रितेश, रॉय यांचा आज भाजपप्रवेश

roy & Ritesh Naik.
roy & Ritesh Naik.

अवित बगळे

पणजी :

काँग्रेसचे फोंडा मतदारसंघाचे आमदार रवी नाईक यांचे पूत्र रितेश व रॉय यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. उद्या (ता.६) दुपारी ४ वाजता भाजप कार्यालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात येईल. त्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या माहितीस प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दुजोरा दिला.
या महत्त्वाच्या घडामोडीआधी अयोध्येतील राम मंदिर शिलान्यास कार्यक्रमाचे औचित्य साधत मुख्यमंत्री, केंद्रीय आयुष राज्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, संघटन सचिव सतीश धोंड, सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर आणि सरचिटणीस दामोदर नाईक यांनी कुंडई येथे जाऊन ब्रह्मेशानंद स्वामींचे दर्शन घेतले. नाईक हे भंडारी समाजाचे असून हा समाज ब्रह्मेशानंद स्वामींना मानतो. थिवीचे आमदार किरण कांदोळकर यांनी भंडारी समाजावर भाजप अन्याय करत असल्याचा प्रचार सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने हे पाऊल टाकण्याचे ठरवले आहे.
फोंडा पालिका, प्रियोळ मतदारसंघ आणि शिरोडा मतदारसंघावर या राजकीय घडामोडींचा थेट प्रभाव पडणार आहे. यामुळे सध्या भाजप सरकारमध्ये मंत्रिपदी असलेले अपक्ष आमदार गोविंद गावडे यांची समजूत भाजपला काढावी लागणार आहे. शिरोडा, मडकई, फोंडा आणि प्रियोळ मतदारसंघात भाजपची पुढील रणनीती काय असेल हे आता हळूहळू स्पष्ट होत जाणार आहे. त्या परिसरातून भाजपच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत. त्यापैकी एक दोघेजण सध्या पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रिय आहेत. दिल्लीतही बऱ्यापैकी ओळख असलेले आहेत. त्यामुळे ही समीकरणे ध्यानात घेत पुढील निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पक्ष संघटनेसोबत कशी आखणी करतात यात त्यांचा कस लागणार आहे. मुळात गावडे हे मुख्यमंत्र्यांचे उच्च माध्यमिक विद्यालयातील मित्र असल्याने त्यांची समजूत आता त्यांनाच काढावी लागेल, असे दिसते. दरम्यान, रितेश व रॉय यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला आहे.

संपादन : महेश तांडेल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com