sirsai temple
sirsai temple 
गोवा

डिचोलीतील लईराई देवस्थानची प्रसिध्द जत्रा यंदाही निर्बंधात

दैनिक गोमंतक

डिचोली: लाखो भक्‍तगणांचे श्रध्दास्थान असलेल्या डिचोली (Bicholim) तालुक्‍यातील शिरगाव (Shirgoan) येथील श्री लईराई देवस्थानच्या प्रसिध्द जत्रोत्सवावर यंदाही निर्बंध आल्याने, सलग दुसऱ्या वर्षी जत्रोत्सवाच्या दिवशी शिरगाव गावात दरवर्षीप्रमाणे जत्रोत्सवाचा उत्साह जाणवला नाही. गावात मंगलमय वातावरणाची चाहूल लागत होती, परंतू रविवारी सकाळपासून गावात सामसूम पसरली होती. त्यातच चक्रीवादळ आणि पावसामुळे गावातील सामसूमीच्या वातावरणात भर पडली होती. (Lairai temple in Dicholi is still under restrictions)

देवीच्या व्रतस्थ धोंडभक्‍तगणांना देवीच्या चरणांकडे जाण्याची ओढ लागली होती. गावागावात व्रत पाळलेल्या व्रतस्थ धोंडगणांमध्ये जत्रेचा उत्साह दिसून येत होता. मात्र जत्रेवर निर्बंध आल्याने आणि देवस्थान समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील तसेच विविध भागातील व्रतस्थ धोंड भक्‍तगणांनी संयम पाळला. जत्रोत्सवावर निर्बंध आल्याने भक्‍तगणांमध्ये निरुत्साह दिसून येत होता. तरीसुद्धा धोंड भक्‍तगणांनी व्रतस्थ ठिकाणी श्री लईराई देवीच्या नामाचा जप आणि ''श्री लईराई माता की जय'' आदी जयघोष करीत जत्रोत्सवाचा प्रत्यक्ष नसला, तरी घरीच श्रध्दापुर्वक आनंद द्विगुणीत केला. शेजारील राज्यांसह देश-विदेशात प्रसिध्दीस पावलेल्या शिरगावच्या जत्रेला यंदाही ''कोविड'' महामारीचे ग्रहण लागल्याने परंपरेप्रमाणे जत्रोत्सव साजरा न करण्याची नामुष्की यंदाही शिरगाव गावावर आली.

परंपरेप्रमाणे जत्रा साजरी न करण्याचा निर्णय, त्यातच गावात प्रवेशबंदी यामुळे दरवर्षीप्रमाणे काल (रविवारी)गावात भक्‍तगणांचा महापूर लोटला नाही, की देवीच्या नामाचा जयघोष दुमदुमला नाही. गडबड गोंधळ जाणवला नाही. मोगरीच्या फुलांच्या सुवासाचा दरवळही पसरला नाही. दुकानांची फेरीही भरली नाही. महत्त्वाचे म्हणजे जत्रोत्सवाचे वैशिष्ट्य असलेल्या पेटत्या होमकुंडातून धोंड भक्‍तगणांसहीत श्री लईराई मातेचे अग्निदिव्य अनुभवण्याची संधीही भाविकांना मिळाली नाही.  धोंडांनी व्रत पाळलेल्या काही ठिकाणी शनिवारी रात्री सामाजिक नियमांचे पालन करुन "व्हडले" जेवणाचा कार्यक्रम झाला. 

कडक नाकाबंदी!
जत्रोत्सव साजरा होणार नसल्याने श्री लईराई देवीचे मंदिर बंद करण्यात आले होते. मागील बुधवारपासून गावात जाणाऱ्या ''सीमा'' बंद करण्यात आल्या होत्या. गावात पोलिस जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. गावाबाहेरील व्यक्‍तींना गावात प्रवेशबंदी करण्यात आली होती. काल (रविवारी) जत्रेच्या दिवशी गावातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. देवीच्या धोंड भक्‍तगणांनी आपल्या घरीच व्रत पाळावे. जत्रेच्यादिवशी दिवशी कोणीही शिरगावात येऊ नये. घरीच देवीचे नामस्मरण करावे, असे आवाहनही देवस्थान समितीने केले होते. अस्नोड्याहून शिरगाव गावात जाणाऱ्या रस्त्यावर तसेच पैरा येथे नाकाबंदी करण्यात आली होती. तर अन्य मातीच्या रस्त्यावर अडथळे निर्माण करण्यात आले होते. तरीदेखील काल जत्रेच्या दिवशी काही भक्‍तगण देवीच्या चरणांकडे येण्याची शक्‍यता गृहीत धरून नाकाबंदी अधिक कडक करण्यात आली होती.

दरवर्षी जत्रेच्या दिवशी सकाळपासूनच धोंड आणि इतर भक्‍तगणांची शिरगावात पावले वळू लागतात. सकाळपासून भक्‍तांची गर्दी होत असते. नवीन धोंड मानविण्यासाठी सकाळीच शिरगावात दाखल होतात. मागील वर्षीप्रमाणे यंदाही हा अनुभव आला नाही. रात्री उशिरापर्यंत गावात शांततामय वातावरण पसरले होते. डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित हे परिस्थितीवर नजर ठेवून होते. त्यांनी सायंकाळी उशिरा शिरगावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. तर डिचोलीचे पोलिस निरीक्षक महेश गडेकर हेही पोलिस फौजफाट्यासह परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News Update: मुलाखतीदरम्यान विवस्त्र होण्याची मागणी, चिंबल येथील महिलेची सायबर पोलिसांकडे तक्रार

Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत कथित पैसे वाटपाबाबतचा टिकलोंचा दावा कोर्टाने फेटाळला: कार्लुस फेरेरा

Lok Sabha Election 2024: गोव्यातील इंडियन रिझर्व्ह बटालियनचे 920 पोलिस मतदानापासून राहणार वंचित?

Lok Sabha Election 2024: ''जगात आदर्श ठरलेली भारतीय लोकशाही नष्ट करण्याचा डाव''; गोव्यातून अलका लांबा कडाडल्या

Official Language Act: ''राजभाषा कायद्यात बदल करण्याचा कोणताही विचार नाही''; सरदेसाईंच्या आरोपावर CM स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT