सक्षम युवा फळी निर्माण करूया

young generation
young generation

 

- श्‍याम गावकर



जीवनातील आपला प्रवास सुखकर व्हावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. जीवनाच्या सुखमय प्रवासाच्या प्रवाहात पोहण्याची प्रत्येकाच्या मनातील इच्छा असते. अशा क्षणी विविध माध्यमातून मिळणारे ‘हसत राहा, आनंदी राहा’ अशा आशयाचे संदेश माणसाला मोहून टाकतात अन्‌ नकळत माणसाच्या चेहऱ्यावर हास्यरेषा उमटतात.
वास्तविक या चराचरांत असा एकही चेहरा नसेल जो हसल्यानंतर सुंदर दिसत नाही. आपल्या सभोवताली राहणारे यशस्वी लोक आनंदी असो अथवा नसो, परंतु समाजात ताठ मानेने जगून आनंदी जीवन जगणारे मात्र यशस्वी नक्कीच होतात. म्हणून आजच्या घडीला प्रत्येकाने आनंदी राहण्यासाठी प्रयत्नरत राहणे आवश्‍यक आहे. इतके आनंदी असायला हवे की आपल्याला पाहून शेजाऱ्यांनी आनंद व्यक्त केला पाहिजे.
मित्रांनो, आनंदी राहण्याचा फंडा, एकदम सोपा असतो. तो अत्यंत सोप्या पध्दतीने स्वीकारण्याची गरज असते. आनंद शोधण्याच्या मोहात, माणसाने कधीही वाईट कृत्यांना किंवा वाईट प्रकारांना थारा देऊ नये. साध्या सरळ मार्गाचा वापर करून जीवनाला वैभव प्राप्त करण्याची क्‍लुप्ती सोयीस्कर ठरणारी आहे.
आपल्या आयुष्याकडे प्रत्येकाने सकारात्मकतेने पाहण्याची गरज असून साधी राहणी उच्च विचाराने प्रेरित असण्याची गरज असते. माणसांची जीवन जगण्याची शैली ही वेगळी असते. प्रत्येकजण आपापल्या जीवनप्रणालीनुसार जीवन व्यथित करत असतो. विद्यमान परिस्थितीत जीवनात बेरीज-वजाबाकीची गणिते सोडवताना जे घडत आहे ते स्वीकारणे, सहन करणे व जे घडत आहे ते चुकीचे असल्यास त्याला बदलण्याचा प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. त्याविरूध्द आवाज उठविण्याची प्रत्येकाची जबाबदारी ठरते.
वर्तमानयुग हे बोच धूर्त आहे. वर्तमान युगात जलगदगतीने घटना घडत आहेत. बऱ्या-वाईट घटनांचे विश्‍लेषण करत असताना माणसाच्या मनावर बराच ताण येणार हे मात्र नक्की. कारण घडणाऱ्या सर्व घटनांचा लेखा-जोखा सांभाळताना सर्वसामान्यांची त्रेधा तिरपीट उडताना आपल्याला स्पष्ट दिसते. आजच्या सैरभैर काळात माणसाचे चित्त योग्य ठिकाणी असल्याची गरज आहे. तसे पहायला गेलो, तर मनुष्य अत्यंत भाग्यवान आहे. कारण माणसांकडे अनेक जमेच्या बाबी आहेत. मनुष्य बोलू शकतो, तो विचार करतो. शिवाय ज्ञानी आहे. या गुणांमुळे माणसाचे जीवन हे नक्कीच इतर प्राण्यांच्या तुलनेत वरचढ ठरणार आहे.
आजच्या गतिमान युगात माणसाच्या जीवनाचा कार्यकाळ पाहिल्यास तो अत्यंत छोटा वाटतो. त्यामुळे जीवनात मिळालेली वेळ ही जीवनाची खरी कसोटी ठरते. जीवनाच्या वाटेत आलेल्या वेळेचा सदुपयोग करून जीवन सार्थकी लावण्याची कसब माणसाकडे असायला हवी. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जीवन जगण्याची शैली माणसाला अवगत असण्याची गरज आहे. आपण किती वर्षे जीवन जगतो, यापेक्षा आपण कसे जीवन जगणार याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
वर नमूद केलेले जीवन जगण्याच्या दोन भागांचा आपण गांभीर्याने विचार केल्यास जीवन सार्थकी लागेल यात तिळमात्र शंका नाही. समाजात आज जे काही घडत आहे ते स्वीकारून सहन करण्याचा अवलंब करणे की समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीविरोधात आवाज उठवून त्यामध्ये बदल घडविण्याकडे माणसाचा कल असायला हवा? ज्यावेळी वर म्हटलेल्या दुसऱ्या बाबीचा विचार करतो त्यावेळी घडणाऱ्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठविणे म्हणजे प्रवाहाविरुध्द पोहणे असे होते. वास्तविक आजच्या घडीला समाजात जी वाईट कृत्ये घडत आहेत, मन सून्न