ब्लॉग

Goa Tourism: पर्यटन सुधारणेचे कागदी घोडे

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: राज्य सरकारने सोमवारी पर्यटन सुधारणेचा फतवा जारी केला. पण, तो लागू करण्यासाठी आवश्यक यंत्रणा, मनुष्यबळ उपलब्ध आहे का, याचा विचार झाला नाही. त्यामुळे, कालच स्पष्ट झालेले फतव्याचे भवितव्य आज सिद्धही झाले. पर्यटन व्यवसायाबाबत सरकार गंभीर नाही. त्यामुळे, त्याविषयीची धोरणे, सुधारणा प्रत्यक्षात येतच नाहीत.

आदेशाची अंमलबजावणी कशी होते, त्‍यावर सारे यश अवलंबून आहे. कुठेही अनागोंदी कारभार उघड झाला की, तात्पुरती झाकपाक होते. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. तमाम गोवेकरांना उघडपणे दिसणारी ही पर्यटन व्यवसायातील घाण गेले वर्षभर सरकारला दिसत नव्हती का? त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कोणती उपाययोजना हाती घेतली गेली? आजही पर्यटन पोलिस नाहीत, रखवालदार नाहीत.

सक्षम व्यवस्थाच नाही. दलालांकडून पर्यटकांना लुटले जाते, समुद्रकिनारी फिरते विक्रेते, भिकारी यांचा पर्यटकांना प्रचंड त्रास होतो. समुद्रकिनारी पर्यटक पोलिसच नसल्यामुळे हे प्रकार राजरोस घडतात. त्याचा परिणाम म्हणजे व्यवसायाला पोषक व पूरक ठरतील असे पर्यटकच गोव्याकडे येत नाहीत.

पर्यटन व्यवसायातील अनागोंदी, सरकारचे नसलेले नियंत्रण यामुळे उच्च अभिरुची बाळगणारा, पर्यटन स्थळांची चांगली जाण असलेला पर्यटक गोव्याच्या दिशेने आपली पावले वळवत नाही. पर्यटकांना अपेक्षित असलेले पर्यटनस्थळ आपण निर्माण करू शकलो नाही, हे वास्तव आहे. आवश्यक सुविधा, सोय आणि सुरक्षा यासाठी अधिक पैसे मोजायला दर्जेदार पर्यटक कायम राजी असतो.

भारतात व जगभरात इतर ठिकाणी याचे प्रत्यंतर येते. अनेक पर्यटनस्थळांवर, म्युझियममध्ये जाण्यासाठी शुल्क आकारले जाते. त्याप्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध असल्यामुळे पर्यटकही हात आखडता घेत नाहीत. आपणही गोव्यात अशा प्रकारे शुल्क आकारून देखभाल, विकास व पायाभूत सुविधा उपलब्ध करू शकतो. पूर्वी नेत्रावळीत असा प्रयोग झालाही होता. पण, दुर्दैवाने त्याला विरोध झाला.

पर्यटन व्यवसायाला दर्जा प्राप्त करून द्यायचा असल्यास, अशा प्रकारचे निर्णय कठोरपणे राबवणे आवश्यक आहे. पर्यटनात विविधता, आकर्षण यासाठी लागणारे नैसर्गिक स्रोत आपल्याकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. निसर्गसौंदर्य आहे, अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत, स्पाइस फार्मिंग आहे, समुद्रकिनारे आहेत, देवळे, चर्च आहेत. त्याहूनही सर्वांत महत्त्वाची असलेली आदरातिथ्याची खूप मोठी परंपरा आहे.

इतके सगळे मनोहर असूनही आपल्या गोव्यात दर्जेदार पर्यटक फिरकत नाहीत. रस्त्यावर अन्न शिजवणारे, कुठेही दारू पिऊन पडणारे व पर्यटनास पोषक अशी कुठलीच अभिरुची न बाळगणारे पर्यटक गोव्याच्या वाट्यास येतात. प्रामाणिक व सचोटीने व्यवसाय करणारे व्यावसायिक नाहीत. उथळपणे वाहत्या गंगेत हात धुऊन घेणारे, वाट्टेल त्या मार्गाने पैसे कमावणारे व्यावसायिक, दलाल यांचा सुळसुळाट झाला आहे.

