‘संकटमोचक’ शिफारशींद्वारे अनुभव पणाला

digambar kamat
digambar kamat

अवित बगळे

पणजी :

‘कोविड’ व्‍यवस्थापनावरून राज्यपाल सत्यमाल मलिक व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यात मतभेद असल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच आज विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि सूचना सादर करताना राज्यपालांनी यापूर्वी व्यक्त सुरात सूर मिसळला जाईल, याची दक्षता त्यांनी व्यवस्थितपणे घेतली. कामत यांनी राज्याला भेडसावणाऱ्या समस्या कशा सोडवता येतील, याविषयी माजी मुख्यमंत्री या नात्याने अनुभव पणाला लावत या शिफारशी केल्या आहेत. यामुळे राज्यपाल पुढील बैठकीवेळी सरकारला या शिफारशींनुसार कार्यवाही करण्याची सूचना करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारलाही कामत यांनी शिफारशी केल्या होत्या.
केवळ शंभर कोटी रुपयांत राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना कामत यांनी सादर केली होती. मात्र, सरकारने त्यावर विचार केलेला नाही. सरकारने ‘कोविड’ हाताळणीत सर्वांना विश्वासात घेणे महत्त्‍वाचे असून, आज ‘कोविड’ इस्पितळ तसेच ‘कोविड’ निगा केंद्रातील अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे व त्याची छायाचित्रे व चलचित्रे समाज माध्यमांवर येत असल्याने लोकांच्या मनात भितीचे वातावरण आहे, हे कामत यांनी राज्यपालांच्या नजरेस आणून दिले.

सद्यपरिस्‍थितीवरही
वेधले लक्ष
कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर अनेक मंत्री व अधिकारी परस्पर विरोधी विधाने करतात व त्यामुळे लोकांच्या मनात अविश्वासाचे व गोंधळाचे वातावरण तयार होते, याकडेही कामत यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले. सरकारचे व्यवस्थित धोरण नसल्याने कंटेन्मेंट झोन तसेच प्रतिबंधित क्षेत्रात लोक रस्त्यावर येतात. काही पंचायती गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्‍वांच्‍या विरुद्ध परस्पर टाळेबंदीचा आदेश देतात, हेही त्यांनी राज्यपालांना दाखवून दिले. या विषयांचा उल्लेख राजभवनावर झालेल्या बैठकीत राज्यपालांनी केला होता. तोच सूर कामत यांनी आळवून राज्यपालांनी राज्य सरकारच्या कामगिरीविषयी व्यक्त केलेली नाराजी बरोबर होती, हे अप्रत्यक्षपणे सूचवले आहे.


दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळ पूर्णत: कार्यान्वित व्‍हावे : कामत
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करणे सरकारची जबाबदारी असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी यावेळी राज्‍यपालांना सादर केलेल्‍या निवेदनात म्हटले आहे. सरकारने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पूर्णपणे कार्यान्वित करावे, सामुदायिक कोविड चाचणी हाती घ्यावी, तसेच कोविड महामारी व अर्थव्यवस्था यावर त्वरित कृती आराखडा व श्‍वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी करणारे व इतर विषय निवेदनातून त्यांनी हाताळले आहेत.
सरकारने ताबडतोब व्हेंटिलेटर, यंत्रसामग्री तसेच कोविड रुग्णांसाठी ‘आयसीएमआर’ने सांगितलेली औषधे यांचा योग्य पुरवठा ठेवणे गरजेचे आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात कोविड रुग्णांसाठी प्रशस्त व्यवस्था करणे सहज शक्य आहे व सरकारने राहिलेल्या कामासाठी पीएम केअर फंडातून निधी आणावा, असे त्यांनी सूचवले आहे. सामाजिक कोविड चाचणी करणे अत्यंत महत्त्‍वाचे असून, त्यामुळे कोविडची लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधणे व त्यांचे विलगीकरण सोपे होईल व त्यामुळे रोगाचा फैलाव रोखणे शक्य होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. राज्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना व कोरोनाचा फैलाव कानाकोपऱ्यांत पोहोचला आहे. सरकारने शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचा काढलेला आदेश मागे घ्यावा असे सांगून, हा आदेश केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्‍वांच्‍या विरुद्ध असल्याचे त्यांनी राज्यपालांच्या नजरेस आणले आहे.

ऑनलाईन शिक्षणासाठी
इंट्रानेटचा वापर व्‍हावा
ऑनलाईन शिक्षणासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी गोव्याला भेट दिलेल्या व आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत कार्यान्वित झालेल्या इंट्रानेट सुविधेचा वापर करणे गरजेचे आहे, याकडे श्री. कामत यांनी निवेदनातून राज्यपालांचे लक्ष वेधले आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी म्हादई, वास्को- लोंडा रेलमार्गाचे दुपदरीकरण, रस्ता महामार्गाचे बांधकाम तसेच वीजवाहिनी टाकण्यासाठी मोले राष्ट्रीय उद्यान व महावीर अभयारण्य क्षेत्रातील झाडांची होणारी कत्तल तसेच करमल घाटातील महामार्गाच्या कामासाठी कापण्यात येणारी झाडे, या सर्वांना लोकांचा होणारा विरोध, हे विषय राज्यपालांसमोर ठेवले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com