Gomantak Editorial: दहशतवादाची विषवल्ली

पुण्यासारख्या शहरांत ज्या पद्धतीने दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या संशयिताना ताब्यात घेतले जात आहे, त्यावरून ही विषवल्ली पसरविण्यात उच्चशिक्षितही सामील आहेत, हे समोर आले
Terrorism
Terrorism Dainik Gomantak

Gomantak Editorial: देशात दहशतवादाची पाळेमुळे खणत जावी, तितकी ती अधिक खोलवर रुजल्याचे आणि त्यामुळे सामाजिक शांतता, सौहार्दाला धोका असल्याचे निदर्शनाला येत आहे. अलीकडे पुण्यासारख्या शहरांत ज्या पद्धतीने दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या संशयिताना ताब्यात घेतले जात आहे, त्यावरून ही विषवल्ली पसरविण्यात उच्चशिक्षितही सामील आहेत, हे कटू वास्तव पुन्हा समोर आले आहे.

पुण्यात एका भूलतज्ज्ञाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून बरीच संवेदनशील माहिती तपासयंत्रणांना मिळाली आहे. घातपाती कृत्ये करण्यासाठी डॉक्टर आणि अभियंते आपली बुद्धी पणाला लावत असतील तर याला काय म्हणायचे?

या विध्वंसक कारवाया रोखण्यासाठी केवळ तपास यंत्रणाच नव्हे, तर सर्व सुरक्षा दले, सरकार आणि समाज यांच्यापुढे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे आणि त्याला तोंड देण्याची जबाबदारीही सर्वांची आहे. पुण्यात १८ जुलै रोजी पोलिसांनी भल्या पहाटे दुचाकीवरील तिघांना हटकले.

त्यात महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान आणि महम्मद युनूस महम्मद याकू साकी हे राजस्थान पोलिसांना हवे असलेले दहशतवादी सहज हाती लागले; त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे. कोंढव्यातील कादीर दस्तगीर पठाण ऊर्फ अब्दुल कादीर याने पकडलेले दहशतवादी (ग्राफिक डिझायनर)असल्याची बतावणी केली होती.

त्यांना राहण्यासाठी सदनिका दिली होती, तेथे ते गेली दीड वर्षे वास्तव्यास होते, असे आढळले. पुणे पोलिसांच्या या कारवाईनंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. पोलिसांनी शिताफीने पुण्यातील भूलतज्ज्ञ डॉ. अदनान अली सरकार याला ताब्यात घेतले.

पाठोपाठ रत्नागिरी जिल्ह्यातील अभियंता सिमाब नसरुद्दीन काझी यालाही दहशतवाद्यांना अर्थसहाय्य केल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले.

खरे तर जुलै महिना महाराष्ट्राच्या शांततेला धक्क्यावर धक्के देणारा ठरला. महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबई, पुणे आणि ठाण्यात व्यापक छापे घातले आणि चार जणांना ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधाच्या संशयावरून अटक केली. यातील अनेकांवर बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायद्यान्वये कारवाई केली आहे.

Terrorism
Kavlem Panchayat : कवळे ग्रामसभेत आला कचऱ्याचा मुद्दा ऐरणीवर

या सगळ्यांमधील समान दुवे शोधणे, त्यांची साखळी शोधून त्यामागे असलेल्या व्यापक कटाचा तपास करणे हे आता पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे. महिनाभरात पकडलेल्यांची पार्श्‍वभूमी पाहता ते देशभरात व्यापक कटकारस्थाने करून शांततेला गालबोट लावण्याच्या तयारीत होते, असे प्रथमदर्शनी स्पष्ट होते.

चोरलेल्या मोटारसायकलवरून जाताना पुण्यात ज्यांना हटकले ते रतलाममधील (मध्य प्रदेश) असून जयपूरमध्ये दहशतवादी कारवायांच्या संशयावरून त्यांचा शोध जारी होता. ज्या डॉक्टरला पकडले तो नामवंत भूलतज्ज्ञ असून, ‘इसिस’शी संबंधित असल्याच्या संशयावरून त्याची २०१६ आणि २०१७ मध्ये दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चौकशी केलेली होती.