यावर ठोस व परिणामकारक दीर्घकालीन उपाययोजना करण्याऐवजी आपण दरवर्षी नवीन नियमावली जाहीर करतो. आधी जाहीर केलेल्या नियमावलीचा बोजवारा का वाजला याचा विचारही होत नाही. पर्यटन व्यवसायाची स्थिती, पायाभूत साधनसुविधा, पर्यटकांच्या दृष्टिकोनातून त्यांना हवे असलेले पर्यटन, स्वच्छता, सुरक्षितता यांचाही विचार होत नाही.

खून, फसवणूक, बलात्कार, सर्वत्र अस्वच्छता हेच जर पर्यटकांच्या वाट्याला येत असेल तर चांगला पर्यटक गोव्यात फिरकणार नाही. चांगले दर्जेदार पर्यटन स्थळ म्हणून गोव्याची प्रतिमा जगभरात निर्माण व्हावी, अशी तजवीज आपण करत नाही. आपण कॅसिनो, मद्य आणि मदालसा यात झिंगलेल्या गोव्याचा चेहरा जगासमोर प्रस्तुत करतो.

आधीच विद्रूप असलेला हा चेहरा येथील बकाल व्यवस्था भयानक करून सोडते. या भयानक चेहऱ्याकडे सौंदर्याची दृष्टी असलेला पर्यटक कसा बरे आकर्षित होईल? आपल्या पर्यटन व्यवस्थेची नियमित पाहणी, त्याचे ऑडिट करणारी व्यवस्थाही आपल्याकडे नाही. प्रशासकीय यंत्रणा दलालांच्या हातचे बाहुले बनली आहे.

प्रत्येकाचे हप्ते ठरलेले आहेत. वरपर्यंतचे कमिशनही ठरलेले आहे. अशा अवस्थेत नियमितपणे एकच गोष्ट केली जाते ती म्हणजे तात्पुरती डागडुजी. नवे नियम व्यवस्था सुधारावी या हेतूने न बनवता, ते ‘चरण्यासाठी नवे कुरण’ कसे तयार होईल याकडे अधिक लक्ष पुरवले जाते.

गोव्यातील पर्यटन व्यवसायात सुधारणा करण्यासाठी या अशा तात्पुरत्या नियमावल्या कुचकामी ठरतात. नियमावलींच्या झुलत्या पुलावर पर्यटन व्यवस्थित करण्याचा बोजा टाकून आपण निवांत बसल्यास, जे गुजरातमधील मच्छू नदीवरील मोरबी पुलाबाबतीत घडले तेच गोव्याच्या पर्यटनाचे होईल.

कपडे शिवणाऱ्यांनी पुलाची देखभाल केली, तर जे होईल तेच वातानुकूलीत कार्यालयात बसून नियमांचे कागदी घोडे नाचवणाऱ्यांनी पर्यटन सुधारणेच्या गप्पा हाणल्याने होईल. गोव्याच्या लोकसंस्कृतीची, भाषेची, निसर्गाची जाण असलेल्या व्यक्तींचा विचार होणे गरजेचे आहे. शाश्वत व्यवस्थेसोबत, आपला पर्यटक निवडण्याची क्षमताही आपण बाळगली पाहिजे. अन्यथा पर्यटन सुधारणेचे कागदी घोडे कितीही नाचवले, तरी त्यावरून सुधारणेच्या दिशेने प्रवास काही होणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bombay High Court: ''विदेशी नागरिक आपल्या देशात मंत्री कसा होऊ शकतो''; सिक्‍वेरा यांच्याविरोधात मिकी यांची हायकोर्टात याचिका

Chandel Water Treatment Plant: चांदेल जलशुद्धी प्रकल्पामध्ये ‘क्लोरीन’ गळती; अनर्थ टळला

Churchill Alemao: ''माझे मत सेक्‍युलर पार्टीलाच, पण काँग्रेसला...''; आलेमाव यांनी व्यक्त केली खंत

Goa Crime News: नागाळीत चोरट्यांचा 'सुळसुळाट', दोनापावलातूनही सोन्याचे दागिने लंपास; पोलिसांच्या दुर्लक्षाचा होतोय आरोप

Goa Crime News: पत्‍नीच्‍या खूनप्रकरणी दोषी पतीला कोर्टाने सुनावली जन्‍मठेपेची शिक्षा; 50 हजारांचा दंडही ठोठावला

SCROLL FOR NEXT