Bicholim News : मयेत खाण अवलंबितांच्या भूमिकेकडे लक्ष; जनताही नाराज

Bicholim News : विरोधकांचे कडवे आव्हान : लोकसभेच्या तोंडावर पावणेदोनशे कार्यकर्त्यांचा भाजपप्रवेश, उत्सुकता वाढली
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

तुकाराम सावंत

Bicholim News :

डिचोली, मये मतदारसंघातील मयेसह शिरगाव आणि पिळगाव या तीन पंचायती खाणपट्ट्यात येतात. या तिन्ही पंचायत क्षेत्रातील खाण कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

भवितव्याच्या काळजीत असलेले हे कामगार गळीतगात्र झाले आहेत. या कामगारांचा सरकारवर रोष आहे. शेतकरी आणि खाण अवलंबित घटकही चिंताग्रस्त आणि दुखावलेले आहेत. खाण परिक्षेत्र मुद्यावरून जनताही नाराज आहे. त्यामुळे खाणपट्टा विभागातील मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

भाजपचा सुरक्षित ‘गड’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या मये मतदारसंघात अजूनतरी लोकसभा निवडणुकीच्या सक्रिय प्रचाराला सुरवात झालेली नाही. तरी भाजपसाठी अनुकूल असलेल्या या मतदारसंघातून मतांची आघाडी फुगवण्यासाठी भाजपने राजकीय डावपेच सुरू केले आहेत. अजून तरी जाहीर प्रचारात भाजपने उडी घेतली नसली, तरी विकासकामांचे नारळ वाढवून भाजपने प्रचाराची नांदी केली आहे.

त्यातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जवळपास पावणेदोनशे कार्यकर्त्यांनी केलेला भाजप प्रवेश. ही भाजपसाठी जमेची बाजू. दुसऱ्या बाजूने विरोधी गोटात अजूनतरी सामसूम आहे. उमेदवार निश्चित झाल्यानंतरच काँग्रेसची रणनीती ठरणार आहे. तरीदेखील काँग्रेससह भाजप विरोधी पक्षांसमोर वर्चस्व प्रस्थापित करण्याचे कडवे आव्हान आहे.

विरोधक एकत्र आल्यास मात्र भाजपसाठी ते ‘भारी’ ठरू शकतात, असा राजकीय अंदाज आहे. मगो पक्ष राज्य सरकारातील एक घटक आहे. त्यामुळे मगोचे कार्यकर्ते भाजपच्या बाजूने असतील. हे निश्चित असले, तरी बहुतांश मगो कार्यकर्ते वेगळा विचार करू शकतात. राज्यातील मये विधानसभा मतदारसंघ उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात येत आहे.

मये मतदारसंघात १४ हजार ९०९ महिला आणि १४ हजार १६४ पुरुष मिळून २९ हजार ०७३ मतदार आहेत. गेल्या तीन लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे पाहिल्यास तिन्ही निवडणुकीत मयेत भाजप उमेदवाराला मतांची आघाडी मिळालेली आहे.

Bicholim
Goa Shigmo Festival : शिरोड्यातील शिवनाथाचा वार्षिक शिमगोत्सव साजरा

२००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मयेतून भाजप उमेदवाराला ३,२०६ मतांची आघाडी मिळाली होती. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत मतांची आघाडी फुगताना ती ९,७८७ इतकी झाली होती.

तर २०१९ साली झालेल्या निवडणुकीत मतांच्या आघाडीत घसरण होताना ती ८,९४१ अशी झाली होती. मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मयेतील जवळपास पावणेदोनशे कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केल्याने भाजपची ‘ताकद’ वाढली आहे, असा भाजप नेत्यांचा दावा आहे.

जाहीर प्रचारकार्य सुरू करण्यात आले नसले, तरी लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच संघटन कार्यावर भर देण्यात आला आहे. बुथ पातळीवर संघटनकार्य मजबूत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. मयेत भाजपला अनुकूल वातावरण आहे. या संधीचा फायदा उठवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यावेळी मतदारसंघात १६ हजार मतांची आघाडी घेण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

- दयानंद कारबोटकर, अध्यक्ष, भाजप मंडळ

मये मतदारसंघात काँग्रेसची स्थिती वाटते तेवढी वाईट नाही. २०२२ साली झालेल्या गत विधानसभा निवडणुकीवेळी भाजपविरोधात जवळपास ६९ टक्के मतदान झाले आहे. या मतदानाचा विचार केल्यास, मयेतून काँग्रेसला मताधिक्य वाढवण्याची संधी आहे. त्यासाठी विरोधकांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील रणनीती ठरणार आहे.

- संतोषकुमार सावंत, नेते, गोवा फॉरवर्ड

मयेत भाजपचेच वर्चस्व

१९८९ आणि १९९४ साली झालेल्या सुरवातीच्या दोन्ही निवडणुकीत मगोने हा गड काबीज केला होता. तर २००२ साली या मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली होती.

पैकी २००७ ते २०२२ पर्यंत मागील सलग चार निवडणुकीत तसेच १९९९ साली मिळून आतापर्यंत पाचवेळा या मतदारसंघात भाजपने आपला झेंडा फडकविण्यात यश मिळवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com