History Of Goa: गोव्यातील गावडा समाज मूळचा कुठला?

लोकांच्या भौगोलिक उत्पन्नाच्या ओळखीनंतर लादलेली व्यवस्था म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्था हे लक्षात येते तेव्हा पुष्कळ संभ्रम दूर होतो.
History Of Goa
History Of GoaDainik Gomantak
Published on
Updated on

तेनसिंग रोद्गीगिश

शेवटी आपण कोकण व गोव्यातील लोकांच्या मूळ स्थानाचे व त्यांचे एक अर्थपूर्ण चित्र मांडण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. सह्याद्रीच्या पलीकडचे वडूकर केव्हातरी किनारी मैदानात उतरले असावेत. ख्रिस्तपूर्व १०,००० ते २,००० दरम्यान कोकण किनारपट्टीच्या विस्तीर्ण भागात कोठेही ते स्थायिक झाले असावेत.

स्पष्टपणे सांगायचे तर, ही घटना नव्हती, तर एक प्रक्रिया होती. पण सोयीसाठी आपण हा कालावधी ख्रिस्तपूर्व ४,००० असे गृहीत धरू. त्यानंतर बराच काळ, क्षारपड माती वनस्पतींसाठी सुयोग्य व पोषक बनल्यानंतर, वडूकर नवीन कुरणांच्या शोधात येथे आले असावेत.

क्रॉफर्डच्या म्हणण्यानुसार, कोकण किंवा परशुरामाने गोवा व इतर सखल प्रदेश जिंकण्यापूर्वी अनेक सहस्र वर्षे घाटमाळाच्या धनगरांनी हा भाग त्यांच्या म्हशींसह पालथा घातला होता. (संदर्भ : क्रॉफर्ड, १९०९ : लेजेंड्स ऑफ द कोकण, २५)

हे किनारी कोकणातील ‘मूळनिवासी’ असू शकतात. किनारी मैदानात वडूकर येण्याच्या कालावधीविषयी काही संकेत आपल्याकडे आहेत. इनामगाव आणि संबंधित स्थळांच्या उत्खननाच्या आधारावर, विद्वानांचे मत आहे की सुमारे ख्रिस्तपूर्व १,०००मध्ये सह्याद्री प्रदेशावर दुष्काळाचे भीषण सावट पडले होते.

ख्रिस्तपूर्व सुमारे १०००मध्ये लोक हे गाव आणि इतर प्रदेश सोडून जाऊ लागले. (संदर्भ : क्लटन-ब्रॉक, २०१२ : ऍनिमल्स ऍज डॉमिस्टिकेज, ८९) अशाच प्रकारच्या दुष्काळाचा उल्लेख श्रवणबेळगोळ येथील शिलालेख क्र. १ मध्ये सापडतो. ‘विंध्य आणि निलगिरी यांच्यामध्ये बारा वर्षांचा दुष्काळ’ असल्याने जैन श्रुत-केवळीच्या शेवटच्या भद्रबाहूने उपासमारीपासून वाचण्यासाठी संपूर्ण संघ दक्षिणेकडे हलवण्याचा निर्णय घेतला;

ही घटना ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकाच्या शेवटी घडली. (संदर्भ : राइस, १८८९ : इन्स्क्रिप्शन ऍट श्रवणबेळगोळ, २) त्यामुळे, या सर्व लोकांनी ख्रिस्तपूर्व पहिल्या सहस्राब्दीमध्ये कुठेतरी स्थलांतर केले असावे. लागवडीखालील पिके आणि आहाराच्या सवयी यांची तुलना करता, इनामगावातील लोकांमध्ये आणि गोव्यातील लोकांमध्ये, विशेषतः गावडा किंवा कुणबी समुदायांमध्ये खूप साम्य आढळते.

History Of Goa
Independence Day: 15 ऑगस्ट आणि गोमंतकीयांच्या सुखदु:खाचा कल्लोळ

सध्याच्या कोकणातील रहिवाशांसह गोमंतकीय किनारपट्टीच्या मैदानात स्थलांतरित झालेल्या वडूकरांना ओळखणे सोपे नसेल; परंतु काही समुदाय निश्चितपणे ओळखले जाऊ शकतात. एक म्हणजे गोव्यातील काणकोण, सांगे आणि केपे तालुक्यांमधील विस्तीर्ण प्रदेशात खूप पूर्वीपासून असलेला वेळीप समाज.

त्यांच्या नात्यांची वीण व साम्यस्थळे पार सह्याद्रीच्या प्रदेशात त्यांनी मागे सोडलेल्या लोकांशी अजूनही स्पष्ट दिसतात. कोकण-कुणबी किंवा ‘काळे कुणबी’ असे ज्यांना म्हणतात, ते कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील तिनई, सुपा, दिगी, उल्वी, बर्ची, कुंभारवाडा आणि हल्याळ तालुक्यात आढळतात. ते सर्व कोकणी भाषेतील काही भिन्न बोली बोलतात आणि गोव्यातील वेळिपांशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत.

असेच साम्य गावडा किंवा कुणबी समुदायातही आढळते. किनाऱ्यावरील आणि आतील भागात राहणारे यांच्यात सांस्कृतिकदृष्ट्या भिन्नता आढळते. त्यांची वेशभूषा, आहाराच्या सवयी आणि भाषा ते राहत असलेल्या खेड्यातील इतर लोकांपेक्षा भिन्न आहेत. ते गोव्यात ख्रिश्चन आणि हिंदू दोन्हीमध्ये आढळतात. परंतु त्यांचे मूळ अद्याप सापडलेले नाही.

