Bicholim River Issue: डिचोली नदी प्रदूषणाच्या विळख्यात; अस्तित्व संकटात

विक्रेत्यांकडून दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्याच्या प्रकारात वाढ
Bicholim River Issue
Bicholim River IssueDainik Gomantak

Bicholim River Issue: आधीच प्रदूषणाच्या विळख्यात गटांगळ्या खात असलेल्या शहरातील नदीत आता कचरा टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. नागरिकांसह काही विक्रेतेही या नदीत टाकाऊ साहित्य टाकत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराची पालिकेने गंभीर दखल घेतली असून, नदीत कचरा टाकणाऱ्यां विरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

दिवसेंदिवस या नदीत मानवनिर्मित प्रदूषणाचे आक्रमण वाढत असल्याचे आढळून येत आहे. कचऱ्यासह या नदीत सांडपाणी मिसळत असतानाच विविध ठिकाणी कपडे आणि गुरांना धुण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या नदीत काही ठिकाणी अस्वच्छता निर्माण होत आहे.

Bicholim River Issue
Goa Crime News: डिचोलीतील चोरीप्रकरणात वास्को कनेक्शन उघड

ही नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत, तर काही वर्षांनंतर नदीचे अस्तित्व पूर्ण धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. बारा वर्षांपूर्वी या नदीतील गाळ काढण्यात आला होता. त्यानंतर मात्र या नदीतील गाळ उपसण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

कुडचिरे, वाठादेवहून डिचोली शहरातून वाहणारी नदी ही वाळवंटीचा फाटा असून, हा फाटा कारापूर येथे मांडवी नदीला जाऊन मिळतो. कुडचिरे ते डिचोलीपर्यंत या नदीवर आठ बंधारे आहेत.

एकेकाळी म्हणजेच 25 वर्षांपूर्वी किरकोळ अपवाद वगळता ही नदी स्वच्छ दिसून येत होती. मात्र हळूहळू ही नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकत गेली. दिवसेंदिवस नदीत अस्वच्छतेचे प्रमाण वाढत आहे. कुडचिरे, व्हावटी, वाठादेव आदी भागात मिळून विविध ठिकाणी या नदीत आजही नियमित कपडे धुण्याचे प्रकार घडत आहेत. वाठादेव आणि डिचोली शहरातील गावकरवाडा येथे तर ही समस्या गंभीर आहे. राज्याबाहेरील लोक सर्रासपणे नदीच्या पाण्यात कपडे धुताना दिसून येत असतात.

सांडपाणी नदीत

डिचोली शहरात मल:निसारण प्रकल्प नसल्याने सांडपाण्याची समस्या आहे. पावसाळ्यात तर नदीजवळील भागातील सांडपाणी पावसाच्या पाण्याबरोबर नदीत मिसळत असते. काही वर्षांपूर्वी शहरातील काही घरे आणि हॉटेलमधील सांडपाणी गटारात सोडण्यात येत होते. हे सांडपाणी थेट नदीत मिसळत होते.

मात्र दोन वर्षापूर्वी आरोग्य खात्याने कारवाईचा बडगा उचलताच संबंधित घर आणि हॉटेल मालकांनी सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केल्यानंतर सांडपाणी नदीत मिसळण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले. मात्र पूर्णपणे बंद झालेले नाहीत.

बॉयलर कोंबड्यांचे सापडले अवशेष : या नदीत निर्माल्य टाकण्याचे प्रकार चालूच असतात. त्याशिवाय काहीजण घरातील किंवा हॉटेलमधील कचरा आणि टाकाऊ पदार्थ नदीत टाकत असल्याची माहिती मिळाली आहे.

बाजारातील काही विक्रेते खराब आणि टाकाऊ माल नदीत टाकत आहेत. चिंतेची बाब म्हणजे नदीत बॉयलर कोंबड्यांचे अवशेष आणि विष्ठाही टाकण्यात येत असल्याचीही माहिती मिळाली आहे.

कारवाईचे संकेत :

''स्वच्छ आणि सुंदर'' अशी डिचोली शहराची ओळख आहे. ही ओळख टिकवून ठेवण्यासाठी विक्रेत्यांसह जनतेने सहकार्य करावे. असे आवाहन नगराध्यक्ष कुंदन फळारी आणि नगरसेवक विजयकुमार नाटेकर यांनी केले. नदीत कचरा आदी घाण टाकण्याच्या प्रकारामुळे नदी संकटात आली आहे. हे प्रकार असेच चालू राहिल्यास पालिकेतर्फे कडक कारवाई करण्यात येईल. कचरा टाकणाऱ्यां विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी विक्रेत्यांचा परवानाही रद्द करण्यात येईल, असा इशाराही नगराध्यक्ष श्री. फळारी आणि नगरसेवक नाटेकर यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com