तटबंदी

प्रस्थापितांविरोधातील लोकभावना, सरकार विरोधातील वातावरण, उमेदवारांबद्दलही कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल, शिवाय उमेदवार्‍या नाकारल्यामुळे काही नेत्यांमधील अस्वस्थता हे असे अनेक मुद्दे गोव्यात भाजपला ग्रासणारे होते. उत्तरेत श्रीपाद नाईक हे सहाव्यांदा निवडणूक लढवत असल्याने अनेक मतदार त्यांना कंटाळल्याचे चित्र होते व दक्षिणेत पल्लवी धेंपे यांची उपलब्धता हाच नकारार्थी मुद्दा होेता. भाजपने या नकारात्मकतेवर कशी मात केली, लोक कोणाला पाहून बाहेर आले, मतांची एवढी भक्कम तटबंदी कशी साध्य झाली?
Goa
GoaDainik Gomantak

राजू नायक

ज्यावेळी सासष्टी तालुक्यात अत्यंत धिम्या गतीने मतदान सुरू होते, तेव्हा अंतर्गत भागांत मतदानाची विलक्षण घाई होती. ग्रामीण भाग - एरव्ही राजकीय प्रक्रियेविषयी फारसे उत्सुक नसतात, त्यांना यावेळी आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवावीशी वाटली.

वास्तविक सांगे, सावर्डे, काणकोण या भागांतील लोकांच्या वाट्याला विकासाची काय फळे आली? त्या तुलनेने जुन्या काबिजादीमध्ये विकास लवकर पोहोचला. तेथील वर्ग सुशिक्षित आहे. त्याला विकासाची मधुर फळे लवकर चाखता आली. शिवाय त्यांना आणखी अपेक्षा असतात. सरकारवर त्यांचा दबावही मोठा असतो.

सरकारमध्ये कमी प्रतिनिधित्व असणाऱ्या दक्षिण गोव्यातल्या दुर्गम भागातील मतदारांनी अधिक जागृती दाखवली आहे. दक्षिण गोव्यात एकूण पाच लाख १८ हजार ७६७ मतदार आहेत. त्यांपैकी चार लाख ४५ हजार लोकांनी मतदान केले. याचा अर्थ तेथे ७४.४७ टक्के मतदान झाले. सासष्टीत ७१.११ टक्के, याचा अर्थ गत निवडणुकीपेक्षा तीन टक्के अधिक मतदान झाले.

तीन टक्के जादा मतदान होणे, टक्क्यांत वाढ होणे, ही काँग्रेससाठी दिलासादायक बाब असल्याचा निष्कर्ष काहीजण काढतील; परंतु तेवढ्याने भागत नाही. तेथे भरघोस मतदानाची अपेक्षा होती; कारण यापूर्वी नेहमी सासष्टी तालुक्यातील मताधिक्यावर दक्षिण गोव्यातील समीकरण अवलंबून असायचे. यावेळी हिंदुबहुल मतदारसंघ भरघोस मतदान करणार, ही अपेक्षा असल्याने ते मताधिक्य कमी करण्याची जबाबदारी स्वीकारून सासष्टीवर अधिक मतदानाची भिस्त होती; पण तसे घडले नाही व अपेक्षेनुसार सांगे, सावर्डे, मडकई या भागांत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. सांगेमध्ये सर्वाधिक ८२.२२ टक्के, तर सावर्डेमध्ये त्याखालोखाल ८० टक्के मतदान झाले. सासष्टीपेक्षा अंतर्गत भागांत २०,७९२ जादा मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.

काय अपेक्षा बाळगून या अंतर्गत भागांतील नागरिकांनी मतदान केले असेल? गोवा मुक्तीच्या ६० वर्षांनंतर सांगे, सावर्डे या मतदारसंघांनी काय म्हणून एवढे उत्स्फूर्तपणे मतदान केले, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. वास्तविक भाजपने सांगेमधील नेत्रावळी खेडे ‘आदर्श ग्राम’ योजनेखाली दत्तक घेतले होते; परंतु गचाळ व्यवस्थापनामुळे ही योजनाही पूर्णत्वास जाऊ शकली नाही. शिवाय खाणी बंद आहेत. अनेकांची रोजीरोटी गेली. रस्त्यालगत उभे केलेले ट्रक गंजून गेल्याचे चित्र हृदयद्रावक आहे. ही भीषण स्मारके डोळ्यांसमोर उभी असताना तेथील गरीब, सामान्य, खेडूत उत्साहाने मतदान करतो, ही विरळा घटना मानली पाहिजे.

