Pranali Kodre
वूमन्स प्रीमियर लीगचा (WPL) दुसरा हंगाम 2024 मध्ये खेळवण्यात येणार आहे. या हंगामाचा लिलाव 9 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये पार पडणार आहे.
या लिलावात दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि युपी वॉरियर्स हे पाचही संघ आपला संघ पूर्ण करण्यासाठी बोली लावताना दिसतील.
या लिलावासाठी नोंदणी केलेल्या एकूण खेळाडूंमधून 165 खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली आहे.
लिलावासाठी अंतिम निवड झालेल्या 165 खेळाडूंपैकी 104 खेळाडू भारतीय आहेत आणि 61 खेळाडू परदेशी आहेत. या 61 खेळाडूंपैकी 15 खेळाडू आयसीसीच्या सहसदस्य संघांमधील आहेत.
तसेच 165 खेळाडूंपैकी 56 खेळाडू कॅप खेळाडू म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले आहेत. तसेच 109 खेळाडू अनकॅप म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न खेळलेले खेळाडू आहेत.
दरम्यान, पाचही संघात मिळून केवळ 30 खेळाडूंसाठीच जागा रिक्त आहेत. या 30 जागांमध्ये 9 परदेशी खेळाडूंसाठी जागा रिक्त आहेत. त्यामुळे 165 खेळाडूंपैक 30 जणींवरच बोली लागू शकते.
लिलावासाठी 50 लाख सर्वोच्च मुळ किंमत आहे. या विभागात डिएंड्रा डॉटीन आणि किम गार्थ या दोनच खेळाडूंचा समावेश आहे. त्यापाठोपाठ 40 लाख, 30 लाख, 20 लाख आणि 10 लाख अशा मुळ किंमत असलेले विभाग आहेत.
या लिलावाला 9 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता सुरुवात होणार आहे.
हा लिलाव जिओ सिनेमा या ऍप किंवा वेबसाईटवर आणि स्पोर्ट्स18 नेटवर्कच्या चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे.