Dodda  Ganesh
Dodda Ganesh 
क्रीडा

क्रिकेटच्या पलीकडेही जीवन : दोड्डा गणेश

Dainik Gomantak

पणजी

क्रिकेटच्या पलीकडेही जीवन आहे, आपल्या प्रियजनांसाठी जगा, असे सांगत भारताचे माजी कसोटी वेगवान गोलंदाज दोड्डा गणेश यांनी संघातून वगळल्यानंतर आलेली औदासिन्यता आणि त्यातून सावरल्याचा भावनिक अनुभव प्रकट केला आहे.

गतमोसमातसह गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाचे चार वेळा प्रशिक्षकपद सांभाळलेल्या ४६ वर्षीय गणेश यांनी जुनी निराशा उघड केली आहे. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी भारतीय संघातून डच्चू मिळाल्यामुळे आपण कमालीचा खंगलो होतो, त्यामुळे महिनाभर घरातून बाहेर पडणेही टाळले होते, असे गणेश यांनी सोशल मीडियावर नमूद केले आहे. आर्थिक बाबींसाठी आणि वेगळ्या पातळीवर गुणवत्ता प्रदर्शित करण्यासाठी तेव्हा आयपीएल नव्हती. देशांतर्गत मोसमाद्वारे निवड समितीचे लक्ष वेधणे शक्य नसेल, तर वर्षानुवर्षे वाट पाहत राहत, प्रत्येक वर्ष संपत असताना नैराश्य वाढत गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

कर्नाटकच्या गणेश यांनी १९९८-९९ मोमातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ६३ विकेट्स मिळविल्या होत्या. हा विक्रम तब्बल २१ वर्षांनंतर सौराष्ट्राच्या जयदेव उनाडकट याने २०१९-२० मोसमात मोडला. गणेश यांनी १९९७ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज दौऱ्यात मिळून भारताचे चार कसोटी आणि झिंबाब्वेलिरुद्ध एका वन-डे सामन्यात प्रतिनिधित्व केले, पण नंतर त्यांना राष्ट्रीय संघातून डावलण्यात आले. तेव्हा असमानतेच्या क्षणांचा सामना केला, पण कधीही हार मानली नाही, असे गणेश यांनी नमूद केले आहे. 

गणेश यांनी कर्नाटकतर्फे रणजी क्रिकेट स्पर्धेतील १०४ सामन्यांत ३६५ विकेट्स मिळविल्या आहेत. ३६ धावांत ७ विकेट्स ही त्यांची डावातील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यांनी कर्नाटकला प्रतिष्ठेचा करंडक जिंकण्यासही मदत केली.

मेहनतीवर भर, पण...

``माझ्यासाठी, तेव्हा जगाचा अंत ठरला होता. मला उच्च पातळीवर पुरेशी संधी न देता वगळण्यात आल्याची वस्तुस्थिती मी पचवू शकलो नाही. पण तेव्हा मी फक्त २३ वर्षांचा होतो आणि माझ्यात भरपूर क्रिकेट बाकी आहे हे जाणून होतो. वय माझ्या बाजूने होते. मी अहोरात्र मेहनत घेण्याचे ठरविले. अथक परिश्रम घेतल्यामुळे माझ्यासाठी १९९७, १९९८ आणि १९९९ मोसम विस्मयजनक ठरला. १९९९ मध्ये कर्नाटकने रणजी विजेतेपद पटकाविले. मी एकूण ६३ विकेट्स घेतल्या आणि विश्वकरंडक संघात जागा मिळण्याची स्वप्न पाहत होतो, पण ते प्रत्यक्षात आलेच नाही,`` असे गणेश यांनी नमूद केले. पुनरागमन करण्यासाठी आपणास योग्य समजण्यात आले नाही याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. भारत-अ संघाच्या दौऱ्यासाठी संधी मिळाली. पण आपल्यापेक्षा कमी विकेट मिळविणाऱ्यांना भारताची कॅप मिळत होती हे ह्रदयात खंजीर खुपसण्यासारखे होते, असे गणेश यांनी म्हटले आहे.

गोव्याच्या रणजी संघासाठी प्रेरणास्त्रोत

क्रिकेटपटू या नात्याने कारकिर्दीत चढउतार अनुभवलेले दोड्डा गणेश प्रशिक्षक या नात्याने गोव्याच्या रणजी क्रिकेट संघासाठी प्रेरणास्त्रोत ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याने २००८-०९ मोसमात रणजी करंडक स्पर्धेच्या प्लेट गटाची उपांत्य फेरी गाठली होती. २०१९-२० मोसमात गणेश यांचे गोव्याला पुन्हा मार्गदर्शन लाभले. तेव्हा गोव्याने प्लेट गटात अपराजित राहत अव्वल स्थान मिळविले आणि रणजी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळण्यासाठी पात्रता मिळविली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याने २९ रणजी सामन्यांत ११ विजय नोंदविले असून फक्त दोन पराभव स्वीकारले आहेत.

गोवा रणजी प्रशिक्षकपदी गणेश यांची कामगिरी

मोसम सामने विजय पराभव अनिर्णित

२००७-०८ ५ १ ० ४

२००८-०९ ६ ३ १ २

२०१२-१३ ८ ० ० ८

२०१९-२० १० ७ १ २

एकूण २९ ११ २ १६

- संकलन : किशोर पेटकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT