Manish Jadhav
वर्कआउट संपल्याबरोबर होणाऱ्या दुखण्यापेक्षा, व्यायामानंतर 12 ते 24 तासांनी सुरु होणाऱ्या आणि 24 ते 48 तासांत तीव्र होणाऱ्या स्नायूंच्या वेदनेला 'DOMS' (Delayed Onset Muscle Soreness) म्हणतात. हा कोणताही कायमस्वरुपी आजार नसून स्नायूंनी दिलेल्या प्रतिसादाचा एक भाग आहे.
जेव्हा तुम्ही जीममध्ये जास्त वजन उचलता किंवा नवीन व्यायाम करता, तेव्हा स्नायूंच्या तंतूंना (Muscle Fibers) सूक्ष्म तडे जातात (Micro-tears). हे सूक्ष्म तडे जाणे हीच स्नायूंचा आकार आणि ताकद वाढण्याची पहिली पायरी असते.
हे पूर्णपणे सामान्य आणि चांगले मानले जाते! याचा अर्थ असा की तुमच्या स्नायूंवर योग्य ताण पडला आहे आणि ते नवीन आव्हानासाठी स्वतःला तयार करत आहेत. मात्र, जर वेदना अत्यंत तीव्र असतील किंवा सांध्यांमध्ये कटकट आवाज येऊन दुखत असेल, तर ती दुखापत असू शकते.
अनेक नवशिक्यांना वाटते की, अंग दुखले तरच वर्कआउट चांगला झाला, पण हा मोठा गैरसमज आहे. जसजसे तुमचे शरीर सरावते, तसतशी ही अंगदुखी कमी होते. अंग न दुखणे म्हणजे वर्कआउट फुकट गेले असे अर्थ होत नाही.
जर स्नायूंमध्ये सौम्य वेदना असतील, तर हलका वॉक, स्ट्रेचिंग किंवा दुसऱ्या स्नायूचा (उदा. पायांऐवजी हातांचा) व्यायाम करु शकता. परंतु, वेदना खूप तीव्र असल्यास 1-2 दिवस विश्रांती देणे अत्यंत गरजेचे आहे.
वर्कआउटनंतर पुरेसे पाणी पिणे (Hydration), 7 ते 8 तासांची शांत झोप आणि डाएटमध्ये योग्य प्रमाणात प्रोटीनचा समावेश केल्याने स्नायू वेगाने रिपेअर होतात. कोमट पाण्याने आंघोळ केल्यानेही रक्ताभिसरण सुधारुन आराम मिळतो.
जर व्यायामानंतरचे दुखणे 7 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहिले, प्रचंड सूज आली किंवा लघवीचा रंग गडद झाला, तर ते 'Rhabdomyolysis' चे लक्षण असू शकते. अशावेळी अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांना भेटावे.