अनिल खंवटे : एक संस्था!

पणजीतील उद्योगपती व दानशूर व्यक्ती गणले गेलेले अनिल खंवटे आज वयाची ८० वर्षे पूर्ण करीत असून त्यांनी शून्यातून विश्‍व निर्माण केले. अनेक संस्था घडविल्या, अनेकांच्या मागे उभे राहिले. पणजीच्या सांस्कृतिक-आर्थिक विकासातही सहभागी झाले. अनिल खंवटे हे केवळ एक व्यक्ती नसून संस्था आहे.
Panaji
PanajiDainik Gomantak

नंदिनी रेगे

पणजीतील उद्योगपती व दानशूर व्यक्ती गणले गेलेले अनिल खंवटे आज वयाची ८० वर्षे पूर्ण करीत असून त्यांनी शून्यातून विश्‍व निर्माण केले. अनेक संस्था घडविल्या, अनेकांच्या मागे उभे राहिले. पणजीच्या सांस्कृतिक-आर्थिक विकासातही सहभागी झाले. अनिल खंवटे हे केवळ एक व्यक्ती नसून संस्था आहे.

त्यांच्याबरोबर कित्येकजण इंजिनिअर झाले असतील. त्या तुकडीमधल्या कितीजणांनी उद्योगधंद्यात कल्पकता दाखविली, स्वतःचा उद्योगसमूह स्थापन केला? येथेच खंवटे यांचे वेगळेपण अधोरेखित झाले. मग मी त्यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी पाहिली. वडील श्री.(कै). सदाशिव खंवटे आणि आई सौ. (कै.) इंदिरा (पूर्वाश्रमीच्या सावकार) या दोन्ही घरांत व्यावसायिक, उद्योगक्षेत्रांत काही कामगिरी नव्हती.

वडिलांचे शिवण यंत्राचे दुकान होते. त्याचबरोबर ते यंत्रांचे सुटे भागही विकायचे. त्या काळात शिवणयंत्रे ही सुखवस्तू ख्रिश्‍चन घरात जास्त वापरली जायची. तिथं त्यांनी टिपलं, या स्त्रिया सौंदर्यप्रसाधने वापरतात, तर त्यांनी त्या वस्तूंचाही व्यापार सुरू केला. भोवतालच्या परिस्थितीतून गरजेच्या वस्तूंची गरज टिपायची आणि आपल्या व्यवसायाला जोडव्यवसाय सुरू करायचा ही वृत्ती नेमकी अनिलबाबकडे आहे. वडिलांकडून मिळालेला हा वारसा.

प्रियोळहून अनिलबाबच्या वडिलांनी धंद्यानिमित्त पणजीला भाड्याच्या घरात वास्तव्य केले. एरवी ते प्रियोळपासून पणजी म्हापशापर्यंत सायकलवरून पायपीट करायचे. आज ‘इंदिराबाय’ या कदंब पठारावर वसलेल्या अनिलबाबच्या आलिशान बंगल्यापर्यंतचा प्रवास आणि एकुलता एक मुलगा आकाशच्या आग्रहासाठी घेतलेल्या ह्युंडाई (पर्वरी) आणि मर्सिडिझ बेंझ (कदंब पठार)च्या डिलरशीपचा टप्पा हा त्यांच्या प्रचंड मेहनतीची, कलात्मकतेची आणि दीर्घोद्योगी स्वभावाची परिणती आहे.

१९४४ च्या १६ एप्रिलला अनिलबाबचा जन्म म्हापशाच्या आजोळी सावकारच्या घरी झाला. एकूण भावंडे नऊ. अनिलबाबचा नंबर चौथा. तीन मुलींच्या पाठीवर (कळस) जन्मलेला. तो कुलदीपक ठरेल ही बालपणातील भविष्यवाणी अनिलबाबनी अक्षरशः खरी करून दाखवली.

देऊळवाड्यावरच्या महालक्ष्मी देवीच्या सान्निध्यातली बालपणातली ती अकरा वर्षे त्यांच्या आयुष्यावर अमीट ठसा उमटवून गेली. देव आहे तिथे दानवही आहेत, या उक्तीनुसार अनेक भल्याबुऱ्या लहानथोरांशी संबंध आले, पण त्या सगळ्यातून तावून-सुलाखून योग्य मार्गावर देवीनेच आपणाला आणून ठेवले, यावर त्यांची प्रचंड श्रध्दा आहे.

नाहीतर मुष्टिफंडमधल्या शाळेत दुसरीत नापास होणारा हा मुलगा एकदम एका वर्षात तीन वर्षांचा अभ्यास करून डॉन बॉस्कोत पोचतो काय, मराठी माध्यमातून एकदम इंग्लिश माध्यमात उडी घेतो काय, तिथून आपल्याला मागे टाकून पुढे गेलेल्या शाळासोबतींना मागे टाकून पुढे जातो काय! तिथून पुढे कॉलेज शिक्षणासाठी मुंबई, मोरबी (गुजरात), पुन्हा मुंबई, व्हीजेटीआय करत इंजिनिअरिंग पूर्ण करणे, बरे एवढे सगळे करताना घरच्या हलाखीच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असतानादेखील जास्त खेद न करता खेळात इतर उपक्रमांत त्यांनी भाग घेतला.

