त्यासाठी परिवर्तन होण्याची गरज आहे.
Nature
Nature Dainik Gomantak

कमलाकर द. साधले

म नुष्य ही सृष्टीची निर्मिती. त्याचा जन्म, बाल्य, तारुण्य, वार्धक्य आणि मृत्यू हे टप्पे निसर्गाच्या नियोजनानुसार चालणार. काही लक्ष वर्षे ही मानवजात निसर्गाने निर्माण केलेल्या साधनसामग्री व पर्यावरण यावरच जगत आलेली आहे.

इतर प्राणिमात्रापेक्षा बुद्धी व कौशल्ये यात माणसाला सृष्टीकडून जास्त मोठी दाने मिळाल्यामुळे त्याने विज्ञान, तंत्रज्ञान, कला-साहित्य, अध्यात्म यात विशेष प्रगती करून आपल्या जीवनमानात सुख-सुविधा निर्माण केल्या. यांत्रिकीकरणाचे एक नवे शस्त्र त्याला सापडले.

त्यातील यशाने त्याला वाटू लागले की, आपणच सर्वश्रेष्ठ आहोत. एवढ्या मोठ्या निसर्गावर आपण ताबा मिळवला आहे. त्याला गुलाम बनवले आहे. या अभिनिवेशात गेली दोन-तीन शतके चढत्या गतीने माणसाचे थैमान पृथ्वीवर चालू आहे.

त्यातून माणसासह इतर जीवजातींना, वृक्ष, वनस्पतींना व इतर घटकांना सुस्थितीत राखण्यासाठी पर्यावरणाची, परिस्थितिकीची (इकोसिस्टिम) जी व्यवस्था सृष्टीने कोट्यवधी वर्षांतून बांधून काढली होती ती अस्थिर बनली आहे. तिला तडे जाऊ लागले आहेत, तरीही तो अभिनिवेश उतरला नाही.

आपले विज्ञान-तंत्रज्ञान त्यावर मात करू शकेल, असा एक अंधविश्वास जोपासला गेला. विकासाच्या नावाखाली सृष्टीला ओरबाडणे चालू राहिले. आता सृष्टीचे ढेपाळणे उघड्या डोळ्यांना दिसू लागले. परिस्थितीच्या उग्रतेचे चटके बसू लागले.

तरीही आपणच निर्माण केलेल्या ‘सुखसोयी’च्या व्यसनात आपण एवढे बुडून गेलो आहोत की त्यातून बाहेर येण्याची इच्छा व कुवत दोन्ही गमावून बसलो आहोत.

गेल्या शतकाच्या मध्याला या विनाशाच्या पाऊलखुणा दूरदृष्टीच्या लोकांना दिसू लागल्या. पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासातून त्याची खात्री पटू लागली. गांभीर्य वाढू लागले. आता सर्वांना कळून चुकले असले तरी व्यापारी-राजकीय हितसंबंधीयांचे ’विकासा’चे ढोल बडविणे चालूच राहिले.

त्याच्या गजरात सृष्टीला ओरबाडणेही अविरत चालूच आहे. सृष्टिसंवर्धनाचे नाममात्र औपचारिक कागदी स्वरूपाचे उपचार चालू आहेत. आपली शक्ती-बुद्धी-क्षमता, सर्व काही सरकार व व्यापारव्यवस्था याजकडे गहाण टाकून, कोणीतरी उद्धारक येईल किंवा व्यवस्थेला सुबुद्धी सुचेल याची असहाय्यपणे वाट पाहत सामान्य माणूस बसला आहे.

जागतिक राष्ट्रसंघ गेली 3-4 दशके जगातील राष्ट्रांच्या परिषदांचे गुर्‍हाळ चालवीत आहे. उपाययोजनांवर चर्चा घडत आहेत, नवनवे उपक्रम आखले जात आहेत. यातून लोकजागृतीपलीकडे काही घडताना दिसत नाही. पर्यावरणाची घसरगुंडी थांबलेली दिसत नाही.

कारण विनाशाची गती थांबलेली नाही, कमीही झालेली नाही. कारण विनाशकारी विकास कार्यक्रम थांबलेले नाहीत. लोकांच्या चंगळवादी जीवनशैलीत फरक पडलेला नाही. तरीही जगभर एक वैचारिक परिवर्तन घडत आहे.

शोषक व्यवस्थेची वैचारिक पीछेहाट होत आहे. या व्यवस्थेला आपल्या शोषण कार्यक्रमांसाठी काही सबबी शोधाव्या लागत आहेत किंवा हिरवी सोंगे घ्यावी लागत आहे. बऱ्याच मानवी कृतीतील उचित आणि अनुचित यांची वर्गवारी निसर्गतत्त्वानुसार आज उलटी झाली आहे.

