Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात स्त्रियांना मिळालेला सन्मान आणि त्यांची स्थिती हा इतिहासातील एक अत्यंत प्रेरणादायी अध्याय आहे.
महाराजांच्या मते, परस्त्री ही मातेसमान होती. त्यांनी स्वराज्यात असा नियम केला होता की, युद्धाच्या वेळी किंवा कोणत्याही परिस्थितीत स्त्रियांच्या केसालाही धक्का लागता कामा नये.
जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून नजराणा म्हणून समोर आणली गेली, तेव्हा महाराजांनी "अशीच अमुची आई असती सुंदर रुपवती..." असे म्हणत तिचा सन्मान केला आणि तिला सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचवले.
स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांसाठी महाराजांनी अत्यंत कठोर शिक्षा निश्चित केल्या होत्या. रांझा गावच्या पाटलाने स्त्रीचा विनयभंग केल्यावर महाराजांनी त्याचे हात-पाय तोडण्याची 'चौरंगा' ही शिक्षा सुनावली होती, ज्यामुळे समाजात जरब बसली.
महाराजांच्या आयुष्यात राजमाता जिजाऊंचे स्थान सर्वोच्च होते. त्यांनी केवळ आई म्हणूनच नव्हे, तर स्वराज्याच्या मार्गदर्शक म्हणूनही मोलाची भूमिका बजावली. यावरुन दिसून येते की स्वराज्यात स्त्रियांच्या मताला आणि कर्तृत्वाला मोठे महत्त्व होते.
युद्धावर जाताना किंवा मोहिमेवर असताना सैन्यासोबत कोणतीही दासी, नर्तकी किंवा स्त्री नेण्यास महाराजांनी सक्त मनाई केली होती. सैनिकांकडून स्त्रियांना त्रास होऊ नये, हाच त्यामागचा मुख्य उद्देश होता.
शत्रूच्या प्रदेशातील स्त्रिया असो किंवा कोणत्याही धर्माच्या, महाराजांनी सर्वांना आदर दिला. मशिदी किंवा कुराण सुरक्षित ठेवण्यासोबतच त्यांनी स्त्रियांच्या अब्रूचे रक्षण करण्याचे आदेश सैन्याला दिले होते.
महाराजांच्या काळात स्त्रिया केवळ चूल आणि मूल यात अडकल्या नव्हत्या. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाकडे आणि कौशल्याकडे दुर्लक्ष केले नाही. अनेक स्त्रिया राजकारणात आणि महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सल्लागार म्हणून सक्रिय होत्या.
शिवरायांच्या काळात स्त्रिया रात्री-अपरात्री सुद्धा निर्भयपणे फिरु शकत होत्या. चोरी, दरोडा किंवा छेडछाड यांपासून स्त्रिया पूर्णपणे मुक्त होत्या, कारण महाराजांचा न्याय सर्वांना समान आणि तत्पर मिळत असे.