Terrorism
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजच्या ताज्या किमती

‘एटीएस’च्या म्हणण्यानुसार रत्नागिरीत पकडलेला सिमाब काझी हाही उच्चशिक्षित अभियंता आहे. तो दहशतवादी कारवायांना आर्थिक पाठबळ देऊन खतपाणी घालत होता. जुलैच्या सुरुवातीला ज्यांना पकडले होते, त्यातही उच्चशिक्षितांचा सहभाग होता. या देशविरोधी कारवायांचा माग काढताना मुंबई, पुण्यापासून कोकणापर्यंत ही दहशतवादाची विषवल्ली फोफावल्याचे दिसते.

एवढेच नव्हे तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या जंगलाच्या परिसरात त्यांनी स्फोटके आणि अन्य चाचण्याही घेतल्याचे समोर येत आहे. पुण्यात पकडलेल्यांकडे जिवंत काडतुसे, लॅपटॉप, आयपॅड, पेन ड्राईव्ह, ड्रोन आणि त्याचे सुटे भाग, नकाशे आणि स्फोटकेसृदश्‍य पावडरही आढळली आहे.

त्यांनी पुण्यातील वास्तव्यात शेकडो ‘जीबी’ माहितीचा खजिना गोळा केला आहे. विविध प्रकारचे साहित्य संकलित केले आहे. देशातील संरक्षण, संशोधनविषयक अनेक संस्था, संघटना पुण्यात कार्यरत आहेत.

लष्कराच्या दक्षिण विभागाचे मुख्यालय आहे. हे लक्षात घेता ताब्यात घेतलेल्यांकडून मिळेलल्या माहितीच्या आधारे कसून चौकशी करणे, त्याचे विश्‍लेषण करणे तसेच ती अन्यत्र कुठे पुरवली गेली का? अशा सगळ्या बाबींची शहानिशा करावी लागेल.

बंदी घातलेली संघटना ‘सिमी’ असो, नाहीतर ‘इसिस’चे समर्थक असोत. त्यांच्या छुप्या कारवाया सुरूच आहेत, हाच या सगळ्याचा अर्थ. त्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत.

Terrorism
Goa Monsoon: राज्यातील बहुतांश धरणे तुडुंब; हंगामातील 85 टक्के पाऊस जुलैमध्येच!

माणसाच्या मनात द्वेषाने एकदा मूळ धरले आणि त्याला धार्मिकेचा रंग भरला की, विवेकाला तिलांजली दिली जाते. संवेदना आणि जाणीवा बोथट होतात. दहशतवाद हा त्याच मार्गाने नेणारा आत्मघातकी मार्ग आहे. ‘इसिस’ने जिथे मूळ धरले तिथे ती बोथट होत असली तरी तिने पेरलेले विखारी विचार आपल्या देशातील उच्चशिक्षितांना हाराकिरीच्या वाटेने नेत आहेत, ही चिंताजनक बाब आहे.

पोलिस आणि तपासयंत्रणांनी अशी प्रकरणे कठोरपणे हाताळण्यात हयगय करू नये. त्याचवेळी इसिसच्या प्रचाराला बळी पडून त्या मार्गाने जाऊ पाहणाऱ्यांना परावृत्त करण्याचे प्रयत्नही जारी ठेवले पाहिजेत. त्यासाठी समाजातील धुरिणांची, सामाजिक संस्थाची मदत घेतली पाहिजे. सध्या सण, व्रत-वैकल्याचा श्रावण सुरू आहे.

पाठोपाठ स्वातंत्र्यदिन, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र ते अगदी दसरा-दिवाळी असे सातत्याने उत्सवी वातावरण राहणार आहे. या काळात दहशतवादी कारवाया पुन्हा डोके वर काढू शकतात, असे चिंतेचे वातावरण पुन्हा घोंगावू लागले आहे. त्यामुळे सावध राहण्याची नितांत आवश्यकता आहे. जनतेची जागरुकताही महत्त्वाची.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com