Goa Dengue Cases: गोव्यात आरोग्य संचालनालयाची मोहीम यशस्वी; यंदा डेंग्यूचा संसर्ग नियंत्रणात

Dengue: गोवा आरोग्य संचालनालयाने सुरुवातीपासून डास उत्पत्ती स्रोत ओळखून त्यांचा नाश केला, तसेच नागरिकांमध्ये जनजागृती केली.
Dengue
DengueDainik Gomantak

Dengue: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. 2021 जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान एकूण 622 डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. तर या वर्षी याच काळात एकूण 409 आढळले आहेत. यंदा आरोग्य संचालनालयाने सुरुवातीपासून डास उत्पत्ती स्रोत ओळखून त्यांचा नाश केला.

तसेच पंचायत, नगरपालिका आणि इतर सरकारी खात्यामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती केली. पावसाळ्याबरोबरच डेंग्यू संसर्गाचा हंगामही संपुष्टात आला आहे. तरी देखील आरोग्य संचालनालयाने डेंग्यू विरोधात मोहीम सुरूच ठेवली आहे.

Dengue
Goa Tourism: पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील; गोव्यात आता लवकरच 'नॉटीकल टुर्स'

आठवड्यातून एकदा आरोग्य संचालनालयाचे कर्मचारी, पंचायत आणि नगरपालिका क्षेत्रात जाऊन डास उत्पत्ती स्रोत ओळखण्यासाठी पाहणी करतात. तसेच नागरिकांमध्ये जागरूकतेचे काम सुरूच आहे. 2021 मध्ये मुरगाव तालुक्यात डेंग्यूचा उद्रेक झाला होता.

कुठ्ठाळी आणि वास्को परिसरात मोठ्या संख्येत रुग्ण आढळले होते. तेव्हा स्रोत ओळखून नागरिकांमध्ये जागृती केली होती, म्हणून या वर्षी मुरगावात परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे, अशी माहिती राष्ट्रीय संसर्गजन्य आजार उपक्रमाच्या गोव्यातील मुख्य अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी दै.‘गोमन्तक’ला दिली.

2022 मध्ये शेजारच्या राज्यातून येणारा मजूर वर्ग संसर्गासाठी कारणीभूत ठरला आहे. बार्देश तालुक्यात देखील झालेला संसर्ग हा करासवाडा येथे आलेल्या मजुरांमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भविष्यात या वर्गावर देखील नजर ठेवली जाणार आहे. खासकरून औद्योगिक वसाहत, ट्रॉलर्स, चिरे खाण, कुळाघर सारख्या ठिकाणी कामासाठी येणाऱ्या परप्रांतीय मजुरांचा यात समावेश आहे, अशा डॉ. महात्मे म्हणाल्या.

नोव्हेंबरमध्ये 26 रूग्ण

नोव्हेंबर 2022 मध्ये 26 डेंग्यू रुग्णांची पुष्टी झाली आहे, तर 2021 नोव्हेंबरमध्ये हा आकडा 40 होता. यंदा नोव्हेंबरमध्ये म्हापसा - 5, पणजी, कोल्वाळ, पेडणे प्रत्येकी 3, हळदोण, शिवोली मये, चिंबल प्रत्येकी 2, डिचोली, नावेली आणि साळगाव प्रत्येकी 1 रुग्ण आढळले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com