हैदराबादने चाखली विजयाची चव: आरिदानेच्या पेनल्टी गोलमुळे आयएसएलमध्ये ओडिशाला नमविले

Hyderabad FC wins this year ISL football tournament
Hyderabad FC wins this year ISL football tournament



पणजी : सामन्याच्या पूर्वार्धात स्पेनच्या आरिदाने सांताना याने केलेल्या पेनल्टी गोलमुळे गतमोसमात तळात राहिलेल्या हैदराबाद एफसीने यंदाच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत पहिल्या विजयाची चव चाखली. नव्वद मिनिटांच्या खेळात वर्चस्व गाजवत त्यांनी ओडिशा एफसीला १-० फरकाने नमविले.


बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर सोमवारी झालेल्या लढतीत हैदराबादने पूर्ण तीन गुणांची कमाई केली. आरिदाने सांताना याने सामन्याच्या ३५व्या मिनिटास केलेल्या पेनल्टी गोलमुळे हैदराबादने आघाडी प्राप्त केली, ती त्यांनी कायम राखत आयएसएल स्पर्धेतील ओडिशा एफसीविरुद्ध पहिला विजय साकारला. गोलरक्षक अर्शदीप सिंगच्या दक्षतेमुळे ओडिशाला मोठा पराभव टाळता आला.


सामन्याच्या पूर्वार्धात हैदराबादचे वर्चस्व राहिले आणि त्याची बक्षिसी त्यांना ३५व्या मिनिटास पेनल्टी गोलच्या रुपात मिळाली. हालिचरण नरझारी याचा गोलक्षेत्रातील फटका विफल ठरविण्याच्या प्रयत्नात चेंडू ओडिशाचा कर्णधार स्टीव्हन टेलर याच्या हाताला लागला. रेफरी तेजस नागवेकर यांनी थेट पेनल्टी फटक्याची खूण केली आणि टेलरला यलो कार्ड दाखविले. हैदराबादचा हुकमी खेळाडू आरिदाने सांताना याने फटका मारताना अजिबात चूक केली नाही, त्यामुळे मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला आघाडी मिळाली. गोलरक्षक अर्शदीप सिंग उजवीकडे झेपावत चेंडू अडविण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला.


विश्रांतीला फक्त एक मिनिट बाकी असताना हैदराबादला आघाडी वाढविण्याची सुरेख संधी होती, मात्र गोलरक्षक अर्शदीपच्या दक्षतेमुळे आरिदाने सफल ठरू शकला नाही. त्याचा फटका ओडिशाच्या बचावपटूस आपटूनही गोलरक्षकाने एकाग्रता ढळू दिली नाही. लगेच अर्शदीपने पुन्हा एकदा संघावरील संकट टाळले. यावेळी त्याने हालिचरण नरझारीचा फटका रोखला.


बदली खेळाडू लिस्टन कुलासोने ६७व्या मिनिटास चांगली मुसंडी मारली. त्यामुळे ओडिशाच्या बचावपटू जेरीस आले. चेंडूची दिशा योग्य नसल्यामुळे हैदराबादच्या खाती दुसऱ्या गोलची नोंद निश्चितच झाली असती. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना लिस्टनने आणखी एक चांगला प्रयत्न केला, पण त्याचा फटका गोलपोस्टवरून गेला.


सामन्यात ओडिशाची बचावफळी वेळोवेळी दबावाखाली आली, पण अर्शदीपने नेटसमोर भक्कम प्रदर्शन केले. ओडिशाच्या प्रमुख आक्रमकांना आज सूर गवसला नाही. परिणामी ५३व्या मिनिटास प्रशिक्षक स्टुअर्ट बॅक्स्टर यांनी हुकमी खेळाडू मार्सेलिन्हो याला माघारी बोलावले. त्याची जागा प्रेमजित सिंगने घेतली. उत्तरार्धात त्यांनी बरोबरीसाठी प्रयत्न केले, पण सफलता मिळाली नाही.

दृष्टिक्षेपात
- आयएसएल स्पर्धेत ओडिशाविरुद्धच्या तीन लढतीत हैदराबादचा पहिलाच विजय
- गतमोसमातील दोन्ही लढतीत ओडिशाची सरशी
- स्पेनच्या आरिदाने सांताना याचा १५व्या आयएसएल सामन्यात दहावा गोल

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com