मुरगावात कोरोनाचे आतापर्यंत २१ बळी!

Corona
Corona

मुरगाव
शनिवारी मुरगाव तालुक्यात एकाच दिवशी ४ जणांना प्राणास मुकावे लागले होते. त्यात खारवीवाडा येथील एका नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय शाळकरी मुलीचा समावेश होता. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू पावलेल्यांपैकी ही रुग्ण सर्वात कमी वयाची होती. त्यामुळे लोकांत हळहळ व्यक्त केली जात असतानाच भीतीचेही वातावरण पसरले आहे.
आतापर्यंत कोरोनाचे बळी ठरलेल्या रुग्णांना पूर्वाश्रमीचा आजार होता असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. जी १४ वर्षीय शाळकरी मुलगी जीवास मुकली, तिला मूत्रपिंडाचा आजार होता. चिखलीतून तिला गोमेकॉत दाखल करून तिची स्वॅब चाचणी केल्यानंतर ती मुलगी पॉझिटिव्ह आढळली होती. उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी नवेवाडे येथील ६३ वर्षीय आणि झुआरीनगरातील ५३ वर्षीय पुरुष रुग्णांचे कोविडमुळे निधन झाले.
मांगोरहिल झोपडपट्टीतून कोरोना विषाणूचा फैलाव होऊन तो राज्यभर पसरला. यात मुरगाव तालुक्यातील सडा, बायणा, खारवीवाडा, नवेवाडे, झुआरीनगर हे परिसर अधिक बाधीत होऊन रुग्णांची संख्या शंभरावर गेली. झुआरीनगरात रुग्णसंख्या सव्वादोनशेच्या वर गेली आहे. चिखली पंचायत क्षेत्रातही रुग्णसंख्या पन्नासच्या आसपास आहे. समाधानाची बाब म्हणजे मांगोरहिलमध्ये रुग्ण संख्या घटत आहे.
मुरगावमधील स्थानिक प्रशासन कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी काही ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करून लोकांना बंदिस्त केले आहे. तसेच बायणा, सडा भागातील काही परिसर ‘सील’ करण्यात आले आहेत. उपजिल्हाधिकारी सचिन देसाई, मामलेदार साईश नाईक तसेच पोलिस अधिकारी आणि अन्य संबंधित शासकीय कर्मचारी कोरोनाचा संसंर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना आखत आहेत. ‘कंटेन्मेंट’ आणि ‘सील’ केलेल्या परिसरातील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तू वेळोवेळी पुरविण्यात येत आहे. वास्को परिसरातील खारवीवाडा भागात गेल्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ कोरोनाचे रुग्ण दगावल्याने तेथील लोकांमध्ये भीती पसरली आहे.

संपादन - यशवंत पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com