Rahul sadolikar
तबला हे मंत्रमुग्ध करणारं वाद्य दिसलं की शब्द कानावर पडला तरी एका महान वादकाचं नाव समोर येतं ते म्हणजे उस्ताद झाकीर हुसैन.
9 मार्च 1951 रोजी झाकीर हुसैन यांचा जन्म मुंबई येथे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेंट मिशेल हायस्कूल, माहीम येथे झाले. पुढे सेंट झेव्हिअर्स महाविद्यालय, मुंबई येथून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
संगीताचा वारसा त्यांना घरातूनच लाभला होता. त्यांचे वडील विख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखाँ( रख कुरेशी) यांच्या मार्गदर्शना-खाली त्यांनी संगीताचे धडे घेतले. बालपणापासून त्यांनी तबला-वादनातील विविध बारकावे आणि शैली आत्मसात केल्या. त्यांनी पहिला व्यावसायिक तबलावादनाचा कार्यक्रम वयाच्या बाराव्या वर्षी केला.
झाकिर हुसेन यांनी आपल्या तबलावादनातील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस 1970 मध्ये प्रारंभ केला. त्या एका वर्षात सु. 150 तबलावादनाचे कार्यक्रम त्यांनी भारतासह विविध देशांत सादर केले. त्यांनी सामूहिक तबलावादनासाठी विख्यात सरोदवादक आशीष खान यांसोबत ‘शांतिगट’ (1970) पुढे इंग्रज गिटारवादक जॉन मॅक्लॉफ्लिन व व्हायोलिनवादक एल्. शंकर यांसोबत ‘शक्तिगट’ (1975) स्थापन केला
शिवाय ते स्वतंत्र (सोलो) तबलावादनाच्या रंगतदार मैफली करत. त्यांनी तबला या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. परंपरा आणि नावीन्य यांचे सुंदर मिश्रण त्यांच्या वादनशैलीत आढळते. भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताचे ते भोक्ते आहेत. तबलावादनातील त्यांचा जोश, बोटांची किमया आणि बेभानपणा ठळकपणे जागवतो. सुरांचा अनुनय करताना त्यांनी लाखो रसिकांना आपल्या तालावर नाचविले
अटलांटा (अमेरिका) येथील उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा-सामन्यांच्या उद्घाटनाची संगीतरचना त्यांनी केली (१९९६). तबलावादनास त्यांनी दिलेले मोहक रूप मैफलीचे आकर्षण ठरते. गुरु-शिष्य परंपरेला ते महत्त्व देतात.
तबलावादनातील मेरुमणी ठरलेल्या झाकिर हुसेन यांनी अली अकबरखाँ, बिरजू महाराज, रवि शंकर, शिवकुमार शर्मा आदी अनेक श्रेष्ठ गायक, वादक, नर्तक यांना तबलावादनाची साथ दिली आहे.