Copy of Gomantak Banner  (70).jpg
Copy of Gomantak Banner (70).jpg 
क्रीडा

ISL : हैदराबादची दोन गोलच्या पिछाडीनंतर बरोबरी

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी : सामन्याच्या अखेरच्या चार मिनिटांत दोन गोल नोंदवून हैदराबाद एफसीने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत बंगळूर एफसीला पुन्हा एकदा विजयापासून दूर ठेवले. दोन गोलांची आघाडी घेऊनही माजी विजेत्यांना 2-2 गोलबरोबरीवर समाधान मानावे लागले.

सामना गुरुवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला. कर्णधार सुनील छेत्रीने नवव्या मिनिटास बंगळूरला आघाडी मिळवून दिली. कोझिकोडच्या 22 वर्षीय लिऑन ऑगस्टिन याने आयएसएल स्पर्धेतील पहिला वैयक्तिक गोल करताना 61व्या मिनिटास बंगळूरला मजबूत स्थिती गाठून दिली. सामन्याच्या 86व्या मिनिटास स्पॅनिश आघाडीपटू आरिदाने सांताना याने हैदराबादची पिछाडी एका गोलने कमी करताना अगदी जवळून अचूक फटका मारला. 90+1व्या मिनिटास बदली खेळाडू स्पॅनिश आघाडीपटू फ्रान सान्डाझा याने हैदराबादला बरोबरी साधून दिली. सांताना सामन्याचा मानकरी ठरला.

बंगळूर मोसमात सलग आठ सामने विजयाविना राहिला. या कालावधीत त्यांनी तीन बरोबरी व पाच पराभव पत्करले आहेत. एकंदरीत 14 लढतीतील त्यांची ही सहावी बरोबरी ठरली. त्यांचे आता 15 गुण झाले आहेत. त्यांना आता सातवा क्रमांक मिळाला आहे. हैदराबादने अपराजित मालिका सहा सामन्यांपर्यंत नेली. त्यांची ही सलग तिसरी बरोबरी ठरली. एकंदरीत 14 लढतीतील सातव्या बरोबरीमुळे त्यांचे 19 गुण झाले असून चौथा क्रमांक कायम आहे.

सेटपिसेसवर बंगळूर एफसीने सामन्याच्या सुरवातीस आघाडी मिळविली. सामना सुरू होऊन नऊ मिनिटे झालेली असताना क्लेटन सिल्वाच्या फ्रीकिकवर कर्णधार सुनील छेत्रीचे पेनल्टी क्षेत्रातील भेदक हेडिंग रोखणे हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याला शक्य झाले नाही. या 36 वर्षीय स्ट्रायकरचा हा मोसमातील पाचवा, तर चार लढतीनंतरचा पहिला गोल ठरला.

तासाभराच्या खेळानंतर 22 वर्षीय आघाडीपटू लिऑन ऑगस्टिन याने बंगळूरची आघाडी वाढविली. यावेळी हैदराबादच्या गचाळ बचावाचे प्रदर्शन घडले. सुनील छेत्रीच्या पासवर एरिक पार्तालूचा फटका हैदराबादच्या खेळाडूस आपटून लिऑनकडे गेला. चेंडूवर ताबा ठेवून कूच केलेल्या लिऑनला रोखण्यासाठी हैदराबादचा एकही खेळाडू नव्हता, त्याचा लाभ उठवत या युवा आघाडीपटूने गोलरक्षक कट्टीमनी याला सहजपणे चकविले.  

दृष्टिक्षेपात...

- सुनील छेत्रीचे मोसमातील 14 लढतीत 5 गोल

- एकंदरीत 88 आयएसएल सामन्यात सुनील छेत्रीचे 44 गोल

- लिऑन ऑगस्टिन याचा यंदा 7 आयएसएल लढतीत 1 गोल

- आरिदाने सांताना याचे मोसमातील 13 सामन्यात 7 गोल, एकंदरीत 27 आयएसएल सामन्यात 16 गोल

- फ्रान सान्डाझा याचा 5 आयएसएल लढतीत 1 गोल

- हैदराबादचे 18 गोल, तर 16 गोल स्वीकारले

- बंगळूरवर 19 गोल, तर त्यांनी केलेले 17 गोल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Kala Academy Viral Video: मंत्र्यांसारखे कला अकादमीचे लाईट्स रंग बदलतात; राजदीपचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Goa Today's Live News: 'रेड्या'च्या जत्रेसाठी माशेलहून जलमार्गे तरंगांचे मयेत आगमन

Goa Congress: पर्रीकरांनी विश्वास घातकी म्हटले त्याच गॉडमनला भाजपात प्रवेश; मोदी परिवारात देशद्रोही लोक - पाटकर

SCROLL FOR NEXT