फर्मागुढीत सरकार पाडण्याचे ‘राजकारण’!

chess
chess

अवित बगळे, नरेंद्र तारी

पणजी, फोंडा :

मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांशी झालेला तथाकथित ‘विसंवाद’ आणि त्यानंतर उद्‌भवलेली परिस्थिती यामुळे राज्यात सध्या अफवांना पीक आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी सोशल मीडियावर एक मेसेज व्‍हायरल होता आणि प्रत्येकजण तो पुढे करीत होता..! या मेसेजमुळे राजकारण्यांची झोप तर उडालीच, पण सर्वसामान्य माणूसही चक्रावून गेला. कारण, चक्क...सरकार पाडण्यासंबंधीचा हा मेसेज होता.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्‍याने या रुग्णांची व्यवस्था आता इस्पितळातून विविध वसतिगृहात करण्यात आली आहे. वसतिगृहात जरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍णांना ठेवले, तरी त्यांची व्यवस्था काय आहे, यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी डॉक्‍टर्स तसेच इतर सरकारी अधिकाऱ्यांसमवेत फर्मागुढी - फोंड्यातील कोरोना केंद्रांना भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आणि आवश्‍यक सूचना केल्या.

फर्मागुढी भेटीचे झाले निमित्त...
फर्मागुढी - फोंडा हा परिसर मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांच्या मतदारसंघात येतो, त्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या या भेटीचे काहीजणांनी भांडवल करून हा सरकार पाडण्याचा ‘बॉम्‍ब’च टाकला. मेसेजमध्ये तर चक्क विश्‍वजित राणे यांनी सरकार पाडण्यासाठी माजी मंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांची भेट घेतली. तसेच पुढील मंत्रिमंडळाची रूपरेषा ठरवण्यात आली आणि सुदिन ढवळीकर यांनीही मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचे, कुणाला नाही, याची सूचनाही केल्याचे या सोशल मीडियावरील मेसेजमध्ये म्हटले होते.
सोशल मीडियावरील सरकार पाडण्याच्या या मेसेजमुळे फोंड्याबरोबरच राज्यात इतर ठिकाणीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.

...आणि सुरू झाली फोनाफोनी!
व्‍हायरल होणाऱ्या मेसेजमुळे काहीजणांनी सुदिन ढवळीकर तसेच विश्‍वजित राणे यांच्या निकटवर्तीयांना फोन केले. खुद्द आमदार सुदिन ढवळीकर यांना यासंबंधी विचारले असता, त्यांनी हसून, ही तर केवळ अफवा असल्याचे सांगून या विषयावर पडदा पाडला. न्यायालयात मगो पक्षाचे दोन आमदार फुटून गेल्याने त्यांच्या अपात्रतेचा निवाडा बाकी आहे. त्यामुळे सरकार पाडण्याचे कारणच काय, असा सवालही त्यांनी केला आहे. दरम्यान, विश्‍वजीत राणे यांनीही अशाप्रकारची सरकारची पाडापाडी करण्याचा कुणाचाही उद्देश नसल्याचे सांगून अफवेवर शिक्कामोर्तब केले. आता ही अफवा असेलच, कारण सध्या तरी सरकार पाडण्याचे आणि सरकार चालवण्याचे धाडस गोव्यात तरी कुणाजवळ नाही, हेच खरे.

सरकार चालवण्याची नसती आफत!
सध्या तरी सरकार पाडण्याचे राजकारण करण्याचे कुणी धाडस करणार नाही, कारण एक म्हणजे सरकारकडे पुरेसा पैसा नाही, आधीच पैशांची तंगी, कामे अडलेली, लोक बेजारलेले आणि दुसरे म्हणजे म्हणजे सतावणारी कोरोनाची महामारी, वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या. त्यामुळे सरकार पाडले तरी पैसे आणायचे कुठून, सरकार चालवायचे कसे, कोरोनाचा फैलाव रोखायचा कसा, हा मोठा प्रश्‍न आहे. इतर कुठलीही सोंगे घेता येतात, पण पैशांचे नाही हे राज्यकर्त्यांना पुरेपूर माहिती आहे...नाही का!

भाजपचे वरिष्ठ नेतेही बुचकळ्यात
एरव्ही उठसूठ सायबर गुन्हे विभागाचा हवाला देणाऱ्या सरकारनेही हा संदेश नेमका कुठून उगम पावला, हे शोधून काढण्याची दिवसभर तसदी घेतली नाही. भाजपच्या नेत्यांकडूनच विचारणा होऊ लागल्याने या गोंधळात अधिक भर पडली. आरोग्यमंत्री राणे हे सोमवारनंतर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील त्यात ढवळीकर (सार्वजनिक बांधकाममंत्री), सुभाष शिरोडकर (पंचायतमंत्री), माविन गुदिन्हो (वाहतूक), ग्लेन टिकलो (बंदरे व ग्रामीण विकास), मिलिंद नाईक (वीज), जेनिफर मोन्सेरात (महसूल), दयानंद सोपटे (पर्यटन), फिलीप नेरी (जलसंपदा), गोविंद गावडे (कला व संस्कृती) आणि प्रवीण झांटये (कृषी) हे मंत्री असतील असे नमूद केले होते. मात्र, या संदेशाने आज पावसाळी हवामानातही राजकीय वातावरण गरम केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com