कोरोना चे आर्थिक परिणाम

coronavirus and Indian economy
coronavirus and Indian economyDainik Gomantak

अर्थविश्‍व :भारतातून चीनला व चीनहून भारतात होणारी सर्व निर्यात सध्या बंद होण्याच्या मार्गावर असून देशाची उत्पादन साखळी विस्कळीत होऊ शकते. सध्या चीनमधून होणाऱ्या भारतीय आयातीचे मूल्य ८७ अब्ज अमेरिकी डॉलर असून २००२-०३ या ‘सार्स’च्या काळापेक्षा १८ पट मोठी आहे.

माेठा प्रभाव
कोरोना व्हायरसच्या महासाथीचा दिर्घकालीन परिणाम चीनच्या विकासावर जाणवणार नाही, असा चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग यांचा दावा असला तरी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हे मान्य करावेच लागले. कोरोना विषाणूंचा प्रभाव वर्ष २००३ मध्ये उद्भवलेल्या सार्सपेक्षाही माेठा ठरला आहे. सार्स विषाणूंचा उद्रेक जगातील २९ देशांमध्ये पसरून त्याची ८ हजार ९८ लोकांना बाधा झाली होती. त्यापैकी सुमारे ८०० जणांना नऊ महिन्यांच्या कालावधीत प्राण गमवावे लागले होते. तुलनेत आजवर मागील दोन महिन्यांत कोरोनामुळे जगातील २ हजार २३६ व्यक्तींना मृत्यूने घेरले असून, जागतिक भीती वाढवणारी बातमी म्हणजे चीनने बिजींगमधील रुग्णालयासह तीन प्रांतामधील चार तुरुंगात संसर्ग होण्याचे संकेत दिले आहेत. या घडीला चीनच्यामधील एकूण कोरोना विषाणू प्रभावित लोकसंख्येचा आकडा ६६ हजारांच्या पार गेला असून या महामारीचा केंद्रबिंदू चिनच्या बाहेर फुटण्याची दाट शक्यता आहे.

इराण देशातील तीन शहरांमधून १८ रुग्ण आढळण्याची बातमी असून त्यामध्ये १३ अतिरिक्त प्रकरणांची व चार मृत्यूंचे अहवाल आहेत. दक्षिण पूर्व आशिया ते मध्य पूर्व आशियापर्यंतच नव्हे तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, रशिया, फ्रान्स व जर्मनीपर्यंत या विषाणूंनी थैमान घातले असून याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

एका बाधीत व्यक्तीकडून साधारण २-३ स्वस्थ माणसांपर्यंत हा विषाणू पसरत असल्याने पुढील महिन्यापर्यंत जगातील सर्व देशांपर्यंत हे लोण पसरेल, यात वाद नसावा. दक्षिण कोरियामध्ये विषाणू ग्रस्तांची आकडेवारी २०० च्या पार गेली असून, ती जपानमध्ये १०० पेक्षा जास्त, सिंगापूरमध्ये ९० च्या असपास तर हाँगकाँगमध्ये ६० प्रकरणांची नोंद झाली आहे. या सर्वांची भिषणता एवढी की या आठवड्यात जगातील २० प्रगत औद्याेगिक अर्थव्यवस्थेचे अर्थमंत्री व केंद्रीय बँकेचे अध्यक्ष सौदी अरेबियामधील रियाधमध्ये आपत्कालीन परिषदेसाठी जमणार असून आपल्या संबंधीत अर्थव्यवस्थांवर होऊ शकणाऱ्या संभाव्य परिणांमाचेे मुल्यांकन करणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार के. सुब्रम्हण्यम्‌ यांच्या मते भारतातील आर्थिक पुनर्प्राप्तीची जोखीम आता वाढली असून रिझर्व्ह बँकेच्या अध्यक्षांच्यामते हा उद्रेक भारतावर मर्यादीत परिणाम करेलच पण जागतिक व्यापार व चिनी अर्थव्यवस्थेेवर मोठ्या प्रमाणात स्थित्यंतरे घडतील, असे मत व्यक्त केले आहे.

आर्थिक व्यत्यय
कोरोना विषाणूच्या मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांसह विविध देशांच्या आर्थिक क्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यत्यय विश्‍लेषित करण्यासारखे आहे. चीन आता जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावत असल्याने सार्सच्या उद्रेकापेक्षा कितीतरी पटीने आर्थिक परिणाम जास्त असतील. चीनमधील ६० टक्के उत्पादन निर्यातप्रधान आहे व चीन आर्थिक उत्पादन जगभरात दुसऱ्या क्रमांकाचे असल्याने या वर्षात चीनच्या आर्थिक वाढीत ०.५ ते १ टक्क्यांची घट संभवते. यामुळे आशियाई राष्ट्रांमधील १० देशांमधील आर्थिक विस्तारात ०.२ ते ०.५ बिंदूची घसरण होईल.
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखताना नव्या आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेला अंदाजे ३०० अब्ज डाॅलर्सचा खर्च संभवतो. चीनमधील मोटार, माेटारीचे सुटे भाग व उपयुक्त वस्तुंचे उत्पादन क्रमाने थांबविले असून यामुळे जागतिक पुरवठा श्रृंखला मंदावणार आहे.

