‘बाकी संचित’ हे संपूर्ण गोव्याचे संचित - अरुण म्हात्रे

3
3

पणजी

कविवर्य बा. भ. बोरकर यांच्यावरील ‘बाकी संचित’ हे पुस्तक केवळ बोरकरांविषयीचे नसून ते संपूर्ण गोव्याचे संचित आहे. बोरकरांविषयीचे इतरांचे ऋणानुबंध, अगत्य, प्रेम, जिव्हाळा त्यातील पत्रांतून प्रकटला आहे, तो केवळ अद्‍भूत आहे, असे उद्‍गार ज्येष्ठ व नामांकित कवी अरुण म्हात्रे (मुंबई) यांनी काल गोवा मराठी अकादमीच्या ऑनलाइन पुस्तक प्रकाशन सोहळ्यात काढले.
‘गुगल मीट’ वर झालेल्या आणि त्याच वेळी फेसबुकवरील ‘इन गोवा’वाहिनीच्या पेजवरून थेट प्रक्षेपित झालेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद गोवा व महाराष्ट्रातील शेकडो साहित्यरसिकांनी घेतला. गोवा मराठी अकादमीची प्रकाशने - परेश प्रभू यांचे ‘बाकी संचित,’ व ‘गोमंतकीय मराठी पत्रकारितेचा इतिहास’, डॉ. सोमनाथ कोमरपंत यांचे ‘कविवर्य बा. भ. बोरकर’, तसेच प्राचार्य गोपाळराव मयेकर यांच्या ‘स्वप्नमेघ’चे पुनर्मुद्रण यांचे प्रकाशन या सोहळ्यात करण्यात आले. मुंबईहून श्री. म्हात्रे, नागपूरहून ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी या ऑनलाइन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.
बोरकरांविषयी व ‘बाकी संचित’ विषयी बोलताना श्री. म्हात्रे पुढे म्हणाले, ज्या गोष्टी मनाच्या कुपीत जपून ठेवायच्या असतात, त्या गोष्टींसाठी जर कोणी काम केलं, त्यात लक्ष घातले, व्यासंग केला, तर कशा पद्धतीचे सुंदर पुस्तक येऊ शकते याचे ‘बाकी संचित’ हे उदाहरण आहे. एखादा कवी घडतो तेव्हा तो घडत असताना किती लोक त्याला साह्यभूत ठरतात हे या पुस्तकातून दिसून येते. ‘पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा, पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा’ या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या ओळी उद्धृत करून श्री. म्हात्रे म्हणाले, या पुस्तकातील पत्रे वाचताना गोव्यात फिरल्याचा आनंद मिळतो. आपण जागा बदलत असताना जी मोजकी पुस्तके स्वतःसोबत घेऊन जातो अशा पुस्तकांपैकी हे पुस्तक आहे. ते केवळ बोरकरांचे पुस्तक नाही, तर त्या काळातील सांस्कृतिक चलनवलनाचे दर्शन त्यात घडते. बोरकरांच्या कवितेची विविधांगी रुपडी शोधण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल. ‘बाकी संचित’चे संपादक परेश प्रभू यांच्या रूपाने एक व्यासंगी अभ्यासक संपादक मराठीला लाभला आहे, असे गौरवोद्‍गार श्री. म्हात्रे यांनी काढले.
डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी ‘कविवर्य बा. भ. बोरकर’ या आपल्या बोरकरांवरील पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त केले. आपली अनेक वर्षांची इच्छा मराठी अकादमीने पूर्ण केल्याचे ते म्हणाले, तर प्राचार्य गोपाळराव मयेकर यांनी आपला काव्यप्रवास व ‘स्वप्नमेघ’ विषयी माहिती दिली.
ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांनी ‘गोमंतकीय मराठी पत्रकारितेचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक गोव्याच्या पत्रकारितेची व सामाजिक जीवनाची माहिती देणारे अत्यंत अभ्यासपूर्णरीत्या लिहिले गेलेले पुस्तक आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी आपल्या प्रास्ताविकात, सध्याच्या कोरोनाच्या हलाहलामध्ये या पुस्तकांद्वारे साहित्याचे अमृत अकादमीने रसिकांपर्यंत पोहोचवल्याचे प्रतिपादन केले. प्रारंभी तनिशा मावजेकर यांनी गायिलेल्या सुमधुर ईशस्तवनाने कार्यक्रमाची शानदार सुरूवात झाली. श्री. प्रभू यांनी गुगल मीट व कार्यक्रमाचे संचालन केले, तर वल्लभ केळकर यांनी आभार मानले.
गुगल मीटवरील या कार्यक्रमास ८७ प्रेक्षकांची तीन तास ऑनलाइन उपस्थिती होती. फेसबुक लाईव्हवर हा या कार्यक्रमाचे १८०० लोकांनी थेट प्रक्षेपण पाहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com