Jagannath Shankarsheth : दैवज्ञ ब्राह्मण समाजबांधवांशी हितगूज

Jagannath Shankarsheth : दैवज्ञ ब्राह्मण समाज हा मातृदेवतांचा पूजक आहे. कामाक्षी, कालिका, महालसा ह्या देवींचा तो भजक आहे. त्यामुळे समाजात स्त्रियांचा मान राखला जातो.
Jagannath Shankarsheth
Jagannath Shankarsheth Dainik Gomantak

दत्ता दामोदर नायक

जातीभेद न मानणाऱ्या व जातीमुक्त समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या मला दैवज्ञ ब्राह्मण समाज ही जातीवाचक संस्था आपल्या वर्धापनदिनाला आमंत्रित करते हा जसा माझ्या विचारांचा गौरव आहे तसाच दैवज्ञ ब्राह्मण समाज संकुचित नाही, तो उदारमतवादाकडे झुकलेला आहे ह्याचे द्योतक आहे.

दैवज्ञ ब्राह्मण समाजाने दरवर्षी संस्कृतचे प्रकांड पंडित आणि मुंबई महानगरीचे शिल्पकार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांची जयंती साजरी करावी.

दैवज्ञ ब्राह्मण समाजाला उज्ज्वल भूतकाळ आहे. एकेकाळी मराठ्यांना व पेशव्यांना दैवज्ञ ब्राह्मण समाजातले धनिक भांडवल पुरवत.

पोर्तुगीज काळात पोर्तुगीजांनी हिंदू गोमंतकीयांपुढे धर्म की जमिनी, मालमत्ता असा पर्याय ठेवला तेव्हा दैवज्ञ ब्राह्मणांनी स्थलांतर करणे पसंत केले. कॅथोलिक धर्मात धर्मांतरित झालेले फार थोडे दैवज्ञ ब्राह्मण आपल्याला गोव्यात आढळतात. पुढे पोर्तुगीजांनी दैवज्ञ ब्राह्मण समाजातील कारागिरांच्या कलेचे कौतुक केले. काही कारागिरांना पोर्तुगीज राणीचे दागिने करण्यासाठी पोर्तुगालला नेले व ह्या कलाकार समाजाला त्रस्त केले नाही.

नशिबाची साथ असती तर दैवज्ञ ब्राह्मण समाजातील पां. पु. शिरोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले असते. दैवज्ञ ब्राह्मण समाजाने थोर स्वातंत्र्यसैनिक व प्रागतिक विचारवंत श्यामराव मडकईकरांची स्मृती जतन केली पाहिजे. जनार्दन वेर्लेकर ह्यांनी गोमंत विद्या निकेतनची धुरा समर्थपणे वाहिली आहे.

प्रा. हरिश्चंद्र नागवेकरांनी कोंकणी चळवळीला भरीव योगदान दिले आहे. मोहन रायकर यांनी लघुउद्योगाच्या क्षेत्रात भरारी मारली आहे. सीए गौतम वेर्लेकर हे 'साॅल्टवाॅटर' नावाचा यशस्वी स्टार्टअप चालवत आहेत.

दैवज्ञ ब्राह्मण समाजात माझे अनेक मित्र आहेत. ह्या समाजातील माणसे दिलदार व मनमोकळ्या स्वभावाची असतात असा माझा अनुभव आहे.

दैवज्ञ ब्राह्मण समाजबांधव हे खवय्ये आहेत. गोमंतकीय खाद्यसंस्कृतीत त्यांनी फार मोठे योगदान दिले आहे. गोमंतकीय अन्न महोत्सव आता विशिष्ट जातीने हायजॅक केला आहे. अन्नसंस्कृतीला ज्ञातीय विशेषणे देणे चुकीचे आहे.

Jagannath Shankarsheth
Goa Today's News: RG च्या उमेदवारांचे अर्ज दाखल, राजकारण, गुन्हे विश्वातील गोव्यातील बातम्यांचा आढावा

दैवज्ञ ब्राह्मण समाज हा मातृदेवतांचा पूजक आहे. कामाक्षी, कालिका, महालसा ह्या देवींचा तो भजक आहे. त्यामुळे समाजात स्त्रियांचा मान राखला जातो.

दैवज्ञ ब्राह्मण समाजबांधव सुवर्णालंकार व हिऱ्याचे दागिने विकण्याच्या व्यवसायात आहेत. परंतु ह्या व्यवसायात आता दागिने करणारे कारागीर कमी होत आहेत. समाजबांधव सुवर्णालंकाराची केवळ विक्री करताना दिसतात.

दैवज्ञ ब्राह्मण समाजबांधवांना माझ्या दोन सूचना आहेत. एक - सुवर्णालंकार व हिऱ्याचे दागिने करणारे नवे कारागीर घडवण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण संस्था उभारावी. दोन - गोव्यात सुवर्णालंकार व हिऱ्यांच्या दागिन्यांचा म्युझियम करावा. ह्या म्युझियममध्ये गोव्याचे खास दागिने, उदाहरणार्थ सुरंगा वळेसर, पवनांची गळसरी, केसांत माळायचा चंद्र, कानांत माळायचा कान, बाहुभूषण फीत, गोट, पाटल्या, अंगठ्या, हार, कमरपट्टा असे विविध दागिने असावेत. म्युझियमच्या शेजारी सुवर्णालंकार विक्रीचे केंद्र असावे.

गोव्यातील दैवज्ञ ब्राह्मण समाजातील दोघा तरुणांचे मला जाहीर कौतुक करायचे आहे. विक्रम वेर्लेकर आणि पवन रायकर यांनी आपले स्वतःचे 'उल्हास' व 'इष्ट' हे ब्रँड्स बनवले आहेत. दैवज्ञ ब्राह्मण समाजातील तरुणांनी काळाची पावले ओळखली आहेत ही फार समाधानाची बाब आहे.

दैवज्ञ ब्राह्मण समाज धनसंपन्न आहे. ह्या समाजाने आपल्या ज्ञातीबांधवांव्यतिरिक्त अन्य ज्ञातीतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन अन्य ज्ञातीना अनुकरणीय आदर्श निर्माण करावा.

दैवज्ञ ब्राह्मण समाजात आंतरजातीय लग्ने होत आहेत. आंतरजातीय लग्नातून जन्मणारी संतती अधिक निरोगी, निरामय व बुद्धिमान असते याला विज्ञानाची व अनुभवाची साक्ष आहे.

दैवज्ञ ब्राह्मण समाज हा कौटुंबिक धंद्यात व्यस्त आहे. आज गोव्यातील अन्य समाजात भावाभावाची, भावाबहिणीची, वडिलमुलांची भांडणे होऊन धंदे बंद पडल्याची उदाहरणे आहेत. दैवज्ञ ब्राह्मण समाजाने आपल्या कौटुंबिक धंद्यातील भांडणे मिटवण्यासाठी Arbitration cell स्थापन करावे अशी मी सूचना करू इच्छितो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com