Loksabha Election 2024 : उमेदवारीनंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Loksabha Election 2024 : काँग्रेसमध्ये यादवी : उत्तरेत ॲड. रमाकांत खलप, दक्षिणेत कॅप्टन विरियातो फर्नांडिसना संधी; रुसवे-फुगवेही सुरूच
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 Dainik Gomantak

Loksabha Election 2024 :

पणजी, लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तब्बल २० दिवसांनी निवडणुकीचे वातावरण तयार होण्यास सुरवात झाली. कॉंग्रेसने उत्तर गोव्यातून ॲड. रमाकांत खलप आणि दक्षिण गोव्यातून कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणे सुरू झाले.

गेले काही दिवस राज्यात कुठे आहे निवडणूक, असा प्रश्न पडावा इतकी शांतता राजकीय वर्तुळात होती. केवळ भाजप प्रचाराच्याच बातम्या दिसत होत्या. आज झालेल्या शाब्दीक चकमकी आणि रुसव्या- फुगव्यांमुळे यंदाची ही लोकसभा निवडणूक रंगतदार होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

विरियातो यांनी त्यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना लक्ष्य केले. गोव्यातील एक नावाजलेली सहकारी बँक अवसायनात ज्या व्यक्तीच्या देखरेखीखाली गेली, त्याच व्यक्तीला उमेदवारी जाहीर करणे म्हणजे देशभराप्रमाणे उत्तर गोव्यातही काँग्रेस पक्षाला डबघाईस नेण्यासारखे आहे. उमेदवारावर आज विरोधक नव्हे, तर खुद्द काँग्रेस नेतेच टीका करत आहेत, असा टोला वेर्णेकर यांनी हाणला.

Loksabha Election 2024
Goa Congress: मोजक्या नेत्‍यांमुळेच काँग्रेसची पीछेहाट, संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज; एल्‍वीस गोम्‍स

कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाची वानवा : वेर्णेकर

भाजपने उत्तरेत एका मुरलेल्या अनुभवी भंडारी नेत्याला उमेदवारी दिली आहे, तर आरक्षण नसतानाही दक्षिण गोव्यात एका महिलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. काँग्रेसने कोणत्या निकषावर उमेदवारी जाहीर केली, हे स्पष्ट करावे, असे आव्हान वेर्णेकर यांनी दिले. गोव्यातील उमेदवार जाहीर करण्यासाठी १४-१५ व्या टप्प्यापर्यंत वाट पाहावी लागणे, ही काँग्रेसमध्ये नेतृत्वाची दिवाळखोरी दर्शवते, असा आसूड वेर्णेकर यांनी ओढला.

पल्लवी धेंपे यांचा प्रखर पलटवार

ट्विटरवर पल्लवी धेंपे यांनी विरियातो यांच्या आरोपाला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी नमूद केले, की माझ्याबद्दलच्या टिप्पण्या केवळ दुर्दैवी नाहीत, तर त्या विरोधकांचे स्पष्ट अज्ञान दर्शवितात. क्रीडा, शिक्षण, प्रसारमाध्यमे आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रांत दोन दशकांहून अधिक काळ पसरलेल्या माझ्या समाजसेवेकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यांच्या टिप्पण्या पूर्वग्रह दर्शवतात. स्त्रीला घरातील समस्या समजत नाहीत, हे विधान अत्यंत दुर्दैवी आहे.

३० वर्षे खलपांचे मौन : कॉंग्रेसच्या उमेदवारीचे दावेदार आणि प्रदेश सरचिटणीस विजय भिके यांनीही आता नाराजीचा सूर आळवला आहे. परब म्हणाले की, अ‍ॅड. खलप हे खरोखर पक्षास विजयी करण्यासाठी काम करणार की नाही, हे जवळून पाहावे लागेल. त्यानंतर दोन-तीन दिवसांत खलपांना पाठिंबा देण्याबाबत मी निर्णय घेईन. कारण गेली ३० वर्षे पक्षासाठी खलपांनी काहीच काम केलेले दिसत नाही.

‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ (आरजी) पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी कॉंग्रेसचे उमेदवार भाजपने ठरविल्याचा आरोप केला आहे. परब हे उत्तर गोव्यातून निवडणूक लढवत आहेत. ते म्हणाले, भाजपने सर्वेक्षण केले आणि त्यानंतर ही उमेदवारी जाहीर केली आहे. हे उमेदवार भाजपनेच सुचवलेले आहेत. लोक कॉंग्रेस, भाजपला वैतागले आहेत. जनता या पक्षांना नाकारणार आहे, असे परब म्हणाले.

म्हादईप्रश्‍नी कॉंग्रेस-भाजप कारणीभूत : भाजपकडून संकेत मिळताच कॉंग्रेसने उमेदवार जाहीर केले, हे सर्वांना आता ठाऊक झाले आहे. म्हादई संपवण्यास हे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत.

या दोन्ही पक्षांचे उमेदवार सत्तरी उलटलेले आहेत. यावरून तरुण कोणीच लायक उमेदवार त्यांच्याकडे नसल्याचे सिद्ध होते. युवा वर्ग याचा जरूर विचार मतदानावेळी करेल, असे मनोज परब म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com