योजनगंधा

quite child
quite child
- नेहा उपाध्ये



आयुष्यभरासाठी शरीर सुदृढ करून देणारी आजी बाळाच्या लक्षातही राहत नाही. लक्षात राहील कसं? तिला पाहिलेलंच आठवत नसतं. कधीतरी ती चुकून भेटते. त्या दिवशी भेटली तशीच. ती आणि तिनं तेल लावलेल्या माझ्या भावाला बघताच तिनं घाईघाईनं हर्षभरित होऊन रस्ता ओलांडला. तेरा वर्षांच्या मुलाच्या जागी तिला तीन महिन्यांचं बाळच दिसत होतं. त्याचे तिनं गालगुच्चे घेतले, मुका घेतला, मायेनं जवळ घेतलं. केसांतून हात फिरवला. तिच्या डोळ्यांत तरारलेलं पाणी मला दिसलं.

पहिल्या वर्षावानं दरवळणाऱ्या मृद्‌गंधापुढे जगातील सर्व सुगंध फिके आहेत वगैरे आपण म्हणतो. तो गंध पसरताच मन उल्हसित होतं, हे वाक्‍यदेखील आपल्यासाठी नवीन नाही; पण कधीतरी बाळंतिणीच्या घरी जाऊन अनुभवा. तिच्या खोलीत जो सुगंध दरवळत असतो त्याला उपमाच नाही. कदाचित हे वेडसर वाटण्याची शक्‍यता आहे; पण बाळाला लावलेलं तेल, फासलेली पावडर, तीट लावलेलं काजळ, अंगावर सांडलेलं दूध या सगळ्यांचा एकत्रित जो सुगंध येतो, तो जगातील कुठल्याही अत्तराच्या दुकानात मिळत नाही किंवा कुपीत भरून ठेवता येत नाही.
पेट्रोलचा वास अनेकांना आवडतो. लहर आली की पेट्रोलपंपवर जाऊन तासन्‌तास उभं राहता येतं; पण हा सुगंध अनुभवण्याची इच्छा झाली तर कांचनमृगप्राप्ती इतका दुर्मिळ योग. त्यात या गंधामुळे एखाद्याला मळमळतं, डोकं फिरतं. असं असेल तर त्याचं नाक आणि जन्म वायाच गेला!
असा विचार मन करीत होतं आणि मला तिची आठवण झाली. बाळाला तेल लावण्यासाठी येणाऱ्या आजीची. तेल लावणारी ही नेहमी आजीच असते. किंबहुना, ‘तेल लावणारी’ या विशेषणाला मावशी, मामी, काकी, ताई अशी संबोधनं शोभतच नाहीत. सगळ्या बदकांमध्ये जसा राजहंस सहज ओळखता यावा तशी ही आजी गर्दीत सहज ओळखता येते. जगातील सर्व मातृत्व एकत्र करून जेवढा वात्सल्याचा, ममतेचा साठा तयार होईल, तेवढं ममतेचं ऐश्‍वर्य परमेश्‍वरानं तिच्या चेहऱ्यावर बहाल केलेलं असतं. तेल मालिश करून करून सर्वांगाला तेल धुपाचा सुगंध, जसा सत्यवतीला पराशरानं ‘योजनगंधा’ होण्याचा आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद परमेश्‍वरानं हिला दिला असावा. मालिश करून कडक झालेले तिचे हात तिच्या मनाची मृदुता दाखवतात, अशी ही माऊली कितीही गरीब असली तरीही तिच्या सहवासात तिची श्रीमंती कळून चुकते.
माझ्या लहानपणी ती माझ्या भावंडांना तेल लावायला आली की घरातील सर्वांसाठी तो एक सोहळा असायचा. खरं तर तेव्हा ती मला मुळीच आवडत नसे. ती आली की बाळ जिवाच्या आकांतानं रडतं, एवढंच काय ते तात्पर्य.
माझ्या बालमनाला उमगत असे गोष्टीतील राजकन्येला त्रास देणारी चेटकीण... अशा नाना उपमा, कल्पना माझं बालमन करीत असे. ‘ही आणि येऊन बाळाला रडवते तर हिला बोलवतात तरी का बरं’, असे नाना प्रश्‍न पडत असत; पण, तेल लावताना, आंघोळ घालताना तिचा बाळाशी चाललेला संवाद अत्यंत लोभसवाणा. मंत्रोपचार करीत देवाच्या मूर्तीला अभिषेक घालणाऱ्या पुजाऱ्याला देव जेवढं पुण्य देत असेल ना, तेवढंच तो या आजीलाही देत असेल. तिने तेल लावलेलं प्रत्येक बाळ जगात नाव कमावेल अशी केवळ आशाच नव्हे, तर ती तिची निष्ठाच असते. बाळाला तेल लावून, न्हाऊ माखू घालून ती योजनगंधा निघून जाते; पण, तो सुगंध बराच काळ दरवळतो. मंदिरात जाताच उदबत्तीच्या सुगंधानं मनात भक्ती आणि सात्त्विकतेचे तरंग उमटावेत तसेच या सुगंधानं मनातलं वात्सल्य, ममत्व उचंबळून येतं. तीन महिने तेल लावून झाल्यावर ही आजी निघून जाते.
आयुष्यभरासाठी शरीर सुदृढ करून देणारी आजी बाळाच्या लक्षातही राहत नाही. लक्षात राहील कसं? तिला पाहिलेलंच आठवत नसतं. कधीतरी ती चुकून भेटते. त्या दिवशी भेटली तशीच. ती आणि तिनं तेल लावलेल्या माझ्या भावाला बघताच तिनं घाईघाईनं हर्षभरित होऊन रस्ता ओलांडला. तेरा वर्षांच्या मुलाच्या जागी तिला तीन महिन्यांचं बाळच दिसत होतं. त्याचे तिनं गालगुच्चे घेतले, मुका घेतला, मायेनं जवळ घेतलं. केसांतून हात फिरवला. तिच्या डोळ्यांत तरारलेलं पाणी मला दिसलं. म्हणाली, ‘हावें म्हटलां तशें करतलो मरे बाबू? जातलो मरे व्हडलो मनीस?’ (मी सांगितलं तसं करणार ना बाळ? होणार ना तू मोठा माणूस?). ‘कधी मोठा झाला कळलंच नाही’ असं म्हणून डोळ्यांना पदर लावत ती पुन्हा घाईघाईनं गर्दीत नाहीशी झाली. तीन महिन्यांच्या बाळाचं चित्त जेवढं निर्मळ असतं ना, तेवढीच निर्मळ मनाची ही योजनगंधा ‘वात्सल्य’ या भावनेशी परमेश्‍वरानं साकारलेली सुगंधीत मूर्ती!

संपादन हेमा फडते

 

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com