Panaji News : चुकीच्या मानसिकतेचा फेणीला फटका; बारचालकांनी प्रचार, प्रसार करणे गरजेचे

Panaji News : दरम्यान शिरोडकर म्हणाले, जर फेणीला मानाचे स्थान मिळवून द्यायचे असेल तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवायचे असेल तर राज्यातील बारमालकांनी आपल्या बारमध्ये फेणी विकणे गरजेचे आहे. तिचा प्रचार, प्रसार करणे गरजेचे आहे.
Panaji
Panaji Dainik Gomantak

गंगाराम आवणे

पणजी, आमच्या पूर्वजांंनी आम्हाला फेणी दिली; परंतु फेणीला देशी दारू, गरीबांचे पेय असे संबोधून हिणविले जाते. फेणीची नशा अधिक येते, फेणी प्यायल्याने वास येतो अशा आपल्या चुकीच्या मानसिकतेमुळे फेणी मागे पडली असून गोव्यातील अनेक बारमध्ये फेणी विकलीच जात नसल्याची खंत पाब्लोज बारचे चालक अनंत शिरोडकर यांनी व्यक्त केली.

काजू महोत्सवात कला अकादमी येथे ‘प्राचीन आत्मा नवीन गाथा : फेणी संस्कृतीचा बदलता चेहरा’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात शिरोडकर बोलत होते. या चर्चेत ‘गोंयची फेणी’चे यश सावर्डेकर, ‘दि फेनी प्रोजेक्ट’च्या आयिशा सांघी, ‘जीआयएटी बिव्हरेजीस’चे राज दिवकर, ‘आनी एक’चे कार्लाईल गोम्स यांनी सहभाग घेतला होता.

दरम्यान शिरोडकर म्हणाले, जर फेणीला मानाचे स्थान मिळवून द्यायचे असेल तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवायचे असेल तर राज्यातील बारमालकांनी आपल्या बारमध्ये फेणी विकणे गरजेचे आहे. तिचा प्रचार, प्रसार करणे गरजेचे आहे. राज्यातील महत्त्वाच्या बारमध्ये तसेच मोठ्या तारांकित हॉटेलमध्ये ग्राहकांना फेणी दिली जात नाही.

मी माझ्या बारमध्ये सात-आठ प्रकारच्या फेणी विकतो. ज्यात जिरा फेणी, जिंजर फेणी तसेच इतर प्रकारच्या फेणींचा समावेश असतो. ज्यांना फेणीबाबत माहिती नाही त्यांना माहिती देतो, कॉकटेल बनवून देतो. आमच्या बारमध्ये इतर मद्यांच्या तुलनेत फेणी अधिक विकली जाते व मागणीदेखील मोठ्या प्रमाणात आहे.

Panaji
Manoj Parab: आरजीचे अध्यक्ष, उत्तर गोवा उमेदवार मनोज परब यांच्याविरोधात कोणते पाच गुन्हे दाखल आहेत?

कॉकटेल संस्कृती रुजतेय

मागील काही वर्षांत कॉकटेल कल्चर (संस्कृती) देशात वाढत आहे. लोक नवनवीन मद्याचे प्रकार चाखू इच्छितात. आपण पारंपरिक फेणीपासून विविध प्रकारची कॉकटेल करू शकतो, त्यात मसाले, मध, तसेच इतरांचे अर्क घालून फेणी तयार करू शकतो.

आमच्याकडे लेमन, मध तसेच विविध प्रकारच्या फेणी उपलब्ध आहेत, त्यांना चांगली मागणी आहे. पारंपरिक फेणीसोबतच तिला उत्तम गुणवत्ता देत चांगले मार्केटिंग केल्यास येत्या काळात फेणीला चांगले दिवस येतील, यात शंका नसल्याचे कार्लाईल गोम्स यांनी सांगितले.

फेणीसाठी परवानगी मिळविणे कठीण

राज्यातील अनेक तरुण फेणीसंबंधी चांगले काम करू इच्छितात; परंतु सरकारी यंत्रणेची प्रक्रिया, लागणाऱ्या परवानग्या मिळविणे अतिशय कठीण होऊन बसते. जर फेणीला जागतिक स्तरावर नेण्यात आले तर येथील शेतकऱ्यांच्या मिळकतीतदेखील वाढ होईल.

यासाठी सरकारने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. तसेच फेणीसंबंधी आपण कशाप्रकारचे काम करत आहोत, याबाबत चर्चासत्रात सहभागी झालेल्या वक्त्यांनी विचार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com