याची एक जंत्री मी 4 महिन्यांपूर्वी केली होती त्याची छोटीशी उजळणी:-

1. जंगली पशूची शिकार हा पराक्रम होता, बक्षिशी मिळायची. आज दंड व तुरुंगवास.

2 साप दिसला की ठेचला जायचा. आज साप पकडणाऱ्याला बोलावून सापाला त्याच्या अधिवास क्षेत्रात सोडले जाते.

3 आधुनिक शेती म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके यांचा पुरस्कार व्हायचा. आज त्याचा तिरस्कार. आज सेंद्रीय खते कीटकनाशके यांचा वापर असलेली नैसर्गिक शेती पुढे येत आहे.

4. निकृष्ट जातीची, गरिबांचे अन्न मानलेली नाचणी, ज्वारी, बाजरी, तरी यांसारखी भरडधान्ये यांचा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार केला जात आहे. कारण ती निकृष्ट जमिनीत, कमी पाण्यात होऊ शकतात आणि त्यांचे पोषणमूल्य जास्त आहे.

5. डोंगर उतार कापून समतळ करणे, खालसार पाणथळ जागेत भराव टाकणे याचे ’विकास’ म्हणून कौतुक व्हायचे, आज तो गुन्हा ठरत आहे.

6. प्लास्टिक व कॉंक्रीट यांची ऊर्जाखाऊ निर्मिती, पर्यावरण व आरोग्याला अनिष्ट ठरल्यामुळे अनिवार्यतेने वापरले गेले तरी ते बदनाम झाले आहेत.

Nature
Sanquelim : साखळी रवींद्र भवनात ‘अरंगेत्रम’ उत्साहात

वस्तू-सुविधांचा बोजा, स्पर्धात्मक जीवन, न सोसणारी गती हे माणसाला पुढे नेत नसून एक फरपट बनल्याचे असहाय्यतेचे चित्र विचारवंतांना दिसत आहे. वस्तू- सुविधांच्या ढिगात अडकून पडलेल्या माणसाला जीवनानंद अनुभवायचा असल्यास त्यातून बाहेर येण्यासाठी मिनिमलीझमचे तत्त्व अंगीकारले पाहिजे, याची जाणीव आता येत आहे.

प्रयोगवीरांनी हे प्रत्यक्ष जगून अनुभवले आहे. भूक भागण्यासाठी जेवढे पाहिजे त्यापेक्षा थोडे कमीच खाणे जास्त हितावह, जास्त खाणे आरोग्य घातक. शिवाय पोटाला तडस लागून कार्यशक्ती मंदावते. ठरावीक मर्यादेच्या बाहेर शरीराचे वजन वाढणे हे अनेक रोगांना निमंत्रण ठरते.

झाडाला पाणी घातले त्याचा निचरा झाला पाहिजे मुळात तुंबून राहील एवढे घातले तर काहीवेळा झाड मरतेसुद्धा. गांधीजी व विनोबाजी हे मिनिमलीझमचे आदर्श होते. कमीतकमी वस्तूंचा वापर करून त्यांनी केवढे कार्य करून ठेवले आहे!

एम्स्ट फ्रेड्रिक शूमाकर या जर्मन तत्त्वज्ञाचे ‘लघुतेत सुंदरता’ (स्मॉल इज ब्यूटिफुल) हे तत्त्व प्रसिद्ध आहे. ‘कम सामान, बहोत आराम’ हे भारतीय रेल्वेचे बोधवाक्य आहे.

Nature
धक्कादायक! सासष्टी, मुरगावच्या शेकडो शिधापत्रिकाधारकांना किडलेला व बुरशी आलेल्या तांदळाचे वाटप

सृष्टीमध्ये स्पर्धा ही शिकारी प्राणी आणि त्याचे भक्ष्य यामध्येच असते. फक्त आपल्या जीवन शाश्‍वतीसाठी आवश्यक असते तेव्हाच. दाटीने झाडी वाढलेली असते तेव्हा प्रकाश मिळविण्यासाठीच. झाडे उंच वाढतात स्पर्धा म्हणून नव्हे.

दुसरा आपल्यापुढे जाऊ नये म्हणून स्वतःची गती वाढविणे किंवा दुसऱ्याचे पाय ओढणे ही वृत्ती माणसात आणि खेकड्यातच. वाहनातील बहुतेक अपघात दुसऱ्याला मागे टाकून पुढे जाण्याच्या स्पर्धेतून घडतात.

