कणगाची नेवरी कणगाची खीर

मी पहिल्यांदा उकडलेली कणगा खाल्ली तेव्हा मला ही पांढरी, चवीला गोड नसलेली कणगा आवडली नाहीत. मग पुढे या ना त्या कारणाने कणगा पुढ्यात येत गेली आणि हळूहळू त्यांची चव ओठांवर रुळत गेली.
goa
goaDainik Gomantak

मनस्विनी प्रभुणे- नायक

गेल्या आठवड्यात पणजी पाटो भागात कामानिमित्ताने गेले होते. इथंच श्रमशक्ती भवन जवळ भाजी विकणाऱ्या बायका बसलेल्या असतात. त्यांच्याकडे हंगामी भाजीपाला चांगला मिळतो.

तर त्यादिवशी मुद्दाम या भाजी विक्रेत्या महिलांकडे गेले तर मला तिथं पांढऱ्या रंगाची कणगा दिसली. डोळ्यासमोर लगेच कणगाच्या नेवऱ्या आणि कणगाची खीर आली. शंभर रुपयांना आठ कणगा घेऊन आले. जांभळ्या - लालसर रंगांची कणगा मला माहीत होती. या जांभळ्या कणगाला आम्ही रताळी म्हणतो. एरवी स्वयंपाकघरात न दिसणारी रताळी उपासाच्या दिवशी ताटात महत्त्वाची जागा पटकावतात.

मला पुण्यात पांढरी कणगा कधीही बघायला मिळाली नव्हती. गोवा सरकारच्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मध्येच शाळा सोडलेल्या (ड्रॉप आउट) विद्यार्थ्यांचा एक सर्व्हे आम्ही करत होतो. मोले भागात हा सर्व्हे सुरु होता. आमच्या टीममधली एक मुलगी तिथेच तांबडी सुर्ला जवळच्या भागात राहायची.

त्यादिवशी आषाढी की कार्तिकी एकादशीचा उपवास होता. खूप आग्रह करून तिनं आम्हाला सर्वाना घरी बोलावलं. एकादशी असल्यामुळे तिच्या आजीने मुगाचं कण्ण केलं होतं आणि कणगा उकडून ठेवली होती.

आम्हालादेखील स्टीलच्या छोट्याशा पेल्यात मुगाची कण्ण आणि एका टोपलीत उकडलेली कणगा दिली. सगळ्यांच्या तोंडाची बडबड बंद होऊन उकडलेल्या कणगाचं साल काढण्यात रमून गेले.

थोडंसं मीठ घालून कणगा उकडलेली असल्यामुळे चवीला छान लागली. अख्ख्या मुगाची भरड काढून ते शिजवताना त्यात खोवलेलं खोबरं, थोडासा गूळ, काजू बिया आणि वेलची पावडर घालून शिवलेलं मुगाचे कण्ण देखील पहिल्यांदा खाल्ले. मुळात उपासाला मूगदेखील खातात हे माहीत नव्हतं. पण दुपारी जेवणाच्या वेळी एक छोटासा पेला मुगाचे कण्ण आणि दोन मध्यम आकाराची कणगा खाऊन पोटाला छान आधार मिळाला.

goa
Goa Cashew Farmers: काजू उत्पादनात घट! राज्यातील शेतकरी चिंतातुर, हमीभाव वाढवण्याची मागणी

कणगा हा शब्द मी धान्य साठवून ठेवण्याच्या कोठारांसाठी वापरताना ऐकला होता. या नावाचं फळ, कंद असतं हे माहित नव्हतं. कणगा, काटे कणगा ही कोकण ते केरळ पट्ट्यात मिळतात. घराघरात त्या त्या भागांप्रमाणे, तिथल्या खाद्यशैली प्रमाणे कणगा, काटेकणगापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कोकण - गोवा - केरळ या तिन्ही भागात कणगापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची चव फार वेगळी आहे.

मला याचे कणगाच्या नेवऱ्या आणि कणगाची खीर हे दोन पदार्थ अतिशय प्रिय आहेत. कणगाच्या नेवऱ्यां या आगळ्या वेगळ्या पदार्थाचं नाव मी पहिल्यांदा माझ्या सासूकडून ऐकलं. कणगा आणि त्याच्या नेवऱ्या (करंज्या) कशा? असा प्रश्न मलाही पडला होता. रताळ्याचा हलवा, रताळ्याचा खीस, रताळ्याची खीर असे पदार्थ माहीत होते पण कणगाच्या करंज्या कधी ऐकल्या नव्हत्या की कधी खाल्ल्या नव्हत्या.

मग कधीतरी सासूबाईना फोनवरून रेसिपी विचारून मी करायला घेतल्या आणि लक्षात आलं की हे बनवताना तुमच्यात संयमाची गरज आहे. कसंही करून पटकन काम संपवण्याकडे कल असणाऱ्यांचा इथं टिकाव लागत नाही. कणगाच्या नेवऱ्या बनवणं थोडंसं किचकट काम असलं तरी त्याचा अंतिम 'रिझल्ट' हा तुम्हाला समाधान देऊन जातो.

