Ganesh Chaturthi च्या मुहूर्तावर फोंड्यात विजेचा ‘लपंडाव’

Ponda Electricity: फोंडा बाजारासारख्या मोक्याच्या ठिकाणीही असे प्रकार वारंवार घडू लागल्यामुळे लोकांना बऱ्याच असुविधांना तोंड द्यावे लागते.
Ponda Electricity
Ponda ElectricityDainik Gomantak

Ponda: फोंड्यात ऐन चतुर्थीच्या काळात वीज गुल होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. चतुर्थीनिमित्त रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी खरेदीसाठी शहरात गर्दी असते. पण विजेच्या लपंडावामुळे ग्राहकांची तशीच दुकानदारांची तारांबळ उडत आहे. ज्यांच्याकडे जनरेटर (Generator) आहे ते वेळ मारून नेतात. पण ज्यांच्याकडे जनरेटर नाही त्यांची मात्र ‘त्रेधातिरपीट’ उडते. साहजिकच जिथे जनरेटर आहे तिथे लोक खरेदी करतात.

फोंडा बाजारासारख्या मोक्याच्या ठिकाणीही असे प्रकार वारंवार घडू लागल्यामुळे लोकांना बऱ्याच असुविधांना तोंड द्यावे लागते. यामुळे व्यावसायिकांना बराच आर्थिक फटका बसला. त्यातच रस्त्यावरचे दिवेही बंद पडत असल्यामुळे लोकांचे अधिकच हाल होत होते. खरे तर काल दिवसभर पावसाने विश्रांती घेऊनसुध्दा विजेचा हा लपंडाव का, असे प्रश्‍न ग्राहकांकडून विचारले जात होते.

Ponda Electricity
राज्यात सर्वत्र मंगलमय वातावरणात गणरायाचे आगमन

वास्तविक विजेचा लपंडाव हा प्रकार पावसाळ्यात प्रकर्षाने दिसून येतो. या पावसाळ्यातही लोकांनी त्याचा अनुभव घेतला आहे. पण आता वरुणराजाने सुट्टी घेऊन सुध्दा वीज खाते इतके निष्क्रिय का यामागचे कोडे मात्र उकलणे लोकांच्या दृष्टीने कठीण जात होते आणि विशेष म्हणजे वीज खात्याचे कर्मचारी ‘तो मी नव्हेच’ अशी वृत्ती बाळगताना दिसत आहेत. सध्या वीज हा व्यावसायिकांच्या तसेच नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक ठरत असून प्रत्येक उपकरण विजेवर चालत असल्यामुळे वीज ही जीवनाच्या दृष्टीने अनिवार्य बाब ठरली आहे.

Ponda Electricity
Ganesh Festival 2022: पर्यावरणस्नेही गणेशोत्सव करा साजरा; एकनाथ शिंदेचे मंडळांना आवाहन

स्वत:च्या तालुक्यात तरी लक्ष द्या, वीजमंत्र्यांना साकडे

वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे फोंडा तालुक्यातील असल्यामुळे त्यांनी याकडे प्रकर्षाने या समस्येकडे लक्ष द्यावे तसेच विघ्नहर्त्याच्या आराधनेत व त्याच्या तयारीत विघ्न न येण्याची काळजी घ्यावी, अशी मागणी फोंडा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. वीजमंत्र्यांनी चतुर्थीत वीज कमी वापरण्याचे आव्हान केले असले तरी सध्या लोकांचा उत्साह पाहता तसेच दोन वर्षांच्या खंडानंतर हा उत्सव मनसोक्तपणे साजरा करण्याकरिता केलेली तयारी पाहता वीजमंत्र्यांनी याकडे लक्ष देणे अगत्याचे आहे.

* दिलीप नार्वेकर, इलेक्ट्रीकल व्यावसायिक, फोंडा-

वीज खात्याचे कर्मचारी ग्राहकांच्या तक्रारी मनावर घेत नसल्यामुळे वीजमंत्र्यांनीच लक्ष घालून या लपंडावामुळे ग्राहकांना होणारा त्रास थांबवावा, असे सुचवावेसे वाटते. दोन वर्षांनंतर यंदा लोकांना गणेशोत्सव पूर्ण उत्साहाने साजरा करण्याची संधी मिळाली आहे. त्यात वीज हा महत्त्वाचा घटक ठरणार आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव थांबवून आम्हा व्यावसायिकांना दिलासा द्यावा.

* राजेश डोईफोडे, रहिवासी, फोंडा-

विजेच्या लपंडावामुळे फोंड्यात दोन गट पडले आहेत. ज्यांच्याकडे जनरेटर आहे, त्यांना याचा काहीच फरक पडत नाही. पण ज्यांच्याकडे जनरेटर घेण्याची ताकद नाही, ते हैराण झाले आहेत. त्यामुळे जनरेटरचा खप वाढविण्याचे हे तंत्र तर नव्हे ना, असे वाटू लागते. गणेशोत्सवात वीज जाईल, या भीतीने काहींनी भाडेपट्टीवर जनरेटर आणण्याची तयारी सुरू केली आहे. ही वीज खात्याची हार आहे की हे ‘सेटिंग’कळत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com