फोंड्यात पहिला कोरोना बळी आडपईचा

Mhardol sanitization
Mhardol sanitization

फोंडा

आडपईतील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून दहा रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने येथील लोकांना तेवढाच दिलासा मिळाला आहे. आडपईतील मयत कोरोना रुग्णावर फोंडा पालिकेच्या मुक्तीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सध्या राज्यातील कोरोनाच्या बळीने अर्धशतक पार केले आहे. आतापर्यंत राज्यात फोंडा तालुका सोडल्यास बहुतांश तालुक्‍यात कोरोनाचे बळी गेले आहेत. मात्र, आज (रविवारी) आडपईतील पहिला कोरोना रुग्ण बळी ठरला आहे. मयत व्यक्ती ही फोंडा भागात भाडेपट्टीचे वाहन चालवून चरितार्थ करीत होती. मयताला मूत्रपिंड व इतर आजार होते, अशी माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली.
दुर्भाट आडपई आगापूर पंचायत क्षेत्राबरोबरच बांदोडा पंचायत, वाडी तळावली पंचायत तसेच कवळे व वेलिंग प्रियोळ पंचायतीतही कोरोना रुग्ण सापडत आहेत. कवळे पंचायत क्षेत्रातील ढवळी, आंबेगोळ, धुम्रे तसेच इतर भागात हे रुग्ण सापडले असून त्यात भरच पडत आहे. विशेष म्हणजे वेर्णा औद्योगिक वसाहतीतील टुलीप तसेच इतर प्रकल्पांबरोबरच तिस्क - उसगावातील एमआरएफ कंपनीतील कामगारांमुळे ही रुग्णसंख्या वाढली आहे.
वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये पंचायत क्षेत्रातही कोरोना रुग्ण सापडत आहेत. या पंचायतीच्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये हडियेवाडा - म्हार्दोळ भागात सहा कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. या भागाचे पंचायत प्रतिनिधी ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी परिसर सॅनिटाईझ करण्यासाठी कार्यवाही केली. अग्निशमन दलाचे त्यासाठी सहकार्य घेण्यात आले.
फोंडा तालुक्‍यातील कुर्टी तसेच तिस्क उसगावचा काही भाग कंटेन्मेंट झोन जाहीर केल्यानंतर आडपईतील देसाईभाट भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्याने हा परिसरही सील करण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्‍यातील कुर्टीसह, तिस्क - उसगाव, बोरी, शिरोडा, ढवळी, बेतोडा, माशेल, प्रियोळ, मडकई आदी भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, फोंडा तसेच बाजारभागात ग्राहकांची गर्दी मात्र कमी झालेली नाही. चतुर्थी जवळ आल्याने आता लोकांची खरेदीसाठी गर्दी होणार असल्याने सरकारने त्यापूर्वीच चतुर्थीसाठीची मार्गदर्शक तत्वे त्वरित जाहीर करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

म्हार्दोळचे महालसा देवालय खुले
फोंडा तालुक्‍यातील अर्धी अधिक देवालये सध्या खुली आहेत. मात्र, प्रत्येक देवालयात आरोग्य खात्याच्या मार्गदर्शिकेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे. फोंडा तालुक्‍यातील यापूर्वी रामनाथी येथील रामनाथ तसेच बांदोडा येथील महालक्ष्मी देवालय महिन्याभरापूर्वीच खुले करण्यात आले होते. आता आजपासून म्हार्दोळ येथील महालसा देऊळ भाविकांना श्रीच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. आरोग्य खात्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कडक अंमलबजावणी करूनच भाविकांना देवदर्शन करता येणार आहे. त्यासाठी मंदिर समितीने काही नियम जाहीर केले असून त्यात मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दी करू नये, फुले व फळे देवाला अर्पण करू नये, फक्त नारळ, वस्त्र व फंडपेटीत दान एवढीच मर्यादा भाविकांसाठी ठेवण्यात आली आहे. साठ वर्षांवरील व दहा वर्षांखालील भाविकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, मंगेशी येथील मंगेश देवालय चतुर्थीनंतरच खुले होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

संपादन - यशवंत पाटील

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com