Loksabha Election 2024 : खलपांच्‍या मानगुटीवर म्‍हापसा अर्बनचे भूत; श्रीपादवर निष्क्रियतेचे आरोप

Loksabha Election 2024 : शिवरायांविरोधी वक्तव्‍यामुळे कॅप्‍टन, ‘पार्टी गर्ल’ इमेजमुळे पल्लवी ट्रोल
Goa | Adv. Ramakant Khalap
Goa | Adv. Ramakant KhalapDainik Gomantak

सुशांत कुंकळयेकर

मडगाव, लोकसभा निवडणुकीच्‍या प्रचाराला एका बाजूने रंग चढत असतानाच विविध पक्षांच्‍या रिंगणात असलेल्‍या उमेदवारांच्‍या विरोधात त्‍यांनी आधी केलेल्‍या कर्मांचा उल्‍लेख करून समाजमाध्‍यमांवर त्‍यांना ट्रोल करणे सुरू झाले आहे.

उत्तर गोव्‍यातील काँग्रेसचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांना बंद पडलेल्‍या म्‍हापसा अर्बन बँकेवरून कात्रीत पकडण्‍याचा प्रयत्‍न होत आहे, तर मागच्‍या पाच निवडणुका जिंकलेले भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांच्‍यावर निष्‍क्रियतेचा ठपका ठेवून त्‍यांना नाउमेद करण्‍याचे प्रयत्‍न होत आहेत.

सध्‍या समाजमाध्‍यमांवर सर्वांत चर्चेत जर कोणता विषय असेल तर तो रमाकांत खलप यांची म्‍हापसा अर्बन बँक. ज्‍यांना बँक सांभाळता आली नाही, ते देश सांभाळण्‍याची भाषा कशी करतात? अशा पोस्‍ट समाजमाध्‍यमांवर फिरत आहेत. दुसऱ्या बाजूने बँक खलप भाईंमुळे नव्‍हे तर सरकारच्‍या अनास्‍थेमुळे बंद पडली अशा त्‍यांच्‍या समर्थनात पोस्‍ट येऊ लागल्‍या आहेत.

Goa | Adv. Ramakant Khalap
Loksabha Election Goa : काँग्रेसला ‘लीड’ देण्याचे युरींपुढे आव्हान

श्रीपाद नाईक यांच्‍याविरोधात वैयक्तिकरीत्या कसलेही आरोप झाले नसले तरी मागच्‍या २५ वर्षांत त्‍यांनी खासदार म्‍हणून केले तरी काय? अशा आशयाची टीका करत असतानाच कुठल्‍याही पंचायत निवडणुकीत हरलेल्‍या उमेदवाराने जेवढे लोकांसाठी काम केले तेवढेही भाऊ काम करू शकले नाहीत अशा पोस्‍ट फिरत आहेत.

काँग्रेसचे उमेदवार असलेले कारगिल युद्धातील हिरो कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस हेसुद्धा यातून सुटलेले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या विरोधात फा. बोलमॅक्‍स परेरा यांनी टिप्‍पणी केल्‍यावर त्‍यांच्‍याविरोधात गोव्‍यात गदारोळ माजला होता. त्‍यावेळी कॅप्‍टन फर्नांडिस यांनी त्‍यांना पाठिंबा दिला होता. त्‍यामुळे आता त्‍यांनाही ट्रोल केले जात आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणारा राष्‍ट्रप्रेमी कसा? असा सवाल उपस्‍थित करण्‍यात येत आहे.

अमित पालेकर आता स्‍वच्‍छ झाले का?

दक्षिणेतील काँग्रेसचे उमेदवार कॅप्‍टन विरियातो फर्नांडिस यांनी ‘आप’चे गोवा संयोजक अमित पालेकर यांचा हात ओल्‍ड गोवा येथील बेकायदा बांधका‍म प्रकरणात आहे अशी टीका केली होती.

आता विरियातो हे पालेकर यांचाच आधार घेऊन निवडणूक लढवत आहेत. त्‍यामुळे आता पालेकर स्‍वच्‍छ चारित्र्याचे झाले का? असा सवाल करून नेटकरी त्‍यांना ट्रोल करत आहेत.

पल्लवींना संबोधले गेले ‘बेबी डॉल’

दक्षिण गोव्‍याच्‍या भाजप उमेदवार पल्‍लवी धेंपे यांनी उमेदवारी अर्ज भरला त्‍याचवेळी नंदन कुडचडकर यांच्‍या पार्टीत सहभागी झालेल्‍या आणि वेस्‍टर्न आऊट-फीटमध्‍ये असलेल्‍या पल्‍लवींचा फोटो समाजमाध्‍यमांवर टाकून त्‍यांना ‘पार्टी गर्ल’ आणि ‘बेबी डॉल’ असे म्‍हणून ट्रोल केले गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com