या उत्साहाचे एक प्रमुख कारण भाजपची संघटना. लक्षात घेतले पाहिजे की, पल्लवी धेंपे यांची उमेदवारी उशिरा जाहीर केली. त्यादृष्टीने त्या नवख्या होत्या. त्यांची ओळख करून द्यावी लागली. कार्यकर्ते हिरमुसले होते; कारण पल्लवी या ‘केडर’बाहेरच्या होत्या. अ‍ॅड. नरेंद्र सावईकर, दामू नाईक यांच्यासारख्या तरबेज खेळाडूंना बाजूला सारून पल्लवींच्या गळ्यात ती माळ पडली होती. स्वाभाविकच ते नाराज होणार होते.

शिवाय भाजप आमदारांच्या मनातही अनेक शंका होत्या; परंतु पहिल्याच टप्प्यात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी पल्लवींची कार्यकर्त्यांना ओळख करून दिली, ती पद्धत निश्चितच राग, रुसवे-फुगवे घालवणारी ठरली. दुसरा सवतीसुभा भाजप नेत्यांनीच उभा केला होता. पल्लवींची उपलब्धता. त्यांना भेटणे सहज सोपे नसेल, असा दृष्टिकोन काही नेत्यांनी पुढे केला होता. भाजपने संघटनेच्या जोरावर तोही मुद्दा दूर केला. तुमचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सरपंच, आमदार, स्थानिक मंत्री आहेत. शिवाय त्या स्वत:चे कार्यालय दक्षिणेत उभारणार आहेत.

वास्तविक पल्लवी धेंपे यांची ‘ओळख’ घडविण्यापासून मतदारांचा भरभक्कम पाठिंबा त्यांच्यामागे उभे करण्याचे आव्हान सोपे नव्हते. त्या महिला होत्या, अत्यंत श्रीमंत उमेदवार, सारस्वत! हे काही राजकारणात विशेष गुण मानता येणार नाहीत. सध्याच्या राजकारणात तर नाहीतच!

मग हा अत्यंत कठीण टप्पा भाजपने कसा गाठला, काँग्रेसला सोपी वाटणारी लढत कठीण कशी बनली?

त्यासाठी संघटना हे भाजपचे बलस्थान व काँग्रेसची ती कमजोरी ठरली, जी पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांना पुन्हा उभारता येईल का, - घटक पक्षांची साथ राहिली तरी -शंकाच आहे. भाजपच्या हाताशी संघटना होती. पक्षश्रेष्ठींची ताकद होती व सत्ताधारी पक्षाने निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली आहे.

पहिली गोष्ट म्हणजे पल्लवी धेंपे यांचे नाव पक्षश्रेष्ठींनी नुसते पुढे केले नाही तर त्या जिंकून येतील, नेतेमंडळी संपूर्णतः त्यांच्यामागे उभी राहतील हे कटाक्षाने पाहिले. प्रचार टप्प्यात पंतप्रधान, गृहमंत्री यांनी गोव्याला महत्त्व दिले. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रचाराची सारी धुरा स्वतःकडे घेतली.

सांगे, सावर्डे, काणकोण येथे ग्रामीण जनतेचा पाठिंबा मिळविणे भाजपला शक्य झाले, कारण सरकारच्या अनेक योजना तेथे सामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या. लोकांना रोजगार मिळाला असाही एक दावा आहे. तेथील आमदारांनी अत्यंत क्रियाशील काम केले.

