मेळावलीत ‘आयआयटी’ संस्था नकोच!

IIT should not be set up in Melauli
IIT should not be set up in Melauli

वाळपई: गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील मेळावली गावात सर्वे क्रमांक ६७/१ या सरकारी जागेत सरकार आयआयटी संस्था बांधण्‍याचे नियोजन केले आहे. या शैक्षणिक संस्थेला गेल्या महिना दोन महिने झाले नागरिकांचा कडाडून विरोध होत आहे. गुरुवारी सकाळी आयआयटी संस्था जागेची पाहणी करण्यासाठी व नागरिकांशी बैठक घेऊन चर्चा करून तोडगा  काढण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मेळावली व मुरमुणे गावात भेट दिली होती. मात्र, मेळावली येथे जल्मी देवस्थानात झालेल्या बैठकीत अखेरीस उपस्थित नागरिकांनी व विशेष करून रणरागिणींनी संस्थेला विरोध दर्शवित मेळावलीत आयआयटी शैक्षणिक संस्था नकोच, अशी ठाम भूमिका घेत आपले प्रखर विरोधी मत मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. त्यामुळे आज झालेली बैठक अयशस्वी ठरली आहे.

मेळावलीतील महिला गेल्या महिन्याहून आयआयटीला विरोध करण्यासाठी आंदोलन छेडलेले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन मेळावलीच्या जल्मी देवस्थानात केले होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका, सत्तरी तालुका उपजिल्हाधिकारी राजेश आजगावकर, सत्तरी मामलेदार दशरथ गावस, पंच अर्जून मेळेकर, माजी नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य प्रेमनाथ हजारे, वाळपई पोलिस निरिक्षक सागर एकोस्कर, गुरुदास गावडे,  प्रमुख नागरिक शुभम शिवोलकर, राम मेळेकर, सडयो मेळेकर आदींची उपस्थिती होती. 

बैठकीपूर्वी प्रकल्‍प जागेची पाहणी

बैठकीच्‍या सुरवातीला मुख्यमंत्री सावंत यांनी जिल्हाधिकारी आर. मेनका, अन्य अधिकारी व मेळावलीच्या काही लोकांसोबत नियोजित जागेत जाऊन पाहणी केली. यावेळी या सरकारी जागेत लोकांचे कोणकोणते उत्पन्न आहे, याची पाहाणी केली. मुख्‍यमंत्र्यांनी यावेळी अगदी अडगळीच्या वाटेतून तास, दीड तास चालत जाऊन जंगलात फेरफटका मारला. त्यावेळी लोकांसोबत चर्चा करून जागेच्या परिसराची माहिती करून घेतली. नंतर मंदिरात येऊन लोकांना संबोधित करताना सावंत म्हणाले, आपण आज काही जागेची पाहणी केली आहे. त्यावेळी आपल्याला काजू उत्पन्न दिसून आले व अन्य जंगल होते. मी कोठंबी गावातील राहणारा असल्याने आपल्याला गावातील समस्यांची जाणीव आहे. गावात लोकांच्या जमिनींच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. मंदिरासाठी सर्व जागा सोडण्यात आलेली आहे. मेळावलीत आयआयटी म्हणजे गावचा विकासच आहे. त्याकरिता लोकांचे सहकार्य हवे आहे, असे मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी राम मेळेकर म्हणाले, आमच्या जमिनी म्हणजे पेंशन पध्दतीने उत्पन्न मिळते. आयआयटी झाली तर आताच्या पिढीला नोकरी मिळणार, पण पुढील मुलांचे काय?  प्रेमनाथ हजारे म्हणाले मेळावलीच्या पुर्वजांनी काबाड कष्ट करून उत्पन्न घेतले आहे. आज मुख्यमंत्रींनी सकारात्मक पाऊल टाकत प्रत्यक्षात पाहणी केली आहे. त्यासाठी मुख्‍यमंत्र्यांचे कौतुक आहे.

मुख्‍यमंत्र्यांची ग्‍वाही, तरीही..

आयआयटी ही शैक्षणिक संस्था गावची म्हणजेच लोकांची विकास व्हावा हाच उद्देश आहे. त्यातून नोकरी, व्यवसाय मिळणारा आहे. व पुढील दोन तीन पिढींचा विचार केला आहे. गावात एखादा प्रकल्प, मोठी संस्था आणणे म्हणजेच लोकांचा उदरनिर्वाह कसा चालावा हे धोरण सरकारचे आहे. पुढील पन्नास वर्षांचा व त्या पुढील विचार करण्याची गरज आहे. मेळावली लोकांची समस्या काय आहे. हे सर्वांसोबत बसून होणार नाही. त्यासाठी मेळावलीच्या लोकांनी दहा प्रतिनिधी नेमावेत. त्यांच्या सोबत बसून सरकार तोडगा काढण्यास समर्थ असणार आहे. तसेच गावातील घरांना नंबर देणे, सरकारी शौचालय बांधून देणे असेही अन्य विषय बसून सोडविण्याचे प्रयत्न केले जातील. ६७/१ जागेत किती लोकांचे उत्पन्न आहे. त्या जागेत सीमा कोणत्या, कशा आहेत. हे सर्वेक्षणाच्‍या मदतीने काम करता येणार आहे. पण, त्यासाठी लोकांचे सहकार्य आवश्यक आहे. मेळावलीत आयआयटी बांधायची की नाही हे सरकार आत्ताच ठरविणार नाही. त्यासाठी गावातील लोकांना विश्वासात घेऊनच सरकार पुढील पाऊल उचलणार आहे. कोणावरही अन्याय होणार नाही याची ग्वाही आपण येथे देतो. कोणत्याही लोकांच्या पोटावर आड न येता, ही संस्था बांधली जाईल. पण त्यासाठी लोकांचा सहभाग, लोकांचे सहकार्य फार जरुरीचे आहे. तरच हे काम शक्य आहे, असेही मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

...तरीही लोकांचा कडाडून विरोधच! 

मुख्यमंत्र्यांनी आज सुरवातीला जागेची पाहणी करून लोकांसोबत चर्चा करून विषय मांडला होता. त्‍यावर कसा काय तोडगा निघेल यावर विवेचन केले. पण, शेवटी उपस्थित महिला वर्गाने आम्हाला मेळावलीत आयआयटी संस्था नकोच, अशी ठाम भूमिका घेत स्पष्ट संकेत दिले आहेत. नागरिक सडयो मेळेकर यांनी लोकांच्यावतीने विचार मांडून आयआयटी नको, असे जाहीर केले. तसेच ‘गो बॅक आयआयटी, गो बॅक आयआयटी’ अशा मोठमोठ्याने घोषणाही देण्यात आल्या. त्यामुळे आजची बैठक यशस्वी झाली नाही. यातून सरकारची आजची रणनीती फसल्यातच जमा झाले आहे. त्यामुळे आता सरकार पुढे कोणते व कशा प्रकारे पाऊल टाकते, तसेच लोकांचे आंदोलन कसे असेल याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com