Diwali Padwa Tradition : मयेत माळरानावर चटणी अन् पोळ्यांचा आस्वाद! शेतकऱ्यांसह लहान मुलांचाही सहभाग

Diwali Padwa Tradition : डिचोली तालुक्यातील मये येथील शेतकऱ्यांनी आजही पाडव्यातील परंपरा जोपासून ठेवली आहे.
Diwali Padwa Tradition Mayem
Diwali Padwa Tradition MayemDainik Gomantak

तुकाराम सावंत

Diwali Padwa Tradition : डिचोली, काळ बदलत चाललाय, तसे काळाच्या ओघात काही पारंपरिक रीतीरिवाज पडद्याआड होत आहेत. दिवाळी काळात बलिप्रतिपदा अर्थातच गोधन (गुरांचा) पाडवा साजरा करण्यात येत असला, तरी काही भागात या सणातील काही परंपरागत चालत आलेल्या प्रथा बंद पडल्या आहेत.

किंबहुना त्यांचा विसर पडला आहे. ही वस्तुस्थिती असताना डिचोली तालुक्यातील मये येथील शेतकऱ्यांनी आजही पाडव्यातील परंपरा जोपासून ठेवली आहे.

Diwali Padwa Tradition Mayem
Goa Politics: गावडेंबाबत गैरसमज पसरविणारे ‘ते’ कोण?

माळरानावरील पारंपरिक जागेत बसून पोळे आणि चटणीचा आस्वाद घेण्याची गुरांच्या पाडव्यातील पूर्वापार परंपरा आजही काही मोजक्याच भागात टिकून आहे. त्यापैकीच एक मये हा गाव. बलिप्रतिपदेदिनी साजऱ्या करण्यात येणाऱ्या गुरांच्या पाडव्याला पोळ्यांचा पाडवा म्हणूनही ओळखण्यात येते.

एक काळ असा होता, की पाडव्यादिवशी गोठ्यात गुरांची पूजा केल्यानंतर गुराखी अर्थातच शेतकरी घरात भाजलेले पोळे, चिकन आदी खाद्यपदार्थ घेऊन रानात जायचे. नंतर त्याठिकाणी पारंपरिक जागेत एकत्रित बसून पोळ्यांचा आस्वाद घेत असत. बदलत्या काळानुसार बहुतेक भागात ही परंपरा कालबाह्य झाली आहे. असे असतानाच, डिचोली तालुक्यातील मये गावात ही परंपरा आजही टिकून आहे.

शेकडो वर्षांची परंपरा

गुरांच्या पाडव्या दिवशी प्रत्येकजण ‘गुराखी’ ही भावना बाळगून माळरानी जातात. ही परंपरा आमच्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे. आजही आम्ही ही परंपरा चालूच ठेवली आहे. लहान मुलेही मोठ्या उमेदीने सहभागी होत आहेत. त्यामुळे भविष्यातही ही परंपरा चालूच राहणार. असा आशावाद नवनाथ गोसावी आणि भानुदास गोसावी यांनी व्यक्त केला.

पोळ्यांचा पाडवा :

वर्षपद्धतीप्रमाणे यंदाही आज (मंगळवारी) गुरांच्या पाडव्याची ही परंपरा जोपासताना मये गावातील केळबायवाडा, कुंभारवाडा आदी भागातील शेतकरी सकाळी पोळे आणि चिकन आदी खाद्यपदार्थ घेऊन ‘वण्यार’ येथील माळरानावर गेले.

त्याठिकाणी सर्वांनी एकत्रित बसून पोळे, चटणी, चिकन आदी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत पाडव्याचा आनंद द्विगुणित केला. साधारण तास-दीड तास माळरानावर घालविल्यानंतर हे शेतकरी माघारी फिरले. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांबरोबर मुला-मुलींचाही समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com