करणाऱ्या घटना घडताना आपण पाहतो, त्याविरुध्द आवाज उठविण्याची खरी गरज आहे. अनेक संघटना, अनेक संस्था एकजूटपणे त्याविरुध्द सध्या आवाज उठवताना दिसतात, पण काही जणांना ‘तो’ विषय आपल्या कक्षेबाहेरचा अथवा आपल्याला त्या प्रकरणाचे काय सोयरसुतक असे समजून गप्प राहतो. टाळी ही कधीच एका हाताने वाजत नसते. आजच्या घडीला समाजाच्या हिताचे विषय हाताळण्यासाठी आजच्या तरुणाईने पुढाकार घेतला पाहिजे. राजकारण्यांच्या हाताखालचे मिंदे होऊन जीवन जगण्यापेक्षा समाजाच्या उज्वल भवितव्य घडविण्याच्या होमकुंडात उडी घेण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. एकहाती समाज परिवर्तन होणे शक्‍य नसल्याने सामुहिकरत्या एकसंध होऊन समाजात घडणाऱ्या चुकीच्या निर्णयाआड आवाज उठविण्यासाठी तरुणाईने पुढे सरसावण्याची गरज आहे.
हाताच्या बोटावर मोजणारी माणसे आज समाजहिताच्या आड निर्णय घेऊन झपाट्याने त्यांची अमंलबजावणी करून घेण्यासाठी राजकीय फायदा उठवताना दिसतात. वास्तविक राजकीय निर्णय हे नेहमी समाज हिताचे असतात. मात्र, ज्यावेळी त्यामध्ये स्वार्थी वृत्ती फोफावते, त्यावेळी काहीवेळा चुकीचे निर्णय समाजामध्ये घेतले जातात. त्याविरुध्द एकजूटपणे कडाडून विरोध करण्याची गरज असते. समाजाच्या विरोधात घेतलेला निर्णय एकहाती फिरवण्याची ताकद फक्त आजच्या तरुणाईत आहे.
सुभाषचंद्र बोस, भगतसिंह यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी विशेष व्याख्यानमाला, चर्चासत्रांचे आयोजन करून आजच्या तरुणाईला त्यांच्या कार्याविषयी माहिती करून त्यांचे सकारात्मक विचार प्रतिबिंबित करण्यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. एखादे ध्येय निश्‍चित करून दृढनिश्‍चय पूर्वक त्या दिशेने सातत्याने प्रयत्न केल्यास फलप्राप्ती ही ठरलेली असते. एका विशिष्ट दृष्टीकोनातून आपण प्रत्येकाने समाजहित जपण्याकडे लक्ष दिल्यास चांगला समाज घडविण्यात हमखास यश येईल.
आजच्या घडीला प्रत्येक माणसाने आपल्यात असलेली असामान्य शक्ती ओळखून तिला अधिक खतपाणी घालून त्या शक्तीचा सत्कार्यात वापर करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. समाजात जे सध्या घडत आहे त्याचा स्वीकार करून सहन करण्याची वृत्ती ही पळपूटी आहे. माणसाकडे बरे काय, वाईट काय? याबाबत विचार करण्याची दैवी शक्ती आहे, तिचा वापर करून योग्य निर्णय घेण्याची संधी आजच्या घडीला दवडणे म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे. सध्याच्या घडीला समाजात अशक्‍य असे काही नाही. फक्त सकारात्मक विचारांची गरज आणि विधायक दृष्टीकोनाबरोबर मनगटात जिद्द आणि चिकाटीची गरज असते. अकबर-बिरबलाच्या गोष्टीमध्ये बिरबलांना अशक्‍य असे काहीच वाटत नव्हते. प्रत्येक वेळी बिरबल अकबरावर मात करायचा. तात्पर्य हेच की कोणतीही गोष्ट अशक्‍य नसते, फक्त थोडं डोकं वापरले की प्रत्येक गोष्टीचे समाधानकारक उत्तर मिळते.
आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना साथ न देता त्याविरुध्द आवाज उठवून प्रत्येकाने आपला रोष प्रकट केल्यास विरोधकांची एक सक्षम फळी निर्माण होईल. मात्र, आपला विश्‍वास हा नेहमीच भीतीहून मोठा असायला हवा, स्वार्थीपणाचा लवलेशही आपल्या कृतीमध्ये दिसू नये. सकारात्मक विचारसरणीने प्रेरित होऊन वाईट गोष्टीच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी आजच्या घडीला सोशल मीडियाही उपयुक्त ठरतात. त्यासाठी अशा समाज माध्यमांचा फायदा उठवत सक्षम युवा फळी निर्माण करूया व समाजमन अबाधित ठेवण्यासाठी सक्षमपणे एकत्र येऊया.

संपादन हेमा फडते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com