Rahul sadolikar
महाराष्ट्रातील वारली आदिवासींची वैशिष्ट्यपूर्ण चित्रकला. या जमातीचे लोक त्यांच्या घरातील भिंतींना चित्रांनी सजवतात. या चित्रांना वारली चित्र म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील कोसबाड, जव्हार, विक्रमगड, मोखाडा, डहाणू, तलासरी, नाशिक व धुळे जिल्ह्याचा काही भाग तसेच गुजरातच्या वलसाड, डांग, नवसारी, सुरतचा भाग आणि दाद्रा व नगरहवेली, दीव आणि दमणचा काही भाग येथे वारली आदिवासींची वस्ती आहे.
भौगोलिकदृष्ट्या हा सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरील डोंगराळ आणि महाराष्ट्र व गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या लगतचा भाग आहे. वारली लोकांचे जीवन या प्रदेशातील भूमी व निसर्गाशी जोडलेले आहे. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात, सण-उत्सव, नृत्य समारंभात, चित्रांत हे सर्व संदर्भ अनुभवता येतात.
वारली चित्रे धार्मिक कार्याला विशेषत: विवाहाच्या वेळी काढली जातात. वारली लोक चित्र काढणे ऐवजी ‘चित्र लिहिणे’ असा शब्दप्रयोग करतात. वारली चित्र भिंतीवर काढले जाते. चित्र काढण्यापूर्वी ज्या घरातील भिंतीवर चित्र काढायचे आहे; ती भिंत माती, काव अथवा शेणाने सारवली जाते. चित्र काढण्याच्या पारंपरिक पद्धतीत खजुराचा, बाबूंचा काटा किंवा बहारीच्या गवताची अथवा भाताच्या चुगाची काडी वापरतात.
उखळात कुटलेल्या तांदळात पाणी घालून पांढरा रंग तयार केला जातो. बहुतांशवेळा सारवलेल्या भिंतीचा रंग व पांढरा रंग या दोन रंगाने वारली चित्र पूर्ण होते. आजूबाजूला निसर्गात आढळणारी फुले, पाने, झाडांच्या साली, फळे यांचा उपयोग करून मिळवलेल्या निळा, लाल, पिवळा अशा रंगांचा क्वचित वापर केलेला आढळतो.
वारली चित्रांतील आकारांना स्वतंत्र ओळख आहे. या चित्रांतील रचना गोल, त्रिकोण, चौकोन इत्यादी मूलभूत भौमितिक आकारांचा वापर करून केल्या जातात. चित्रातील मानवाकृतींमध्ये दोन त्रिकोणांची उलटसुलट रचना करून त्यामधून शरीर दाखवले जाते. तर गोल व रेषांचा वापर करून डोके, हात व पाय दाखवले जातात. वारली चित्रात मानवाकृती पांढऱ्या रंगाने भरल्या जातात. त्यावर शरीररचनेचे, चेहऱ्याचे बारकावे नसतात.
स्त्री दाखवताना चेहऱ्याच्या भरीव गोलावर अंबाड्याचा छोटा भरीव गोल काढला जातो आणि पुरुष दाखवताना काहीवेळा शेंडीची एक बारीक रेघ दाखवली जाते. देव दाखवण्यासाठी चेहऱ्याच्या गोलाभोवती पाच, सहा उभ्या रेषा काढल्या जातात. अनेक वारली चित्रांमध्ये एकमेकांच्या कमरेभोवती हात गुंफून वर्तुळाकृती तारपा नृत्य करणारे नर्तक दाखवले जातात.
वारली चित्रकला ही मुख्यत्वे स्त्रियांची चित्रकला आहे. विवाहाच्या वेळी चित्र काढणाऱ्या चित्रकर्तीस ‘धवरेली’ असे म्हणतात. धवरेली ही सुवासिनी असते. वारली चित्र काढताना स्नान, पूजा, उपवास इत्यादी विधी करून शुद्ध भावनेने चित्रण केले जाते. चित्र काढण्यास सुरुवात करताना धवरेली जी पहिली रेघ काढते, त्याला देवरेघ असे म्हणतात.
झाडावर सुतारकाम करणाऱ्या सुतारपक्ष्याची गोष्ट...