इतर समुदाय - क्षत्रिय किंवा ब्राह्मण - कोकणात येण्यापूर्वी ते या जमिनीने मालक होते, हे लोकपरंपरा मान्य करते. जरी काही लोक त्यांच्या वंशाचा उल्लेख वेगवेगळ्या ’जमाती’ना जोडून करत असले तरीही गावडा किंवा कुणबी आणि वेळीप एकाच गटातून येतात हे नाकारता येत नाही. धुमे यांच्या मते, कुणबी हा जातीय समूह नाही;

त्यात गावडा किंवा वेळीप किंवा अगदी क्षत्रिय यांचा समावेश असू शकतो. हा तर्क त्यांनी समाजाच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती आहे या वस्तुस्थितीचा संदर्भ घेत मांडला आहे. धुमे यांनी कुणबी शब्दाची व्युत्पत्ती शोधताना तो कुळंबी या शब्दावरून आला असावा, असे म्हटले आहे.

कुळवाडी आणि कुळंबी हे दोन्ही शब्द कुळ या शब्दावरून तयार झाले आहेत, ज्याचा अर्थ लागवडीखालील जमिनीचे निश्चित क्षेत्रफळ असा आहे. (संदर्भ : धुमे, २००९ : द कल्चरल हिस्ट्री ऑफ गोवा, ६६) हे अगदी वाजवी वाटते; परंतु ते निरीक्षण केलेल्या वास्तवाशी पूर्णपणे जुळत नाही; त्याला आणखी पुरावे प्राप्त होणे आवश्यक आहे.

History Of Goa
Independence Day: 15 ऑगस्ट आणि गोमंतकीयांच्या सुखदु:खाचा कल्लोळ

धुमे यांच्या मते, गावड्यांचे वेगळे समुदाय आहेत. त्यांनी त्यांची केळशी-कुठ्ठाळकर गावडा, सत्तरकर गावडा आणि भरवणकर गावडा, अशी विभागणी केली आहे. तथापि, ही विभागणी इतक्यापुरतीच मर्यादित आहे की, आणखीही काही पोटभेद आहेत, याविषयी त्यांनी विस्ताराने सांगितले नाही.

त्यांच्या मते केळशी-कुठ्ठाळकर गावडा हे कोळ आदिवासी आहेत जे सारस्वत ब्राह्मणांसह गोव्यातील सासष्टी येथील केळशी आणि कुठ्ठाळी येथे स्थलांतरित झाले. या गावांमध्ये केळशी-कुठ्ठाळकर गावडा स्थायिक होण्यापूर्वी इतर कोणता गावडा समाज अस्तित्वात होता का, की ब्राह्मणांनीच त्यांना तेथे स्थायिक केले होते, हे आम्हाला माहीत नाही.

त्याही पुढे जाऊन ते आम्हाला कळू शकेल असा कोणताही मार्ग नाही. लोकपरंपरेतील वस्तुस्थिती वगळता, या मूळ निवासी लोकांना ब्राह्मणांनी विस्थापित केले की, ब्राह्मन येण्यापूर्वीच क्षत्रियांनी विस्थापित केले होते? महत्त्वाचे म्हणजे, केळशी व कुठ्ठाळी येथील सध्याचे रहिवासी कोण आहेत? ते मूळ निवासी असलेले गावडा आहेत की, ते केळशी-कुठ्ठाळकर गावडा आहेत?

जेवढी माहिती ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्याबद्दल उपलब्ध आहे तितकीच कोकणातील सुरुवातीच्या स्थायिकांबद्दल उपलब्ध आहे. त्यामुळे, साहजिकच क्षत्रियाच्या खऱ्या ओळखीबद्दल बराच गोंधळ आहे असे दिसते. बहुतांश दिशाभूल करणारी संभ्रमावस्था चातुर्वर्ण्य व्यवस्थेतून उद्भवते.

जेव्हा आपण यातून बाहेर पडतो व लोकांच्या भौगोलिक उत्पन्नाच्या ओळखीनंतर लादलेली व्यवस्था म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्था हे लक्षात येते तेव्हा पुष्कळ संभ्रम दूर होतो. त्या क्षणी आपण काल्पनिक समुदायांऐवजी ऐतिहासिक गोष्टींशी संबंधित समुदायांचा विचार करू लागतो.

सतरकर गावडा किंवा भरवणकर गावडा यांच्या उत्पत्तीबद्दल धुमे यांनी फारसे काही सांगितले नाही. ते प्रथम सत्तरी तालुक्यातील अडवई गावात स्थायिक झाले आणि नंतर फोंडा येथील सावईवेरे येथे स्थलांतरित झाले या विधानाशिवाय धुमे आणखी अधिक प्रकाश यावर टाकत नाहीत.

History Of Goa
History Of Margao: मडगावचे शहरीकरण व कपेल

धुमे यांनी कोकणातील मूळ निवासींवर केलेल्या संपूर्ण चर्चेतून एक मुद्दा स्पष्ट होतो, जो आतापर्यंत कोकणातील पूर्व-ऐतिहासिक समुदायांच्या स्थलांतराचा सर्वांत व्यापक विचार आहे, तो म्हणजे सुरुवातीचे स्थायिक पूर्वेकडून पश्चिमेकडे गेले.

‘आदिम स्थायिक दख्खनच्या पठारावरून आले नाहीत, कारण तेथील मानवी वस्ती गोव्यानंतर निर्माण झाली’, असे स्पष्ट विधान धुमे यांनी केले असले तरीही त्यांनी नमूद केलेले जवळजवळ प्रत्येक पूर्व-ऐतिहासिक वसतीस्थान सत्तरी किंवा सांगे तालुक्यात आहे, क्वचितच मध्य भागातील तालुक्यांमध्ये आहे आणि किनारपट्टी भागातील तालुक्यांमध्ये नाही. हे आपल्या ‘पर्वतावरून खाली येण्याच्या’ सिद्धांताला पुष्टी देते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com