भारतातील व्यापार विचलीत होईल
भारतातून चीनला व चीनहून भारतात होणारी सर्व निर्यात सध्या बंद होण्याच्या मार्गावर असून देशाची उत्पादन साखळी विस्कळीत होऊ शकते. सध्या चीनमधून होणाऱ्या भारतीय आयातीचे मूल्य ८७ अब्ज अमेरिकी डॉलर असून २००२-०३ या ‘सार्स’च्या काळापेक्षा १८ पट मोठी आहे. देशातील २५ टक्के निर्यात सुमारे सध्या बंद पडली असून भारत रत्ने व दागदागिने, मासे, खनिजे व इलेक्ट्रिक मशिनरी यांची निर्यात करणे तर इलेक्ट्रॉनिक, अभियांत्रिकी वस्तू, घरगुती साहित्य, यंत्रणा व ग्राहकोपयोगी टिकाऊ मालाची आयात करतो. भारतात सुमारे ६० टक्के इलेक्ट्रॉनिक वस्तू व ४५ टक्के ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्यात होत असल्यामुळे ती रोढावल्यास या सर्व वस्तू देशात महाग होऊन महागाईच्या संकटाशी आपल्याला सामना करावा लागेल.

अमेरिका संयुक्त अमिरातीनंतर चीन ही भारताची तिसऱ्या क्रमांकाची निर्यात बाजारपेठ आहे. चीन कोरोनाच्या व्यत्ययापासून सावरला नसल्यास भारतातील कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राला मोठा फटका संभावतो. हे क्षेत्र भारतातील १० टक्के निर्यातीस कारणीभूत ठरल्यामुळे याचे परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर जाणवतील. भारतात स्मार्टफोन, टि.व्ही, फ्रिज, वॉशिंग-मशीन व मोटार यांच्या उत्पादनास आवश्‍यक असलेल्या वस्तूंचा आवश्‍यक पुरवठा न झाल्यामुळे भारतात उत्पादन व विक्रीत घट संभवते किंवा पर्यायी खरेदी बाजारपेठ आपल्याला शोधावी लागले. उत्पादन व्याप्ती देशात मंदावल्यास देशात कामगार कपात, मजूर कपात व उत्पन्नाच्या पातळीवर नकारात्मक परिणाम जाणवतील. भारतातील वाहन उत्पादनाचा दर तर ८ टक्क्यांनी घटण्याचा संभव असून मागीलवर्षी वाहन उत्पादन आर्थिक मंदीमुळे १३ टक्क्यांनी घटले होते. या पार्श्‍वभूमीवर वाहन उत्पादन क्षेत्रातील नकारात्मकतेत अधिकच भर जाणवेल.

कोरोना व्हायरसचा फटका चीन व दक्षिण पूर्व देशांतून येणाऱ्या पर्यटकांवर होणार असल्यामुळे पर्यटन क्षेत्राला झळ जाणवेल. देशात चीनकडून येणाऱ्या विदेशी पर्यटकांची रेलचेल अलिकडच्या वर्षांत वाढत असून त्यांची संख्या विदेशी पर्यटकांच्या तीन टक्के आहे. भारतातून चीनकडे जाणारी विमानसेवा खंडित झाल्याने एअर इंडिया व इंडिगोसारख्या कंपन्यांना नुकसान सोसावे लागत आहे. थोडक्यात, देशांतर्गत व्यापार, निर्यात, उत्पादन, भारतातील पुरवठा साखळी व गुंतवणूकीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अत्यंत खोलवर संभवतो.

सध्यातरी देशातील हिरे व सोने निर्यात व्यवसाय, चामडे उद्योग, औषध उत्पादन व सौर ऊर्जा व्यवसाय धोक्यात असून या उद्योगांकडे सरकारकडून लक्ष देण्याची वेळ आली आहे. निर्यातदारांना नवी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकारने योजना आखणे महत्त्वाचे ठरावे.

या शिवाय चीनवर आयातीसाठी निर्भर रहाणाऱ्या भारतातील उत्पादकांना कच्च्या मालासाठी नव्या बाजारपेठ शाेधाव्या लागतील. देशांतर्गत खेळणी, अभियांत्रिकी वस्तू, प्लास्टिक व औद्योगिक उत्पादकांनी आपला उत्पादन खर्च चिनी वस्तूंच्या तुलनेत कमी केल्यास देशी उद्याेग जगताला चालना मिळू शकेल. पण त्यासाठी देशांतर्गत उत्पादकता वाढीस लावावी लागणार आहे. येत्या एक-दोन महिन्यात कोरोना विषाणूची भीषणता आटोक्यात न आणल्यास जगभरातील औद्योगिक व्यवस्था धोक्यात येईल. भारतावर याचा परिणाम प्रचंड असेल यात दुमत नसावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com