कणगाची नेवरी आणि खीर

मी पहिल्यांदा उकडलेली कणगा खाल्ली तेव्हा मला ही पांढरी, चवीला गोड नसलेली कणगा आवडली नाहीत. मग पुढे या ना त्या कारणाने कणगा पुढ्यात येत गेली आणि हळूहळू त्यांची चव ओठांवर रुळत गेली. एकेदिवशी आम्ही आमच्या कोंबातल्या घरी सगळे जमलो असता सासूबाईंनी गरम गरम कणगाच्या नेवऱ्या आम्हाला खायला घातल्या.

वरून थोडंसं कुरकुरीत आतून मऊसूत आणि मग गुळाचा हलका गोडवा जाणवणारी चव मला आश्चर्यचकित करून गेली. सासूबाईंचं वय तेव्हा ८२ होतं. या वयातही त्या असला किचकट पदार्थ करायला घेऊन बसल्या होत्या. या वयात त्या करू शकतात तर आपण का नाही? करून तर बघूया.. असं काहीसं मनात घेऊन मी देखील एकदिवस कणगाच्या नेवऱ्याचा घाट घातला.

उकडलेल्या कणगात थोडंसं गव्हाचं पीठ घालून ते मळून घ्यायचं असं मला सासूबाईंनी सांगितलं होतं. त्यातलं ''थोडंसं'' हे मी विसरून गेले आणि गव्हाचं पीठ ''थोडंसं जास्तच'' झालं. मग काय ती कणगाच्या नेवरीची चव बदलून गेली.

पण करून बघितल्यामुळे किमान कसं बनवायचं हे समजलं तरी. आता ''कानाला खडा'' परत कधी अशी चूक होणार नाही. या अनुभवानंतर कणगाच्या नेवऱ्या उत्तम बनू लागल्या. हलक्या हाताने कणगाचं मळलेलं पीठ तेवढ्याच हलक्या हातानं प्लास्टिक पेपरवर पसरवून त्यात खोबऱ्याचं गोड (गूळ) घालून केलेलं चुन्न (सारण) घालून करंजीचा आकार द्यायचा. मग हि नेवरी तव्यावर तूप टाकून भाजून घायची.

तळायची नाही हीच तर त्याची खासियत. अशीच तव्यावरून गरम गरम काढलेल्या कणगाच्या नेवारीवर तुपाची छोटीसी धार घालून गट्टम करायची. हे तुम्हाला सांगतानाच तोंडाला पाणी सुटलंय.

कणगाची खीर हा प्रकार देखील अस्सल गोमंतकीय प्रकार आहे. सामान्यतः संपूर्ण देशभर दूध घालून खीर बनवली जाते. पण इथं गोव्यात खीर दुधाची बनत नाही. नारळाचा रस (दूध) काढून त्यातच वेगवेगळ्या प्रकारच्या खीर बनवल्या जातात.

हेच इथल्या खिरीचं वेगळेपण आणि यासगळ्या बनवल्या जाणाऱ्या खिरीमध्ये कणगाची खीर फार वेगळी. नारळाच्या रसात कणगाच्या बारीक बारीक फोडी आणि यासगळ्यात व्यवस्थित मिसळून गेलेला साबुदाणा ही जरा वेगळी जोडी या खीरीत जमून जाते. कणगाच्या मऊ मऊ फोडी, तर मध्ये काजू बिया खीरीतील रसासोबत आरामात अळमटळम करत, गप्पागोष्टी करत खाण्यात मजा आहे.

चवथीला (गणपती उत्सवात) कणगा आणि काटे कणगा हवीच. एकतर खतखतेंमध्ये घालायला आणि दुसरी खीर करण्यासाठी हवीच. परवा आम्ही एका लग्नाच्या रिसेप्शनला गेलो होतो. तिथं अशाच खवय्या मंडळींचा अड्डा जमला होता. मोठ्या चवीनं एकेका पदार्थांवर बोलणं सुरु होतं.

त्यात महेश बाबा नायक यांनी कणगाच्या नेवऱ्याची स्वादिष्ट आठवण काढली. ''कणगाच्या नेवरीचं गोमंतकीयांनी पेटंट घेऊन ठेवायला हवं'' असं महेश बाबा नायक यांनी विषय छेडून अस्सल गोमंतकीय पदार्थांचं दस्तऐवजीकरण करण्याची कशी गरज आहे हे पटवून दिलं. गोमंतकीयांसाठी 'खाण्यापिण्या'चा विषय किती जिव्हाळ्याचा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण समोर होतं.

अशा प्रकारची करंजी कुठेच बनवली जात नसणार. कुणाला हे सुचलं असेल. मुळात ओबडधोबड दिसणाऱ्या कणगानां इतकं सुंदर, गोड रूप कसं दिलं असेल? बायकांनी खाद्यपदार्थांमध्ये मोठमोठे शोध लावले.

त्यांची निर्मितीशीलता किती अगम्य आहे. हे असे आगळेवेगळे पदार्थ बघितले की सर्वात पहिल्यांदा हा पदार्थ कोणी बनवला असेल? कोणाला हे असं बनवणं सुचलं असेल? असा विचार सतावू लागतो. कणगाची नेवरी आणि कणगाची खीर यांचं वर्णन ऐकून तुम्हालाही रूच आली ना !

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com