‘पावसा’मुळे सक्तीची टाळेबंदी

corona lockdown
corona lockdown

अवित बगळे

पणजी :

गेले दोन दिवस मुसळधारपणे पडणारा पाऊस यामुळे सुट्टी हवी असे वाटणाऱ्या गोमंतकीयांच्या मदतीला ‘कोविड’ टाळेबंदी आज धावून आली. सरकारने तीन दिवसांची ‘कोविड’ टाळेबंदी आजपासून जाहीर केली आणि पडत्या फळाची आज्ञा मानत लोकांनी स्वयंस्फूर्तीने घरातच राहणे पसंत केले. दूध, भाजीपाला आदी खरेदीही कालच आटोपल्याने आज जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठीही कोणी घराबाहेर पडले नाही.
पेडणे, म्हापसा, डिचोली, वाळपई, फोंडा, मडगाव, सावर्डे, कुडचडे, केपे, सांगे, काणकोण, वास्को, बाळ्ळी, कुंकळ्ळी, पणजी आणि मडगाव परिसरात आज दिवसभर सर्व व्यवहार बंद होते. कदंब बस वाहतूकही बंद होती. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सरकारने टाळेबंदीच्या आदेशातून वगळले होते, तरीही अनेक ठिकाणी किराणा मालाची दुकानेही बंद होती. सकाळी बेळगावहून भाजीपाला गोव्यात पोहोचला, दुधाच्या गाड्याही आल्या. मात्र, भाजीपाला व दूध खरेदीसाठी नेहमीसारखी ग्राहकांची गर्दी नव्हती. जोरदारपणे बरसणाऱ्या पावसामुळे सकाळी पाय मोकळे करण्यासाठी आणि शारिरीक व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या रोडावली होती. शनिवार व रविवार या सुटीच्या दिवसाला धरून शुक्रवारची आजची टाळेबंदी असल्याने दीर्घ सुटी अनेकांनी अनुभवली.

रहादारीही तुरळक
दिवसाची सुरवात आज पावसाने झाली. सूर्यदर्शनही नीट झाले नाही. टाळेबंदीमुळे रस्त्यावरील रहदारीही तुरळक होती. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने अनेकांना इच्छा असूनही घराबाहेर पडता आले नाही. खासगी वाहने अत्यल्प प्रमाणात सकाळी काही वेळ रस्त्यावर आली होती. काही मोजक्या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. येणाऱ्या - जाणाऱ्यांना ते हटकत होते. उगाच भटकू नका, असे ते सांगत होते. पोलिसांनी आज बऱ्यापैकी सामंजस्याची भूमिका घेत प्रबोधनावरच भर दिल्याचे दिसून आले. पोलिस चारचाकी आणि दुचाकीवर भर पावसात फिरत गस्त घालत होते. मात्र, पावसामुळे सगळेच जण घरात राहिल्याने पोलिसांचे कामही सोपे झाले होते. राष्ट्रीय महामार्गावरून आंतरराज्य माल वाहतूक मात्र सुरळीत होती.

राज्यभरात दुपारनंतर पावसाचा जोर थोडा कमी झाला, तरी लोकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले. राज्याच्या अनेक भागातून लोकच टाळेबंदीची मागणी करत होते. सरकारने जणू त्यांची मागणी पूर्ण केली. त्यामुळे सर्वजण उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी झाले होते. सायंकाळी उशिरा काहीजण फेरफटका मारण्यासाठी आपली वाहने घेऊन बाहेर पडले खरे, मात्र सर्व व्यवहार बंद असल्याने त्यांनाही घरी परतण्यावाचून पर्याय राहिला नाही. आज जणू पावसाने टाळेबंदी लादली होती, असे चित्र राज्यभरात होते. शनिवार आणि रविवारी पावसाचा जोर कायम राहिल्यास हेच चित्र कायम राहील एवढे नक्की.

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com