विधानसभा अधिवेशन आज

Goa-assembly
Goa-assembly

अवित बगळे

पणजी :

विधानसभेचे एक दिवसाचे अधिवेशन उद्या (ता.२७) रोजी होणार आहे. या अधिवेशनासाठी सभागृह कामकाजविषयक नियम ३०६ नुसार सर्व नियम विधानसभेच्या बाराव्या अधिवेशनासाठी निलंबित करण्याची तयारी सरकारने केली आहे. विरोधकांनी विधानसभा कामकाज नियम ६९ नुसार स्थगन प्रस्ताव देऊन ‘कोविड’ महामारीवर चर्चेचा आग्रह धरण्याचे ठरवले आहे. तो प्रस्ताव फेटाळला गेला, तर विधानसभा कामकाज चालू न देण्याचा विरोधकांचा मनोदय आहे. त्यामुळे विधानसभेत उद्या (२७) सत्ताधारी विरोधी विरोधक, असा कडवा संघर्ष पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे.
विधिमंडळ सचिवालयाने कामकाजाची विषयसूची आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. त्यानुसार, प्रश्नोत्तर तासानंतर विधिमंडळ कामकाज व्यवहारमंत्री माविन गुदिन्हो हे विधानसभा कामकाज नियम ३०६ नुसार, विधानसभा कामकाजविषयक सर्व नियम विधानसभेच्या बाराव्या सत्रातील कामकाजापुरते निलंबित करावेत, असा ठराव विधानसभेत मांडणार आहेत. हा ठराव मंजूर झाला की २०२०-२१ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्याचा सरकारचा मार्ग मोकळा होणार आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर विरोधी पक्षांनी काही पर्याय सरकारला दिले आहेत. अर्थसंकल्प मंजूर करू नये, चार महिन्यांसाठी लेखानुदान मंजूर करून घ्यावे, असा पर्याय त्यांनी सरकारला दिला होता. ‘कोविड’ महामारीच्या काळात महसूल घटल्याने अर्थसंकल्पातील महसूल व खर्चाच्या आकडेवारीची फेरमांडणी करावी, असेही विरोधी पक्षांची मागणी होती.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी लेखी अहमती या बैठकीत सादर केली होती.

अनुदानीय मागण्‍या मंजुरीची शक्‍यता
उद्याच्या (ता.२७) एक दिवसाच्या अधिवेशनात सरकार विविध खात्यांच्या अनुदानीय मागण्या सादर करून मंजूर करून घेणार आहे, हे आज स्पष्ट झाले आहे. अर्थसंकल्प मंजुरीचा विषय विधानसभा कामकाजाच्या विषय सूचीत नोंदवण्यात आला आहे. पुरातत्व व पुराभिलेख, नगरनियोजन, कारखाने व बाष्पक, कृषी, छपाई व लेखनसामग्री, राजभाषा, सार्वजनिक गाऱ्हाणी, क्रीडा व युवा व्यवहार, भूनोंदणी व समादेशन, जिल्हाधिकारी, महसूल, कामगार, रोजगार, माहिती तंत्रज्ञान, कला व संस्कृती, नागरी पुरवठा, सहकार, आदिवासी कल्याण अशा क्रमाने एकंदरीत ८४ अनुदानिय मागण्या विधानसभेच्या मंजुरीसाठी सादर केल्या जाणार आहेत. त्याशिवाय राजभवन, कर्ज परतफेड गोवा लोकसेवा आयोगाच्या मागण्या केवळ चर्चेसाठी सादर केल्या जातील.
विधानसभेत १५ जणांना श्रद्धांजली वाहणारा शोक प्रस्तावही सभापती सादर करणार आहेत.

...अन्‍यथा कामकाज चालवू
नाही देणार : सरदेसाई
या अधिवेशनात ‘कोविड’ महामारी आटोक्यात आणण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करा, अशी मागणी विरोधी पक्ष करणार आहेत, अशी माहिती गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आज दिली. ते म्हणाले, विधानसभेत ‘कोविड’ विषयी चर्चा होणार नाही. एवढे विषय अत्यंत कमी कालावधीत जास्तीत जास्त विषय हातावेगळे करण्याचा हा विक्रम असेल. कोविड महामारी, मोलेतील अडीच हजार झाडांची कत्तल, राज्याची आर्थिक स्थिती अशा कोणत्याही महत्त्‍वाच्‍या विषयावर चर्चा होणार नाही. नियम ६९ नुसार विशिष्ट जनतेसाठी महत्त्‍वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव सादर केला जाणार आहे. आम्ही कामकाज चालवू देणार नाही.

नऊ विधेयके मंजुरीच्‍या प्रतीक्षेत
कोरोनाच्या साथीमुळे एक दिवसाच्या घेण्यात येणाऱ्या या विधानसभा अधिवेशनात टाळेबंदीच्या काळात आणि त्यापूर्वीही काढलेल्या अध्यादेशांची किमान नऊ विधेयके विधानसभेच्या तत्काळ मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. कोणत्याही अध्यादेशाला सहा महिन्यांच्या आत विधानसभेची मंजुरी मिळवणे अत्यावश्यक असते. याशिवाय ४८ असाधारण राजपत्रात प्रसिद्ध झालेले विविध सरकारी आदेश विधानसभा मान्यतेसाठी सादर केले जाणार आहेत. ‘कोविड’ महामारीमुळे विधानसभेतील प्रवेशावर उद्या निर्बंध आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण आणले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com