FC Goa's Igor Angulo ready for Indian Super League
FC Goa's Igor Angulo ready for Indian Super League 
क्रीडा

कोरोमिनासची जागा घेण्यास आंगुलो सज्ज

क्रीडा प्रतिनिधी

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील मागील तीन मोसम ‘गोलमशिन’ ठरलेला एफसी गोवाचा प्रमुख खेळाडू फेरान कोरोमिनास याची जागा घेण्यासाठी नवा आघाडीपटू इगोर आंगुलो सज्ज झाला आहे. नव्या मोसमात ३६ वर्षीय आंगुलो याच्याकडे आयएसएल लीग विनर्स शिल्ड विजेत्या संघाच्या आक्रमणाची जबाबदारी असेल.

कोरो या टोपणनावाने एफसी गोवाच्या चाहत्यांत लोकप्रिय असलेल्या स्पॅनिश आघाडीपटूने मागील तीन मोसमात भारतात खेळताना ५५ गोल नोंदविले. यामध्ये आयएसएल स्पर्धेतील ४८, तर सुपर कप स्पर्धेतील ७ गोलांचा समावेश आहे. इस्पॅन्यॉल, गिरोना, मलोर्का या स्पेनमधील प्रमुख संघातून खेळलेल्या कोरो याच्याशी एफसी गोवाने १७ जुलै २०१७ रोजी करार केला. त्यानंतर २४ मे २०१९ रोजी करार वाढविला. आयएसएल फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या दोन मोसमात सर्वाधिक गोल नोंदवत या सेंटर-फॉरवर्ड खेळाडूने गोल्डन बूटचा मानही मिळविला. पहिल्या दोन आयएसएल स्पर्धेत त्याने अनुक्रमे १८ व १६ गोल नोंदविले, तर गतमोसमात १४ गोल नोंदवून पुन्हा छाप पाडली. याशिवाय एफसी गोवाच्या २०१९ मधील सुपर कप विजेतेपदात पाच गोलसह मोलाचा वाटा उचलतानाही गोल्डन बूटचा मान मिळविला होता. 

आंगुलो याने काल ऑनलाईन पत्रकार परिषदेत कोरोच्या अनुपस्थितीत आपण दबाव झेलण्यास तयार असल्याचे सांगून यंदा एफसी गोवा संघातून कोरोमिनास खेळणार नाही याची पुष्टी केली. यशस्वी खेळाडूची भूमिका वठविताना आपल्यावर दबाव निश्चितच असेल, पण खेळताना दबाव झेलणे आपल्यास आवडते आणि त्याची सवय आहे. सर्वोत्कृष्ट खेळ करणे आपणास नेहमीच भावते, असे स्पेनमधील बिल्बाओ येथील रहिवासी असलेल्या या सेंटर-फॉरवर्ड खेळाडूने सांगितले. कर्णधार या नात्याने खेळताना आपण दबाव सहन केल्याचेही आंगुलो याने नमूद केले. गोव्यातही आपल्याकडून उत्कृष्ट कामगिरीच्या अपेक्षेने पाहिले जाईल असे स्पष्ट करून, फुटबॉल हा सांघिक खेळ असून एका खेळाडूवर अवलंबून नाही. आम्हाला एकमेकांना साह्य करावे लागेल, असे सांगत आंगुलो याने एकप्रकारे कोरोची अनुपस्थिती जाणवणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

आंगुलोने स्पेनमधील ॲथलेटिक बिल्बाओ संघातर्फे व्यावसायिक कारकिर्दीस सुरवात केली. २०१६ पासून पोलंडमधील गॉर्निक झाब्रझ या संघाचा आघाडीफळीतील प्रमुख खेळाडू ठरला. तेथील पहिल्या मोसमात त्याच्या शानदार कामगिरीमुळे झाब्रझ संघाने अव्वल श्रेणीसाठी (एक्स्ट्राक्लासा) पात्रता मिळविली होती. त्याने या संघातर्फे सर्व स्पर्धांत मिळून १५४ सामन्यांत ८८ गोल व २१ असिस्ट अशी कामगिरी केली आहे. एक्स्ट्राक्लासा स्पर्धेत त्याने २०१८-१९ मोसमात सर्वाधिक २४ गोल नोंदवून गोल्डन बूटचा मान पटकावला होता.

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT