मडगाव
पाशेको यांनी काँग्रेस पक्षाकडे सलगी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पाशेको यांनी मात्र झाकली मूठ सव्वालाखाची ठेवली असून आपला बेत योग्यवेळी जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.
२००२ ते २०१२ पर्यंत विधानसभा निवडणुकीत सलग निवडून आलेले पाशेको यांचा २०१७ मध्ये त्यांचेच एकेकाळचे सहकारी व आताचे राजकीय हाडवैरी विल्फ्रेड डिसा यांनी पराभव करून नुवे मतदारसंघ काबीज केला. पाशेको यांनी २०१२ व २०१७ ची निवडणूक नुवे मतदारसंघातून लढवली होती. त्यापूर्वी २००२ व २००७ मध्ये ते बाणावली मतदारसंघातून निवडून आले होते. २००५ मध्ये बाणावलीतील पोटनिवडणूकही ते जिंकले होते.
बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर नुवेचे आमदार डिसा हे भाजपचे असल्याने काँग्रेस या दोन्ही मतदारसंघात ताकदवान उमेदवाराच्या शोधात आहेत. पाशेको सध्या भाजप सरकारविरुद्ध सातत्याने जहरी टीका करत आहेत. पुढील निवडणुकीवर डोळा ठेवून पाशेको यांचा कल काँग्रेसच्या बाजुने असल्याची चर्चा सासष्टीतील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
|