त्या तुलनेने विरोधकांची शक्ती कोठेच दिसली नाही. सुभाष फळदेसाई, गणेश गावकर व रमेश तवडकर यांच्या नेतृत्वाची ही कसोटी होती. पक्षाचा एक ज्येष्ठ संघटनात्मक नेता म्हणाला, ‘गणेश गावकर यांनी पक्षाला मतदानाची जी अपेक्षित टक्केवारी पाठवली होती, तिच्यात व अंतिम टक्केवारी हातात आली, तिच्यात फारसा फरक नव्हता’. हे संघटनात्मक यश आहे.

भाजपच्या ‘पन्ना प्रमुखांनी’ कसे काम केले त्याचाही हा परिणाम आहे. मतदारयादीतील प्रत्येक पानासाठी तीन चार लोकांना नियुक्त करणे व त्यांचे नियंत्रण एका ‘पन्ना प्रमुखा’कडे असणे ही संकल्पना जबरदस्त आहे. त्यामुळे उत्साह वाढला.

उत्तर गोव्यातील एका नेत्याने संघटनात्मक काम कसे चालते याची दिलेली माहिती वैशिष्ट्यपूर्ण आहे. उत्तर गोव्यात दोन ‘वृद्ध उमेदवारांमध्ये’ ही लढत झाली. ‘वृद्ध उमेदवार’ हा भाजपच्या संघटनात्मक नेत्यानेच वापरलेला शब्द आहे. या फारशी लोकप्रियता नसलेल्या उमेदवाराची ‘पालखी’ आम्हांला वाहून न्यावी लागली. अनेक कार्यकर्ते आम्हांला सांगत, त्यांना प्रचारासाठी पाठवू नका, कारण लोक त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडतात. अनेकांनी त्यांना स्पष्टपणे विचारले, गेल्या पाच वर्षांत तुम्ही कोठे होता?

‘शेवटी आम्ही आमच्या उमेदवाराला सांगितले, तुम्ही पणजीतच थांबा. तुम्ही कोठे जाऊ नका. शेवटच्या आठ दिवसांत आम्ही उत्तर गोव्यातील प्रचार मोहिमेवर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनाच पाठविले’. लक्षात घ्या, श्रीपाद नाईक यांच्या उमेदवारीला प्रस्थापित विरोधी प्रतिकूलता होती. भाजपने संघटनेच्या जोरावर तिच्यावर सहज मात केली. उद्या श्रीपाद नाईक हे जिंकून आले तर त्याचे श्रेय त्यांच्या स्वतःपेक्षा संघटनेला द्यावे लागेल. भाऊंना जिंकून आणण्यासाठी यावेळेला पक्षाला खूप मोठी मेहनत घ्यावी लागली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना त्याचे बरेचसे श्रेय जाते.

मतदारांना मोठ्या प्रमाणात बाहेर काढून त्यांना सकारात्मक मतदान करायला लावण्याची ‘जादू’ कशी काय साध्य केली?

प्रमोद सावंत यांचे नेतृत्वगुण :

आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीत सावंत यांनी नेतृत्वगुणांची खरी चमक दाखवली आहे. लोक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होतात. त्यांनी लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचे अगदी समोरून ‘हेड ऑन’ नेतृत्व केले. त्यांच्या अनेक सभांना तीन हजारांपेक्षा जास्त प्रेक्षक गोळा व्हायचे. ते आता प्रभावी वक्तेही बनले आहेत, हे अनेक ठिकाणी जाणवले, विशेषतः त्यांनी कुंकळ्ळी येथे केलेले प्रभावी भाषण याचाच एक उत्कृष्ट नमुना म्हणून गणले गेले. शिवाय पंतप्रधानांच्या सांकवाळ सभेतही त्यांच्या भाषणाची छाप पडली. २०१९ व २०२२च्या त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील हा त्यांचा राजकीय टप्पा खूपच वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो.