१९६६ साली पदवी पदरात पाडून भारतीय सैन्यता दाखल होण्याची इच्छा मागे सारून, भाई (मोठा भाऊ-भाई) ची जबाबदारी वाटून घेऊन पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी त्यांचं पुन्हा गोव्याला परतणं झालं.

मधल्या दोन महिन्यांच्या बेकारीच्या काळात महालक्ष्मी देवीच्या चैत्र पौर्णिमेकर समाजाची वार्षिक नाटकं केली. तिथं अनेक प्रतिष्ठित कुटुंबातल्या सुशिक्षित, सुस्वरूप तरुणींबरोबर ‘कांचेचा चंद्र’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘धुम्मस’ वगैरे अनेक नाटकांत कामे केली.

तिथेच ‘दिवा जळू दे सारी रात’ नाटकादरम्यान नूतन आगशीकरशी त्यांचे सूत जुळणं आणि घरून या प्रेमविवाहाला विरोध होताच, घरच्या धाकट्या भावंडांच्या शिक्षण, लग्न या जबाबदाऱ्या पूर्ण करून दहा वर्षांच्या प्रदीर्घ विरहानंतर नूतनला सौ. नूतन अनिल खंवटे करणं ही त्यांच्या संयमी आणि जबाबदारी निभावण्याच्या स्वभावाची पावती आहे.

नूतननेही जबाबदारी पूर्ण सहयोगाने निभावली आणि भालचंद्र मोर्तो आगशीकरांची ही सुकन्या खंवटे घराण्याची सून म्हणून एकरूप होऊन गेली. वास्तविक पाहता नूतनचे वडील हे मुंबई युनिव्हर्सिटीतील केमिकल इंजिनिअर बनून आलेल्या गोवेकरांमधले पहिले एकजण होते. नूतनचा मोठा भाऊ कै. सुभाष आगशीकर हा जे.जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर मुंबईचा सुवर्णपदक विजेता विद्यार्थी होता. त्याने वानखेडे स्टेडियमची रचना केली होती, पण अशा सुविद्य घराण्यातून आलेल्या नूतनने स्वतःची शिक्षिकेची नोकरी सोडून अनिलबाबच्या संसाराची पूर्ण जबाबदारी यशस्वीपणे निभावली.

अनिलबाबनी इंजिनिअर होताच मनाशी पक्क ठरवलं होतं की, फारतर पाचवर्षे नोकरी करायची. मग स्वतःचा व्यसाय सुरू करायचा. त्याप्रमाणे त्यांनी प्रथम काकुले कन्स्टक्शन्स, मग कादर कन्स्टक्शन्स, मग सार्वजनिक बांधकाम खाते, नंतर फोमेंतो इंजिनिअरिंग कं. प्रा. लि. अशा नोकऱ्या करत अनुभव गोळा केला आणि मग स्वतःची खंवटे इंजिनिअरिंग कंपनी स्‍थापन केली. त्यानंतर भागिदारीतून अल्कॉन कन्स्ट्रक्शन्स, अल्कॉन एंटरप्रायझेस अशा विविध कंपन्या स्थापन केल्या. या कंपनीचा दर्जा इतका चांगला होता की, त्यांचे घोषवाक्य येस यू आर राईट! इटस् अल्कॉन कन्स्ट्रक्शन- हे खूप गाजले होते.

हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण करून पणजीत ‘डेल्मन’, पर्वरी इथे ‘ओ कोकेरो’ आणि कळंगुटमध्ये ‘रोनिल’ या पंचतारांकित हॉटेलांची उभारणी केली.

एसीसी सिमेंट कंपनीबरोबर भागिदारी सुरू करून आकाश मॅन्युफॅक्चरिंग कं. प्रा. लि., कौंटो मायक्रोफाईन प्रॉडक्टस् प्रा. लि. या कंपन्यांची त्यांनी उभारणी केली. शिवाय अल्‍कोटेक, अल्कोलॅब या कॉंक्रीट आणि भिन्न साहित्य निर्माण करणारे प्रकल्प त्यांनी उभारले.

उद्योगक्षेत्रात असे वेगवेगळे उपक्रम राबवताना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही लक्षणीय काम केले. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षापासून त्यांनी मुष्टिफंड या आपल्या प्राथमिक शाळेसाठी भरीव योगदान दिले. तिथे त्यांनी खजिनदार आणि सदस्य म्हणून सत्तावीस वर्षे काम केले. मुष्टिफंडचे माध्यमिक विद्यालय, हायर सेंकडरी स्कूल, आर्यन हायर सेंकडरी स्कूल, मुक्त विद्यालय, निकमार कॉलेज, फॅशन स्कूल अशा अनेक विद्यालयांची स्थापना, विस्तार करण्याच्या कामात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. उर्वरित आयुष्यात मुष्टिफंडासाठी काम करत राहणं हे त्यांचे ध्येय आहे.

