Ponda News : शॉक लागून ‘लाईन हेल्पर’ गंभीर; कुर्टी येथील घटना

Ponda News : फोंडा तालुक्यात महिन्याभरातील दुसरी घटना
Ponda
Ponda Dainik Gomantak

Ponda News :

फोंड्यात आज (सोमवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास वीज ट्रान्स्फॉर्मरवर काम करताना विजेचा धक्का लागल्याने सिद्धेश आनंद नाईक (३२) बांदोडा हा लाईन हेल्पर म्हणून काम करणारा कर्मचारी गंभीर जखमी झाला.

त्याच्यावर सध्या गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. राज्यात सध्या वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांना शॉक लागण्याचे प्रकार सुरूच असून महिन्याभरापूर्वी ढवळी येथेही असाच वीज लाईन हेल्पर जखमी झाला होता.

सकाळी कुर्टी - फोंडा भागातील सपना टाऊन परिसरात वीज दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे शटडाऊन घेण्यात आला होता. भूमिगत वीजवाहिन्यांच्या ट्रान्स्फॉर्मरला कनेक्शन देण्यासाठी या ट्रान्स्फॉर्मरवरील कनेक्शन तोडण्याचे काम सुरू होते.

यावेळी ट्रान्स्फॉर्मरवर क्रूझ कुलासो व अजीत नाईक हे दोघे लाईनमन काम करीत असताना सिद्धेश आनंद नाईक, बांदोडा हा लाईन हेल्पर साहित्य देण्यासाठी वीज ट्रान्स्फॉर्मरवर चढला असता त्याचा ‘अर्थिंग'' वायरशी संपर्क आल्याने विजेचा धक्का बसला. यावेळी आगीच्या भडक्याने सिद्धेश नाईक याचे हात होरपळले असता क्रूझ कुलासो याने हातातील प्लास्टिकचे आवरण असलेल्या कटरने सिद्धेशला खाली ढकलले, त्यामुळे सिद्धेश नाईक खाली पडला पण बचावला.

त्याला गंभीर जखमी अवस्थेत फोंडा आयडी इस्पितळात दाखल करण्यात आले व तेथून नंतर गोमेकॉत पाठवण्यात आले. आता त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, वीज दुरुस्तीवेळी खात्याच्या कर्मचाऱ्यांना अपघात होण्याचे प्रकार वाढले असून वरिष्ठांकडून या कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही का, असा सवाल केला जात आहे.

महिन्याभरापूर्वी झाला होता अपघात!

तिस्क - फोंड्यात वीज ट्रान्स्फॉर्मरवर काम करीत असताना गेल्या २४ एप्रिलला उपेंद्र नाईक (वय ३८) आपेव्हाळ - प्रियोळ हा लाईन हेल्पर असाच जखमी झाला होता. विजेचा शॉक लागल्याने तो खाली पडून जखमी झाला होता. एका वाहिनीचा वीजप्रवाह बंद न झाल्याने त्याला शॉक लागला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. सध्या उपेंद्र नाईक कामावर रुजू झाला आहे.

Ponda
Panaji News : गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी पणजीत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

क्रूझ कुलासोचे प्रसंगावधान

सिद्धेशला शॉक लागून हात होरपळत असल्याचे पाहून लाईनमन क्रूझ कुलासो याने हातात प्लास्टिकचे आवरण असलेल्या कटरने सिद्धेशला खाली ढकलले आणि क्रूझने स्वतःही खाली उडी ठोकली. त्यामुळे सिद्धेश बचावला. क्रूझने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सिद्धेशचे प्राण वाचले, पण क्रूझलाही खरचटले.

राज्यात सध्या वीज खात्यात अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यात काहीजणांचा बळीही गेला आहे. अशाप्रकारचे अपघात होऊ नये म्हणून वीज खात्याने खबरदारी घ्यायला हवी. छोट्याशा चुकीमुळे जीव जाऊ शकतो, त्यामुळे वीज खात्याने सतर्कता बाळगायला हवी. वीज खात्याकडे आता पुरेसा अधिकारी वर्ग आहे, असे प्रकार नेमके का आणि कसे होतात, याकडे त्यांचा कटाक्ष असायला हवा तरच भविष्यात असे अपघात आपण टाळू शकतो.

- नीळकंठ नाईक (स्थानिक पंचसदस्य कुर्टी - खांडेपार)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com