संघटनेचे कौशल्य

‘पन्ना समित्यां’चे भाजपने केलेले काम वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि निवडणूक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात हा एक नवीन पायंडा मानला जाणार आहे. भाजपने निवडणुकीला महिना असताना या ‘पन्ना समित्यां’ची अधिवेशने घ्यायला सुरुवात केली व मंत्री व संघटनात्मक नेत्यांंना तेथे उपस्थित राहणे सक्तीचे केले होते. त्यामुळे अनेक पंचायतींमध्ये कार्यकर्त्यांना जागृत करण्यात आले व निवडणूकपूर्व मोर्चेबांधणी अत्यंत प्रभावीरीत्या झाली.

भाजपचे अनेक मंत्री व आमदार, नाराज नेते यांना कामाला लावणे एक कौशल्य होते. ते मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या जोडगोळीने साध्य केले. विश्वजित राणे यांच्या सत्तरीमध्ये विक्रमी मतदान झाले. ते जादा मताधिक्य देतात की साखळीत प्रमोद सावंत याची जणू स्पर्धाच चालली होती. दोघांनीही जणू स्वतःचीच निवडणूक असल्यासारखे काम केले.

भाजपने आपल्या विजयाची जी ‘तटबंदी’ उभी केली त्याचे श्रेय नक्की कोणाला? पहिले श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. त्यांच्या करिष्म्याची छाप अनेक मतदारांवर आहे. शहरी बुद्धिवान मतदारांवर ती जशी आहे, तशी ग्रामीण जनतेवरही! लोकांना मंदिराचा मुद्दा भावनिक साद घालणारा ठरला. हजारो लोकांना अयोध्येला जाता आले.

देवभोळी, पापभीरू असलेली गोव्याची ग्रामीण जनता अशा तऱ्हेने भाजपच्या दावणीला बांधली गेली आहे. एकेकाळी ख्रिस्ती मतदार काँग्रेसचा हक्काचा होता. काँग्रेसने शेकडो चुका करूनही त्यांचे मत काँग्रेसला मिळणे चुकले नाही. आता त्यांची बाजू हिंदू मतदारांनी घेतली आहे, हा मतदार भाजपसाठी भरवशाचा आहे व आपल्याला भाजपची साथ दिली, तर वैयक्तिक फायदा होतो, असा समज त्याने करून घेतला आहे.

त्याउलट काँग्रेस. काँग्रेस पक्षाबरोबर ‘इंडिया’ युती असल्यामुळे ‘आप’, गोवा फॉरवर्ड दिमतीला आहे, त्यामुळे मते फुटण्याची कमी संधी आहे, परंतु व्यूहरचनेचा अभाव आहे. काँग्रेस पक्ष इतर घटक पक्षांवर विश्वास ठेवायला तयार नाही, त्यामुळे कामे वाटून घेतलेली नाहीत. मतदारांना बाहेर काढायला लागणाऱ्या यंत्रणेचाही अभाव आहे.

एका प्रखर विचारवंताने मला विचारले, ‘भाजप दोन्ही जागा जिंकतेय, सर्व मतदारांना बाहेर काढण्याची सक्ती केली होती. ‘राजा’चा तसा हुकूम होता. त्यामुळे त्यांनी सर्व मतदारांना ‘हाकत’ बाहेर काढले. ही निवडणूक शेवटी कोणत्या मुद्यावर लढली? स्थानिक प्रश्न, जात, धर्म? धर्मावर फूट?’

सगळे बरोबर आहे. आता भाजप का जिंकलीय? इतके लोक मोठ्या संख्येने बाहेर का आले? धार्मिक विभागणी पूर्ण झाली का? या प्रश्नाचा काथ्याकूट करत बसतील, परंतु सत्य एकच आहे. भाजपने लोकांना मोठ्या प्रमाणात बाहेर काढले, ते दोन्ही जागा जिंकू शकतात. काँग्रेस पक्षाला दारुण अपयश आले! लोकांना बाहेर काढून मतदान करायला लावण्याची त्यांची शक्ती आता लोप पावली आहे. ते केवळ अंडरकरंटवर अवलंबून राहतात. हा ‘करंट’ काय आहे, ते मात्र चार जूनलाच समजणार आहे, परंतु पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस उभारी घेऊ शकेल काय? या प्रश्नाचे उत्तर इतके सोपे नाही!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com