समविचारी मित्रांसह १९७३ साली त्यांनी मडगावच्या विद्या विकास मंडळाची स्थापना केली. आजवर ते व्यवस्थापकीय समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. ‘सेमाना द कल्चर’ या इंडो-पोर्तुगीज कमिटीचे चेअरमन म्हणून २००८ ते २०१२ या काळात गोवा आणि पोर्तुगीजाचे सौहार्द जपण्याचे प्रयत्न त्यांनी केले.

त्यासाठी इंडो-पोर्तुगीज - सर्वोच्च नागरी पुरस्काराचे ते मानकरी ठरले. दिशा चॅरिटेबल ट्रस्ट या दिव्यांग मुलांच्या शाळेसाठी १९९४ पासून २००५ पर्यंत यथाशक्ती मदत केली. २००६ पासून सरकारी मदत सुरू झाली. दिशा ट्रस्टच्या निवासी शाळेसाठी प्रयत्न सुरू आहेत. राऊळ बाबा ट्रस्ट, मानव विकास साधना संस्था, नागेश महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट, विवेकानंद प्रतिष्ठापना चॅरिटेबल ट्रस्ट, अरबिंदो सोसायटीचे अध्यक्ष, हुबळी, मडगाव, वास्को, पर्वरी येथील गोकर्ण पर्तगाळ हॉल या कामांसाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सढळ हस्ते मदत केलेली आहे.

Panaji
Goa News : भाजपमुळे राज्याचे अस्तित्व धोक्यात : कॅ. विरियातो फर्नांडिस

इतके व्यस्त असूनही ते देवकार्यासाठी वेळ देतात. ते धार्मिक, सश्रद्ध आहेत. देवाधर्मावर, स्वकर्तृत्वावर त्यांचा खूप विश्‍वास आहे. नागेश, महालक्ष्मी, रवळनाथ, बेताळ, पणजी महालक्ष्मी, पुंडलिक देवस्थान, पर्वरी, शर्वाणी देवस्थान -साळगाव, राऊळ महाराज देवस्थान, पिंगुळी, भक्तिनिवास राऊळ महाराज, भक्ती- निवास पंढरपूर, कामत-लॅंड-कुंडई,

आचार्यमाम चिकनकोड- होन्नावर या देवस्थानांशी ते भक्तिभावाने जोडले गेलेले आहेत. स्वतःच्या बहीण-भावांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मोठा भाऊ जयराम (कै.भाई) यांनी स्वतःचं शिक्षण थांबवून त्यांच्या शिक्षणाचा मार्ग आखून दिला. त्याबद्दल ते त्यांच्या ऋणात राहणे पसंत करतात. मोठ्या वहिनीच्या सांगण्याप्रमाणे घरची सगळी धार्मिक कृत्यं भक्तिभावाने करतात.

त्यांचा मुलगा आकाश, सून डॉ. अपर्णा, दोन गोजिरवाणी नातवंडं गीत आणि अंश यांच्यासह सुखासमाधानाने आयुष्य घालवताना त्यांना गोवा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जीवनगौरव पुरस्कार २०२२ साली प्राप्त झाला. त्याअगोदर १९९४ मध्ये त्यांना राजीव गांधी एक्सलन्सी अवॉर्ड मिळाला आणि मागच्या महिन्यात त्यांना एका स्थानिक वृत्तपत्र समूहाने खास पुरस्कार देऊन गौरवलेले आहे.

आजच्या पिढीला ते एवढेच सांगतात की, ‘‘आयुष्य आनंदाने जगा. चांगलं शिकून सवरून नोकरी एके नोकरी न करता आयुष्यातला वेगवेगळ्या वाटा चोखाळा. स्वतःवर विश्‍वास ठेवा. उद्योगी व्हा आणि इतरांसाठी नोकऱ्या निर्माण करण्याची जिद्द बाळगा.

डोळे उघडून आजूबाजूंचे भान ठेवा. मोठी स्वप्नं बघा आणि त्यांचा पाठलाग करा. ‘प्रयत्नांती परमेश्‍वर’ हे सूत्र मी सांभाळलं, तुम्हीही सांभाळा. कधी अपयश आलं तर निराश होऊ नका. प्रयत्न करत रहा. जोवर तुमचं उद्दिष्ट तुम्हाला प्राप्त होत नाही. आईवडिलांचा मान राखा. त्यांचे आशीर्वाद नेहमी तुमच्या बरोबर असतील. नेहमी नम्र रहा.’’

आज वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करून ते एक्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करताहेत. परमेश्‍वराची कृपादृष्टी सदैव त्यांच्यावर राहू दे हीच त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना. ते सध्या लिहित असलेल्या आत्मचरित्रात त्यांनी व्यक्त केलेली इच्छा ‘‘ हे वाचून एक ‘अनिल’ जरी घडला तरी मी भरून पावेन’’ ही सदिच्छा पूर्ण होवो.

त्यांचे घोषवाक्य

येस यू आर राईट! इटस् अल्कॉन कन्स्ट्रक्शन-

हे खूप गाजले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com