Emmeline da Cunha goa first Doctor
Emmeline da Cunha goa first Doctor Dainik Gomantak

Emmeline da Cunha : प्रथम महिला डॉक्टर

Emmeline da Cunha : आपल्या अभ्यासादरम्यान, एमेलिन दा कुन्हा यांनी अनेक विद्यापीठ पारितोषिके जिंकली

आसावरी कुलकर्णी

गोमंत तारकांचा शोध घेताना खरंच कस लागतो. कारण मुळातच गोव्याच्या इतिहासा बद्दल असलेली तोकडी माहिती किंवा एका समाजावर अधोरेखित असलेला इतिहास असेच म्हणता येईल.

ब्रिटिशांनी जसा भारताचा अभ्यासपूर्ण आलेख मांडून ठेवला, तस फारसा पोर्तुगीजांनी मांडलेला दिसत नाही. तत्कालीन दस्तऐवज, पत्र किंवा इतरत्र छापून आलेली माहिती याद्वारे जी काही जुजबी माहिती मिळते त्यावरच समाधान मानावे लागते. भारतातील प्रथम महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी होत्या हे सर्वांना माहिती आहे. पण गोव्याच्या प्रथम महिला डॉक्टर कोण असा प्रश्न आल्यास मात्र आपल्याला त्याचे उत्तर क्वचितच माहिती असेल.

एमेलिन दा कुन्हा या गोव्यातील पहिल्या महिला डॉक्टर मानल्या जातात. त्यांनी १८९६ मध्ये मुंबईत वैद्यकीय पदवी पूर्ण केली आणि ब्रिटिश वसाहतवादी भारतातील या प्रमुख शहराच्या बंदरात आपल्या कारकिर्दीला सुरुवात ब्युबोनिक प्लेगचा उद्रेक होण्याच्या काळात केली.

Emmeline da Cunha goa first Doctor
Goa Police: दारुची तस्‍करी रोखण्‍यासाठी पोळे चेक नाक्‍यावर कडक पोलीस गस्‍त

१८४५ मध्ये सुरू झालेले ग्रँट मेडिकल कॉलेज हे ब्रिटिश भारतात निर्माण झालेले पहिले पाश्चात्य वैद्यकीय महाविद्यालय होते. जवळजवळ चार दशकांनंतर, १८८४ मध्ये, अनेक युरोपियन विद्यापीठांनी तसे करण्यापूर्वी (उदाहरणार्थ, १८८९ मधील एडिनबर्ग विद्यापीठ) महिला विद्यार्थ्यांना स्वीकारण्यास सुरवात केली. मुंबईच्या समृद्ध आणि पुरोगामी पारशी समुदायाच्या फ्रेनी कामा या पहिल्या महिला पदवीधर होत्या आणि १८९२ मध्ये महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्या.

चार वर्षांनंतर सहा महिलांनी वैद्यकीय पदवी पूर्ण केली: माणक तुर्खड, पारशी समाजातील आणखी एक महिला; चार ब्रिटीश; यामध्ये एमेलिन या एकमेव गोमंतकीय होत्या.

एमेलिनच्या वडिलांचे नाव जुझे दा कुन्हा आणि आईचे एना रिटा होते. जुझे कुन्हा हे स्वतः एक डॉक्टर आणि इतिहासकार होते. त्यांनी आपल्या मुलाला आणि मुलींना शिक्षणाच्या समान संधी दिल्या ज्यामुळे त्याकाळी तीनही मुले देश विदेशात शिक्षण घेऊ शकली.

आपल्या अभ्यासादरम्यान, एमेलिन दा कुन्हा यांनी अनेक विद्यापीठ पारितोषिके जिंकली - सर जेम्स फर्ग्युसन शिष्यवृत्ती (१८९०), लेडी रे पदक, बाई हिराबाई पेटिट पदक, स्कॉलरशिप ऑफ मेडिकल वुमन इन इंडिया फंड आणि पुरुष आणि महिला उमेदवारांच्या स्पर्धेत बाळकृष्ण सुदामजी प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग शास्त्र पुरस्कार (१८९३). अनेक ऐतिहासिक नोंदींमध्ये गोव्याची पहिली महिला म्हणून त्यांना ओळखले जाते.

१८९६ मध्ये, ज्या वर्षी दा कुन्हा आणि त्यांचे सहकारी पदवीधर झाले, त्याच वर्षी मुंबईच्या एका झोपडपट्टीत उद्रेक झाला, ज्याला डॉक्टर अकासियो गॅब्रिएल व्हिगास (गोव्याच्या वंशाचेही) यांनी ब्युबोनिक प्लेग म्हणून ओळखले.

चीनमध्ये याआधीही प्लेगचा उद्रेक झाला होता आणि शतकाच्या अखेरीस प्लेग जगाच्या अनेक भागांमध्ये पसरला होता, जो इतिहासातील तिसरा प्लेग महामारी मानला जात होता. यावेळी एमेलिन याना झोपडपट्टीत काम करण्याची संधी मिळाली. पुढे देश विदेशात शिक्षण घेऊन १९०४ पर्यंत त्या विदेशात राहिल्या.

१९०८ नंतर त्यांचे वास्तव्य गोव्यात असल्याचे कळते. परंतु एवढ्या उच्च शिक्षणानंतर त्यांनी आपले जीवन कुटुंबासाठी वाहिले. तत्कालीन समाज व्यवस्थेत स्त्री शिक्षणाविषयी असलेली अनास्था किंवा संकुचित वृत्ती अशा उदाहरणामुळे अधोरेखित होते. तरीही एमेलिन कुन्हा यांनी वैद्यकीय क्षेत्रात इतर मुलींसाठी नक्कीच आदर्श घालून दिला यात शंकाच नाही!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com