Lok Sabha Election: विरोधकांना रोखण्यासाठी आता भाजपची नवी चाल..

Lok Sabha Election: गावागावांतून लोकांच्या पक्षप्रवेशासाठी प्रयत्न : राज्यभर राबवणार मोहीम
Sadanand Tanavade
Sadanand TanavadeDainik Gomantak

Lok Sabha Election: भाजपविरोधात पाच पक्ष एकत्र आले, हे चित्र पुसट करण्यासाठी भाजपने नवी रणनीती आखली आहे. त्यानुसार आता प्रत्येक गावातून अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतात, असे चित्र तयार केले जाणार आहे.

भाजप विरोधातील पक्षांची बैठक झाल्यानंतर तातडीने भाजपने बैठक घेत ही रणनीती निश्चित केली आहे.

भाजपकडे लोकांचा ओढा वाढला आहे, हे जनमानसावर बिंबवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे. हे सारे करताना आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोणताही पेचप्रसंग निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भाजपच्या मतदान केंद्रनिहाय समित्यांच्या सदस्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी कोण कोण इच्छुक आहेत याची चाचपणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पंचायत, जिल्हा पंचायत आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना भाजप प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

अखेरच्या टप्प्यामध्ये संबंधित परिसरावर वरचष्मा असलेल्या किंवा त्या परिसरात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीने भाजपमध्ये प्रवेश करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पुढील आठवड्यापासून भाजप प्रवेशाची ही मोहीम सुरू केली जाणार आहे. यासाठी समाजकारणात सक्रिय असलेल्या; पण भाजपचे सदस्य नसलेल्या लोकांची यादी तयार करण्यात आली आहे.

विधानसभा इच्छुकांना संधी नाही!

विधानसभेची पुढील निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांना मात्र या मोहिमेअंतर्गत भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

भाजपला समाजाच्या सर्व स्तरातून आणि सर्व क्षेत्रांमध्ये मान्यता आहे, हे अधोरेखित करण्यासाठी भाजप मोठ्या प्रमाणावर भाजप पक्षप्रवेशाची ही मोहीम राज्यभरात गाव पातळीवरही राबवणार आहेत.

तारतम्याने निर्णय घेणार : तानावडे

1) भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, दरवेळी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात.

यंदा त्यांची संख्या मोठी आहे. यामुळे कोणाला प्रवेश द्यायचा किंवा नाही याचा तारतम्याने निर्णय घेतला जाणार आहे. कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नसलेल्यांनी भाजपकडे आल्यास त्यांचे स्वागतच आहे.

2) समाजकारणासाठी भाजप हे एक माध्यम आहे. सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा दुवा म्हणून काम करण्यासाठी भाजपमध्ये मोठी संधी आहे.

ती घेण्यासाठी अनेकांनी इच्छा प्रदर्शित केली आहे. येत्या आठवड्याभरात भाजप पक्षप्रवेशाची मोहीम राज्यभरात सुरू झालेली सर्वांना दिसून येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com