पंचायतीच्या स्वखर्चातून प्रकल्प पूर्णत्वास

Completion of the project at the Panchayat own expense
Completion of the project at the Panchayat own expense

मडकई : वेलिंग-प्रियोळ-म्हार्दोळ पंचायत क्षेत्रात भविष्यात कचरा समस्या निर्माण होऊ नये, यासाठी पंचायतीने स्वखर्चातून कचरा वर्गीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी सुका व ओला कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे कचरा समस्या निकालात निघणार आहे. या प्रकल्पासाठी पंचायत मंडळ व ग्रामस्थांचेही सहकार्य लाभले असून, प्रकल्पाच्या ठिकाणी स्थानिक व गरजू लोकांनाही काम मिळण्यासाठी संधी पंचायतीकडून प्राप्त करून देण्यात येईल, अशी माहिती सरपंच पांडुरंग गावडे यांनी दिली.

वेलिंग-प्रियोळ-म्हार्दोळ येथे कचरा वर्गीकरण प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर याचे प्रकल्पाचे उद्‍घाटन रविवारी (ता. २५) दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. यावेळी सरपंच पांडुरंग गावडे, उपसरपंच दीक्षा नाईक, पंचसदस्य दामोदर नाईक, ॲड. वरद म्हार्दोळकर, मंगलदास गावडे, सचिव प्रदीप गावडे, दीनकर कोसंबे, पंचायतीचे कर्मचारी रेश्मा नाईक, स्नेहा नाईक, अशोक गावडे, संजू गावडे, साईराज गावडे, ग्रामस्थांपैकी दीलीप नाईक, सत्यवान गावकर, कंत्राटदार सुचित जांभळे, आदी उपस्थित होते.


सरपंच गावडे यांनी सांगितले की, कचरा वर्गीकरण प्रकल्पासाठी पंचायतीने स्वतःचा फंड वापरला आहे. यासाठी १०,४८,४२१ रुपये खर्च करण्यात आले असून, या प्रकल्पात अतिरिक्त कंपोस्ट सयंत्रही वापरण्यात येणार आहे. 


या कंपोस्ट सयंत्रामुळे कमी जागेत अधिक कचरा ठेवला जाऊ शकतो. पंचायत क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाच्या घरातून कचऱ्याची उचल करण्याचे काम नियमितपणे चालू ठेवण्यात येणार असून, ग्रामस्थांनीही सुका व ओल्या कचऱ्याचे नियोजन करून त्याप्रमाणे पंचायतीकडे कचरा सुपूर्द केल्यास पंचायतीला सहकार्य लाभणार असल्याचेही ते म्हणाले. पंचायतीच्या फंडातून गटार व अंतर्गत रस्त्यांचीही कामे हातात घेतली जाणार असल्याचे सरपंच पांडुरंग गावडे यांनी सांगितले.


सरपंच गावडे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून प्रकल्पाचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी पंचसदस्य वरद म्हार्दोळकर व मंगलदास गावडे यांनीही विचार मांडले. 

स्थानिकांनाही प्रकल्पात कामाची संधी
कचरा वर्गीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी काम करण्यासाठी पंचायतीकडे अनेकांनी अर्ज केले आहेत. या ठिकाणी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने पंचायत क्षेत्रातील बेरोजगारांनाही सामावून घेण्यात येणार आहे. त्यामुळे पंचायत क्षेत्रातील युवकांनी रितसर पंचायतीकडे अर्ज केल्यास त्यांनाही पंचायतीतर्फे काम देण्याचा विचार करण्यात येणार आहे, असे सरपंच पांडुरंग गावडे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com