मडगाव पालिकेची आजही ‘काम्र’ म्हणून ओळख

 Madgaon Municipal Building is still known as Kamr
Madgaon Municipal Building is still known as Kamr

नावेली: मडगाव नगरपालिका इमारतीला आजही मडगाव तसेच सासष्टीतील लोक काम्र इमारत म्हणून ओळखतात. कारण संपूर्ण सासष्टी तालुका मर्यादित ही पालिका होती. पूर्वी मडगावात जुन्या बाजारात पालिका इमारत होती. त्यानंतर पालिकेचे कार्यालय मडगाव नगरपालिका इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. १९६२ साली गोवा पंचायत राज कायदा आला आणि मडगाव शहर मर्यादित पालिका निवडणुका झाली. मात्र, १९६२ ते १९६८ पर्यंत नाव काम्र म्युनिसिपल दे सालसेत हेच उरले. त्यानंतर १९६८ मध्ये गोवा दमण दिव कायदा केला.

१९७२ मध्ये पालिकेची पहिली निवडणूक झाली व बाणावलीचे आमदार वासुदेव ऊर्फ अण्णा सरमळकर मडगाव पालिकेचे पहिले अध्यक्ष बनले. मडगाव पालिका इमारतीची पायाभरणी १९०१ मध्ये घालण्यात आली होती, तर इमारत १९०५ मध्ये बांधून पूर्ण झाली होती. मडगाव पालिका इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे  ही इमारत दुर्मिळ असून केवळ युरोप देशात अशा इमारती आढळून येतात. पालिका इमारतीची उंची, व्हरांडा असे अन्य कुठलेही बांधकाम दिसून येत नाही. या इमारतीला स्ट्रीट लेव्हल व्हिव म्हणून ओळखले जाते, असे माजी नगराध्यक्ष वाल्मिकी फालेरो यांनी दिली. त्यावेळचे गव्हर्नरांचे अधिकारी गार्याद यांच्या देखरेखीखाली या इमारतीचे काम करण्यात आले होते. ही इमारत केवळ पालिका इमारत म्हणून बांधण्यात आली होती.

पूर्वी मडगावची लोक संख्या ६००० एवढी होती. त्यावेळी केवळ १५ नगरसेवकांचे पालिका मंडळ होते. त्यात एक स्विकृत नगरसेवक पालिका मंडळात घेतला जात असे. त्यानंतर हा आकडा २० व सध्या २५ नगरसेवकांचे पालिका मंडळ झाले आहे. एकेकाळी उच्च विद्या विभूषित सुशिक्षित नगरसेवक निवडून जात असत. मात्र, आता कुणी पालिका निवडणुकीत उभा राहिलेला उमेदवार सुशिक्षित आहे काय हे न तपासता कुणालाही निवडून देतात.

१९८५ ते १९८७ साली आपली मडगाव पालिकेच्या नगराध्यक्षपदी निवड झाली होती. आपल्यासोबत पालिका मंडळामध्ये १९८५ ते १९९० साली मडगाव पालिकेचे माजी नगरसेवक लुईस आलेक्स कार्दोज ऊर्फ माम कार्दोज हे मंत्री बनले. मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर हे उपमुख्यमंत्री पदावर पोहोचले. दिगंबर कामत मुख्यमंत्रिपदावर पोहचले. तसेच स्विकृत नगरसेवक विजय सरदेसाई हे उपमुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले.  नगरसेवक ते गोवा सरकारात मंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री होण्याची क्षमता या पालिका मंडळात असल्याचे दाखवून दिले आहे, असे फालेरो यांनी सांगितले.

सुमारे १९०० साली मडगावात रेल्वे लाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले, त्यावेळी मडगावात जुन्या रेल्वे स्थानक परिसरात तसेच मालभाट परिसरात जंगल होते. मडगावचा विकास करण्यासाठी एरफाद आफाद आल्बुकर्क यांनी दोन पालिका इमारती बांधल्या, तिठा बांधला. आजही हा तिठा आहे, परंतु आज त्याचे मार्केटमध्ये रुपांतर झाले आहे. मडगावात मार्केट इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर जुन्या बाजारातील पालिकेचे कार्यालय मडगाव पालिका इमारतीत स्थलांतरित करण्यात आले, अशी माहिती फालेरो यांनी दिली.

मडगाव पालिकेत महिलांनाही स्थान देण्यात आले असून आजपर्यंत सात महिलांची नगराध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे. आजवरचे मडगावचे नगराध्यक्ष - वासुदेव सरमळकर, गजानन गवंडळकर, मिल्टन कुतिन्हो, डॉ़. गोपाळ वैद्य, अॅड. मॅथ्यू डिसा, वाल्मिकी फालेरो, अजित हेगडे, संतोष रायतूरकर, एलीन कुलासो, शांताराम कदम, मोनिका डायस, घनःश्याम शिरोडकर, कमलिनी पैंगीणकर, डोरीस टेक्सेरा, पिएदाद नोरोन्हा, राजेंद्र आजगावकर, जॉन्सन फर्नांडिस, सावियो कुतिन्हो, सुशीला नायक, दयानंद देऊलकर, गोंझाक रिबेलो, आर्थुर डिसिल्वा, डॉ. बबिता आंगले प्रभुदेसाई  व आता पुजा नाईक या मडगाव पालिकेच्या नगराध्यक्ष आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com