मोटरकारची निर्मिती जीवनातील वाढत्या धावपळीतील गतीला सामोरे जाण्यासाठी सुरू झाली. वाहनांची संख्या वाढली तशी वाहतुकीतील कोंडीही वाढली, मग दोन लेनच्या चार झाल्या, सहा झाल्या.

सिग्नलची योजना आली, तरी सिग्नलच्या नाक्यावर वाहनांच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा. सिग्नलच्या ठिकाणी वाहने थांबवावी लागतात ती लागू नयेत म्हणून उड्डाणपूल (फ्लायओव्हर) आले. त्यांनी शहरातील भूमीची प्रचंड जागा व्यापली. वेड्यावाकड्या फ्लायओव्हरच्या प्रचंड अडगळीने शहराचे सौंदर्य बिघडवून टाकले.

हे सर्व व्याप गतीच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी! आधी गरज निर्माण करायची आणि मग तिच्या पूर्ततेसाठी धावपळ करायची! हे करण्याऐवजी वाढल्या गरजेलाच वेसण घातले तर? वाढत्या गतीमागे धावण्याऐवजी गतीलाच धिमी करायची आणि आपल्यामागे यायला लावायचे.

असे प्रयोग झालेले आहेत. सिंगापूरची वाहतूकव्यवस्था शिस्तबद्ध. दोन वर्षांपूर्वी त्यांनी नवीन कारची नोंदणी थांबविली. कारण जाहीर केले की, ‘सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने रस्त्यांची क्षमता संपलेली आहे’.

Nature
Stray Dogs Attack: राज्यात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट! पर्यटकांवरही हल्ले; प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी

वाहतुकीचे प्रश्‍न सुलभ करण्यासाठी, सुरक्षित व निरोगी शहरासाठी वाहतुकीचे जास्तीतजास्त पादचारीकरण हा आजच्या नगरनियोजन शास्त्रानुसार सर्वोत्तम उपाय. त्याचे प्रयोग जगात बऱ्याच ठिकाणी होत आहेत. शहराचा काही भाग ’बिनवाहन क्षेत्र’ (नो व्हेइकल झोन) म्हणून जाहीर करणे.

‘माणसांसाठी शहर’, ‘आनंदी शहर’ अशा अनेक नावांनी वाहनांच्या जीवघेण्या गतीला टाळण्याचे प्रयोग होत आहेत. वाहनांची गरज टाळण्यासाठी नगररचनेच्या नवीन संकल्पना मूळ धरत आहेत. पदपथप्रेमी अशा क्लस्टर प्लॅनिंगचे विविध पर्याय नागरिकाला पंधरा मिनिटांपेक्षा जास्त चालावे लागणार नाही असे ‘पंधरा मिनिटी शहर’ ही संकल्पना.

स्कँडिनेव्हिय देशात (उत्तर युरोप), सायकलींचा फार वापर केला जातो. त्याहून लांब जायचे झाल्यास लोक खाजगी कारऐवजी सिटीबससारख्या सार्वजनिक वाहनांचाच वापर करतात.

मंत्रीसुद्धा. माझी मुलगी हॉलंडला गेली होती. ती म्हणाली, ‘लोक सायकलवरून, चालत वृक्षवल्लीने नटलेल्या स्वच्छ रस्त्याने मजेत चाललेयत..! पाहून फार बरे वाटले.’

Nature
Nutmeg: जायफळाची शेती मोठी फायदेशीर, पण त्याच्या उपपदार्थांपासूनही 'अशाप्रकारे' मिळवता येतो आर्थिक लाभ

आमच्या गोव्यात देशांतील इतर राज्यांच्या मानाने दरडोई वाहनसंख्या सर्वाधिक. पूर्वी छोटी शहरे, कमी लोक, कमी वाहने असल्याने रस्ते अरुंद होते. आज हे सर्व वाढत आहे. त्या मानाने रस्त्यांची रुंदी वाढली नाही.

नगररचना शास्त्रानुसार निवासी क्षेत्रांत (रझिडेंशियल झोन)/ दर हेक्टरमध्ये जास्तीत जास्त किती माणसे असावीत यांची मानके (स्टॅन्डर्डस्) आहेत. विकासकांच्या (डेव्हलपर) फायद्यासाठी निवासी क्षेत्रातसुद्धा बांधकाम निर्देशांक वाढवून दुप्पट माणसे कोंबण्याचे काम चालू झाले आहे.

यामुळे नजीकच्या भविष्यात शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडणार आहे. त्यांची पदचिन्हे आज स्पष्ट दिसत आहेत.

मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रात, विशेषतः शहरी क्षेत्रात मूलभूत परिवर्तनाची एक निकड बनून राहिली आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com