पणजी
राज्यात टाळेबंदी सुरू झाल्यापासून गेला दीड महिना घाऊक व किरकोळ मद्यविक्रेत्यांची दुकाने बंदी होती ती आजपासून (४ मे) खुली करण्यात आल्याने सकाळपासूनच या दुकानांच्या बाहेर मद्याच्या बाटल्या खरेदी करण्यासाठी मद्यप्रेमींनी रांगा लावल्या होत्या. प्रत्येकजण जादा प्रमाणात मद्याच्या बाटल्या खरेदी करताना दिसत होते. सामाजिक अंतर ६ फूट ठेवण्याची अट घालूनही काही ठिकाणी ते पाळले जात नव्हते. अबकारी आयुक्त अमति सतिजा यांनी पणजीत फेरफटका मारून मद्यविक्री दुकानांची पाहणी केली व आढावा घेतला.
मद्यविक्री बंद करण्यात आली तरी चोरट्या मार्गाने अनेकजण दुप्पट किंमतीने मद्यविक्री करत होते. मात्र ही मद्यविक्री खुली केल्याने आज सकाळी ९.३० वाजता मद्याची दुकाने खुली करण्यात आली. कित्येक दिवस जादा किंमत मोजून चोरीच्या मार्गाने मद्य खरेदी लागल्याने काहीजणांनी तर मद्याच्या बाटल्यांचे बॉक्सच खरेदी करत होते. या मद्य खरेदीवर नियंत्रण नसल्याने किरकोळ मद्य विक्रेत्यांपेक्षा घाऊक मद्य विक्रेत्यांच्या दुकानांसमोर रांगा दिसत होत्या. दुकाने खुली झाल्यावर मद्यप्रेमींची मद्याच्या बाटल्या खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होईल असे वाटले होते मात्र तसा प्रकार दिसला नाही. त्यामुळे मद्यप्रेमी रांगेत उभे राहून मद्याच्या बाटल्या खरेदी करत होते. मद्याच्या दुकानसमोर काही अंतर ठेवून ही मद्यविक्री करण्यात येत होती. ज्याच्या तोंडाला मास्क असेल त्यालाच ही विक्री केली जात होती. त्यामुळे प्रत्येक ग्राहक तोंडावर मास्क घालून आले होते. टाळेबंदी केव्हाही पुन्हा वाढून पुन्हा निर्बंध लागू होऊ शकतात या भीतीने आवश्यकतेपेक्षा जादा साठा विकत करताना दिसत होते. संध्याकाळपर्यंत घाऊक मद्य विक्रेत्यांच्या दुकानांतून लाखोची मद्यविक्री झाल्याची माहिती एका मद्यविक्रेत्याने दिली.
दरम्यान, मद्यविक्रीवेळी टाळेबंदीच्या नियमांचे पालन केले जात आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी अबकारी आयुक्त अमित सतिजा हे स्वतः इतर अबकारी निरीक्षकांसमवेत पणजीत फेरफटका मारत होते. यावेळी त्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, बहुतेक मद्यविक्रेते सामाजिक अंतर व मास्क या अटींचे पालन करत आहेत. ही मद्यविक्री संध्याकाळी ६ वाजेपर्यंत करण्यास परवानगी आहे. त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास या मद्यविक्री असलेल्या दुकानांच्या भागात अबकारी खात्याचे अधिकारी फेटफटका मारणार आहेत. जे कोणी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर मद्यविक्री दुकान खुले ठेवील त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. कारवाईत दुकानच पुढील टाळेबंदीपर्यंत सील करण्यात येईल. अबकारी खात्यातर्फे सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. मद्यविक्रीची दुकाने राज्यात खुली झाल्याने गोव्यातील दारू राज्याबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चेकनाक्यावर गोव्याबाहेर जाणाऱ्या वाहनांची अबकारी खाते व पोलिस तपासणी करत आहेत.
|